*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*
*बाजार*
आम्हाला दोघांनाही आठवडी बाजारातून भाजीपाला आणायला खूप आवडतं आणि तसे पंधरा दिवसातून का होईना आमची एखादी बाजारभेट ठरलेलीच असते. जसं जमेल तसं, माझ्या नवऱ्याला जमलं तर तो आणतो किंवा आम्ही दोघं जातो किंवा मग मी एकटी जाते. चल मेरी धन्नो म्हणायचं…म्हणजे आपली स्कुटी घ्यायची आणि पडायचं बाहेर. आणलेल्या भाजीवर पण आम्ही दोघं बरीच चर्चा करू शकतो. ही भाजी किती महाग पडली,हिच्यात जरा फसलोच,ही स्वस्त पडली, ही तर नंबर एक मिळाली, ही बघ नवीन भाजी मिळाली फक्त एवढ्यासाठी बाजार करावा वाटतो वगैरे…अशा एक ना दोन, अनेक गोष्टी. मीच किती हुशारीने खरेदी करते/ करतो हे दाखवायची एकही संधी सोडायची नसते…होय की नाही?
तर काय नसतं या बाजारात? भाजी विकणाऱ्यांचे आवाज, त्या गर्दीचा एक वेगळाच गोंगाट, बायकांची दोन चार रुपयांसाठी चाललेली घासाघीस आणि त्यांचे हातवारे तर बघत रहावेत असे. त्यावरूनच कळतं की बाई किती मुरलेली आहे संसारात. भरलेल्या पिशव्या घेऊन बायकोबरोबर चालणारे नवरे पाहून अगदी ऊर भरून येतो. मधूनच एखादी गाय शिरते तेव्हा होणारा गोंधळ,थोडे पुढे गेल्यावर सुक्या मच्छीचा असह्य वास, ते बिलबिलत हालचाल करणारे जाळीतले खेकडे पाहिल्यावर कसंसच होतं. भांड्यांची, प्लॅस्टिक च्या वस्तूंची उतरंड, भजांचे आणि शेवचिवड्याचे तळणीचे वास, सुभगपणे रचलेला सुकामेवा, खचाखच भरलेलं वाणसामान. एकीकडं वजनं करत पाचसहा गिर्हाइक एकाचवेळी सांभाळत पैशांचीही बरोबर देवाणघेवाण करणारे भाजीवाले, व्यापारी …या दृश्याला तर तोडच नाही. हे इतकं सगळं मनोरंजन दुसरीकडे कुठे मिळणार? काही मऊ, काही उच्चस्वरातले, काही भांडखोर, काही गुर्मीतले, काही आर्जवी…आवाजांचेसुद्धा नाना प्रकार. कधी कोणी ओळखीचे लोक भेटतात, थोडफार जुजबी बोलणं होतं. काही भाजीवाले सुध्दा ओळखीचे झालेले असतात. माझे लेक तर म्हणते की तू कोणाशीही बोलू शकतेस. भाजीवालीशी पण काय गप्पा मारत असते का कोणी? पण मला आवडतं असं बोलायला. दोन-चार शब्द चांगले बोलले तर आपलं काही नुकसान होतं का? तेवढेच त्यांच्याही आणि आपल्याही मनाला विरंगुळा. तर असं बाजारात जाऊन आलं ना एकदम फ्रेश फ्रेश वाटतं. असं नाही की दारावर भाजी येत नाही किंवा आमच्या घराजवळ मिळत नाही असं मुळीच नाही.
बाजारातून भाजी घेऊन आले की बघणाऱ्यांच्या नजरा थोड्या विचित्र होतात. एवढ्या लांबचा बाजार करून आलीस? असा काय फरक आहे दरामध्ये? त्यांच्या बोलण्याचा हेतू हा असतो की तुला काय गरज आहे एवढी धडपड करून चार पैसे वाचवायची? काय उत्तर देऊ मी त्यांना? ती वेळ हसण़्यावारी नेऊन साजरी करते. पण खरंच थोडा विचार करायला गेलं तर हे खरे की कुठलीही टुकीने संसार करणारी स्त्री पैशाचे मोल जाणते. पैसा तिचा असो अथवा नवऱ्याने कमावलेला असो, तो पैसा कमावण्यासाठी काय काय कराव लागतं किती कष्ट उपसावे लागतात याचा तिला कधीही विसर पडत नाही. आणि म्हणून तर किलोभर सफरचंदामागं पाच दहा रुपये वाचावेत म्हणून ती नेहमीच प्रयत्न करते. असा मोलभाव करून घेणं हीच तर बाजारातली खरी गंमत आहे. कधी तुमचे पैसे जास्त जातात कधी बचत होते. ते काहीही असो पण त्यामुळे बाजारात जाऊन भाजी, फळ खरेदी करणं कमी प्रतीच आहे किंवा आपल्या स्टेटसला साजेस नाही हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. कारण मी अगदी लहान असल्यापासून आईला नेहमी बाजारातून भाजी आणताना बघितलय. तेव्हा तर सांगलीतला कापड पेठेत भरणारा शनिवारचा बाजार करून आम्ही बसनं विश्रामबागला यायचो. आईच्या दोन्ही हातात दोन दोन जड पिशव्या असायच्या आणि एवढं थकूनही ती घरी आल्यावर पूर्ण स्वयंपाक करायची. खरंच किती प्रेम होतं तिचं आपल्या संसारावर. अजूनही ती तितकीच अॅक्टिव्ह आहे. आम्ही सुट्टीत आजोळी गेलो की माझी मसूरची आज्जी म्हणजे आईची आई बाजारात जायची मला घेऊन. घरातून बाहेर पडल्यानंतर बाजारात जातानाच ती इतक्या वेळा तिच्या ओळखीच्या बायकांशी बोलायला थांबायची की तिचा हात सोडून पळत घरी जावं वाटायचं. कारण ती पूर्ण बाजारात दोन तास तर सहज घालवायचीच पण ठराविक नेहमीच्या भाजीवाल्यांपाशी हिचा किती वेळ जाईल याचा काही नेम नसायचा. अलिकडे घडलेल्या सगळ्या बातम्यांची देवाणघेवाण ठरलेली. आणखी वर घरी येताना अजून चार ओळखीच्या बायका आवाज द्यायच्या,आग्रह करायच्या की ही बसलीच त्यांच्याशी गप्पा मारत. त्यांच्या सुखादु:खाच्या गोष्टी संपता संपायच्या नाहीत. पण तेव्हा सुद्धा मला ते बाजाराचं आकर्षण होतंच होतं. अर्थात लहान असल्यामुळ आपल्याला खेळायला आणि खाऊला ती काय घेऊन देते हाही छुपा स्वार्थ होताच.
आता आपल्याकडे गाडी आहे, हातात ओझं घेऊन फिरायची काही गरज नाहीये, आपण आपला वेळ स्वतः मॅनेज करू शकतो…मग का आळशासारखं प्रत्येक अनुभवाला नाही म्हणायचं? पूर्वीपेक्षा तसं आयुष्य खूप सोपं झालंय मग या छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद आपण फक्त आपल्या स्टेटसला सांभाळण्यासाठी का हातचे घालवायचे?
यापेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ असं काय असतं? चकाचक मॉलमध्ये जाऊन फ्रिज केलेल्या भाज्या आणि फळं खरेदी करण? मला वाटतं श्रेष्ठ किंवा उत्तम हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. कारण कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची एक स्वतःची दृष्टी असते. स्वतःची व्याख्या असते. ही व्याख्याच तुम्हाला कधी चारचौघींसारखं तर कधी वेगळं जग बघायला लावते. फक्त गरज आहे ती कुठलीही गोष्ट करताना झापडं लाऊन करत नाही ना हे बघायची. जे दिसतंय त्याच्या पलिकडेही ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेण्याची. काय माहीत कदाचित तिथेच एखादा निखळ आनंद आपली वाट बघत असेल?
मग सांगा पाहू तुम्हीही जाता का आठवडी बाजारात , वेळ काढून?
अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६