You are currently viewing मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना बळीराजा वीज योजनेच्या धर्तीवर राबवा – रविकिरण तोरसकर 

मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना बळीराजा वीज योजनेच्या धर्तीवर राबवा – रविकिरण तोरसकर 

मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना बळीराजा वीज योजनेच्या धर्तीवर राबवा – रविकिरण तोरसकर

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार…

मालवण

मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना ही मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेच्या धर्तीवर राबविण्यात यावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत अशी महिती भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या साडेसात अश्व शक्ती पर्यंत लागणाऱ्या शेती पंपाना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. जागतिक हवामान बदल तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसायात होणाऱ्या नुकसानीची भरपाई होऊन शेतकरी सक्षम व्हावा यासाठी ही योजना लागू केली आहे.

भारताच्या मत्स्य निर्यातीमध्ये मत्स्य शेतीचा वाटा मोठा आहे. परंतु यामध्ये महाराष्ट्र राज्य सतराव्या क्रमांकावर आहे. मत्स्य शेतकरी यांचा उत्पादनावरील प्रमुख खर्च हा विजेवर होतो. त्यामुळे त्यांचे नफ्याचे प्रमाण कायम कमी राहते. तसेच जागतिक हवामान बदल व नैसर्गिक आपत्तीही नुकसानीस कारणीभुत ठरते. महाराष्ट्रातील मत्स्य शेतीला बळ देण्यासाठी इतर राज्याप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना संबंधित क्षेत्रात नियोजनबद्ध सवलती देणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेसारखीच मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबविण्याची गरज आहे. विशेषतः सागरी किनारपट्टीवर केली जाणारी मत्स्य शेती यामध्ये कोळंबी पालन, गोड्या पाण्यातील पिंजऱ्या मधील मत्स्य शेती तसेच शोभिवंत मत्स्यपालन यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची मागणी असते. आज रोजी महाराष्ट्रामध्ये केल्या जाणाऱ्या मत्स्य शेतीमधील वीज वापरावर सद्यस्थितीमध्ये कोणतेही अनुदान मिळत नाही. मत्स्य शेतकऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना घोषित केल्यास त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होऊन मत्स्य शेतीच्या नफ्यात वाढ होईल. त्यामुळे अधिकाधिक मत्स्य शेतकरी मत्स्य शेती करण्यास उद्युक्त होतील. ज्याचा फायदा भारताची सागरी मत्स्य पदार्थ निर्यात वाढवणे व रोजगार निर्मितीसाठी होईल. तरी राज्य शासनाने मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवावी अशी मागणी असल्याचे श्री. तोरसकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा