You are currently viewing ‘उन सावली’

‘उन सावली’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम कथा*

 

*’उन सावली’*

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

********************

‘अरै…शेखर…..!’

‘एस….!’

‘एस काय म्हणतोस,ओळखलं नाही का?’

‘अं..वसुधा का!’

‘का म्हणजे!अरै मी वसुधाच थॅंक्स गॉड😊 चला नाव तरी लक्षात आहे तुझ्या’

‘अग किती बदल झालाय तुझ्यात!’

‘कॉलेज सोडून किती वर्ष झालीत,खूप दिवसांनी भेटतोय ना आपण मग’

‘खरचं हा योगायोगच म्हणावा’

‘नाहीतर काय जसं काॅलेज सोडलं त्यांनतर पहिल्यांदाच भेटतोय ना आपण.कोण कुठे, कुणालाच माहीत नाही आणि कुणाशी काही संपर्कच नाही…!’

‘हो खरयं माणूस एकदा संसाराला लागला की मग तो पुन्हा कधीच भेटत नाही.’

‘पण आज आपण भेटलोत केवळ या चित्रप्रदर्शनामुळे, म्हणजे ही दैवमर्जीच म्हणावी अर्थात ही आपली ग्रेट भेट’

‘यस’

‘नाही तरी ग्रेट माणसं आजकाल भेटतात तरी कुठे’😀

‘ऐ असं काही नाही हं वसुदा’

‘खर आहे की’

‘बाय दं वे तू इथे काय करतेस’

‘अरे मी इथेच रहाते या मुंबापुरीत दादरला माझं घर आहे.शॉपिंगला आले होते चित्रप्रदर्शन बघण्याचा मुड झाला नी काय तू भेटलास,पण तू इथे काय करतोस’

‘मी सुध्दा इथेच रहातो,सायनला,सायन काॅलेजला प्राध्यापक आहे’

‘अरै व्वा…😲खूप छान हं…. नाहीतरी तू हुशारच होतास म्हणा,शिवाय काॅलेजचा आदर्श विद्यार्थी,पण तू काहीही म्हण शेखर यात तुझे खूप परिश्रम आहेत हं घरची जेमतेम परिस्थिती असतानाही तू शिकायची जिद्द सोडली नाहीस शिवाय प्रतिकूल परिस्थितीचा भाव कधी चेहऱ्यावर येऊ दिला नाही हे तुझ्या कष्टाचं व परिस्थिती फलीत म्हणावं…चला उशिरा का होईना सुखाचे दिवस तर आलेत तुझ्या वाटेला’!.

‘सुखाचे दिवस…?’😌

‘म्हणजे’….

‘अजून तरी तसं काही नाही’

‘काही नाही म्हणजे’

‘पहायला गेलं तर.कायमस्वरूपी नौकरी आहे,मोठ्ठा पगार आहे,सगळं काही छान आहे पण सुख कुठेतरी थांबलय म्हणजे सुखाचे दिवस आहे पण सुख नाही.’

‘तुला म्हणायचं कायं शेखर’

‘चल,आपण समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन बोलूया’.

*************

‘…..बोल आता….’

‘तुझं सांग आधी’

‘माझं जाऊ दे रे तुझं सांग आधी…तू काही तरी म्हणालास ना की सुखाचे दिवस आहेत पण सुख नाही’…

‘तू ना वसुधा खरचं शब्दात पकडण्याची सवय गेली नाही तुझी’

जाणार कशी…जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना अगदी तसचं.काय….’

‘हो बाबा खर आहे’

‘लग्न तरी केलं का?की आपल‌ं असचं एकाटा जीव….

‘केलय ना.पण….’

‘पण काय आणखी….’

‘ए जाऊ दे गं वसुधा आपण वेगळं काही तरी बोलूया आधीच खूप दिवसांनी भेटतोय आपण..

‘नाही शेखर,तू काही तरी लपवतोय माझ्या पासून.मी तुझ्या चेहऱ्यावर आजही तेच दुःख बघतेय जे कॅलेजला असतांना बघायचे,तू कुठेतरी हरवल्या सारखा वाटतोय शेखर,तुला ना खूप काही बोलायचं पण तू मन मोकळे करता नाही.तुला आज सांगावचं लागेल शेखर.’

‘काय असतं वसुधा की ,कधी कधी दुःख एखाद्यावर एव्हढ प्रेम करतं की ते दुःख सतत त्याचा पाठलाग करत असतं.म्हणजे सुखाने त्याच्या जवळ येऊच नये असं त्या दुःखाला वाटतं.’

‘अरे पण आता तू प्राध्यापक आहेस सर्वकाही चांगले आहे मगं हे दुःख वगैरे कुठून आलं!…..’

‘अगं पद,प्रतिष्ठा पैसा यांच्याशी दुःखाला काही देणे घेणे नसते,एखादी व्यक्ती साधा सरळ असला की त्याला जास्त त्रास होतो,शेवटी मी ही माणूसच आहे मला मी मन आहे भावना आहेत पण मनातल्या वेदना कोणाला सांगाव्यात खूप अडचणीतून मार्ग काढीत आज कुठेतरी स्थिरस्थावर झालो पण जगण्याचा आनंद घेता येत नाही.जे पुर्वी होत तेच आजही आहे. वडिल कापड दुकानात कामाला तर आई लग्न कार्यात जेवण वाटण्याचं काम करायची आणि घराला हात भार लागावा म्हणून मी कुरीयर बॉयच काम करून त्या पैशात‌ घरचा आणि माझ्या शिक्षणाचा खर्च करायचो.माझं स्वप्न होतं की आईबाबांना या गरिबीतून काढायचं त्यांच्या कष्टांना कुठलेतरी विराम द्यायचा.त्यांना सुखात ठेवायचं असेल तर‌ नुसत शिकून चालणार नव्हतं तर मला सरकारी नौकरी शिवाय पर्याय नव्हता पण अशात बाबा गेलेत आणि आईने आथंरून धरले बाबा गेल्यामुळे काय झालं की नौकरी,आईचं आजारपण अगदी तारेवरची कसरत होती माझ्यासाठी. तरीही वेदना यातना संघर्षातून मार्ग काढीत तिन वर्षांनंतर मला सायन कॉलेजला नौकरी मिळाली आणि गाव सोडून मी इथे आलो मुंबईत. पर्मनंट नौकरी मिळाल्यामुळे तर आनंदाने घरात प्रवेश केला.आई आजारातून बरी झाली हाताशी पैसा येवू लागला, दिवस हळूहळू बदललेत,स्वतःच घर झालं,घराला घरपण देण्यासाठी आता सुन हवी म्हणून नात्यातील मुलीशी लग्न झाले.लग्नाला आठ वर्ष झाले तरी घरात पाळणा हालत नव्हता म्हणून निशा माझी बायको सारखी सारखी चिंतेत राहू लागली,आईलाही अधुन मधुन आजारपणाला तोंड द्यावं लागतं होते.अशी विवंचना पाहून तर माझ्यातला जगण्याचा आनंदच निघून गेला.पण दुवा,दवा,पुजा,पाठ फळाला आली आणि काही दिवसांनी निशाने आई होण्याची गोड बातमी दिली आणि काय साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या कारंज्यात उसळल्या,आई ठणठणीत बरी झाली माझ्या आनंदाला नव्याने बहर आला जगण्याची उमेद वाढली,निशाला तर बाळ येण्याची इतकी घाई झाली की बसं.पण काय त्या देवाला आमचं सुख पहावलं गेल‌ नाही’.

‘म्हणजे’.

‘म्हणजे विधात्याला काही वेगळंच मंजूर होत. निशाला सातवा महिना होता नेहमीप्रमाणे आई निशाला चेकअप साठी दवाखान्यात घेऊन जात होती तेव्हढ्यात एका रिक्षावाल्याने निशाला मागून जोरात धडक दिली आणि ती पोटावरच पडली,…….बाळ पोटातच मेले’ 😭

‘माय गॉड…!🫢

‘सर्व काही संपलं वसुधा.सारे काही मी हरवून बसलो त्या नंतर एक महिन्यांनी आईही मला सोडू गेली आणि एकटाच पडलो’😥

‘ बापरे….पण त्या नंतर मग पुन्हा निशा आई होण्यासाठी…..’

नाही….. कारण आघात एव्हढ जबरदस्त होता की निशा पुन्हा कधीच आई होणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आणि माझा देवा वरचा विश्वासच उडाला’.

‘नाही रे असं नाही;देव कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला येतच असतो’

‘नाही वसुधा या गोष्टीवर माझा जराही विश्वास राहीला नाहीआता.अगं एव्हढ्या मोठ्या आघातातून आम्ही कसतरी सावरलो आणि दोघांच्या गालावर हसु फुलायला लागले होते अशात सकाळी निशा आंघोळीच्या वेळी बाथरूममधे पाय घसरून डोक्यावरच पडली.खूप इलाज केला वेगवेगळ्या दवाखान्यात एकटाच घेऊन फिरलो पण तिचा वेडेपणा नाही दुर‌ करू शकलो…’

‘काय’…!😱

‘हो पडल्या मुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला’

‘मग तिची देखभाल घरातली कामे स्वयंपाक…..,’

‘मिच करतो,तसं तर दोघी वेळच जेवन मी करून घेतो,कधी कंटाळा आला तरच बाहेरून मागवून घेतो.

‘आणि तू कॉलेजला गेल्यावर’

‘तिला घरात कोंडून जावं लागतं…तशी ती वेडी असली तरी शहाणी आहे,ती घरात एकटीच बाहुली बरोबर खेळत असते तिला खायला काय लागते ते सारं टेबलावर ठेऊन जातो’

‘अरे पण घरात कामाला,तिच्या देखभालीसाठी एखादी बाई लावायची ना शेखर…..’

‘हं वेड्यांचा घरात कोण काम करेल बरं वसुधा तुच सांग.’

‘देवा…काय हे…. खरचं शेखर तुझ्या सहनशीलतेला आणि हिंमतीला दाद द्यावी लागेल किती मन घट्ट करून जातोस तू,तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर नाही हं तो जंगलाचं नसता.’

‘पण मी जगतोय वसुधा,निशा साठी जगतोय मी माझं तिच्यावर खूप प्रेम आहे.खूप प्रेम करतो तिच्यावर आम्हाला एकमेकांशिवाय दुसरं कोणी नाही.दिवस कसेही असलेत ना वसुधा तरी संसार आमचा सुखात चाललाय’

‘व्वा खरचं तू ग्रेट आहेस शेखर म्हणजे दुःखा सोबत राहून ही तू सुखात असल्यासारखा रहातोय,मानलं हं तुला मी.’

‘आता दुःखाने ही त्याची तीव्रता कमी केलीय…’

‘खरचं’

‘हो,बरं जाऊ दे चल…… सुख दुःखाच्या गप्पा तर चालतच राहणार आहे.तुझ काय चाललय ते सांग,काय करताय तुझे मिस्टर,तुझी मुलं.‌.’

मुलं….?’

‘ कसली मुलं नी कसलं काय,माझं ही दुःख काही वेगळं नाही शेखर,तुझा माझा मार्ग सारखाच आहे वळण मात्र वेग वेगळी आहेत’

‘म्हणजे!’

‘मुलगी मोठी झाली की आई वडीलांपेक्षा जवळच्यांनाच तिच्या लग्नाची फार घाई झालेली असते कॉलेज सुटलं आणि आई वडिलांनी वर संशोधन सुरू करायला सुरुवात केली त्यात एक अट म्हणजे अशी की मी एकुलती एक तेव्हा माझ्या सकट आईवडीलांना सांभाळून घेईल असा नवरा हवा होता मला.त्यात नातेवाईक तर नावापुरती असतात कोणी बघायला किंवा सुचवायला तयार नाही.निम्मे वय होऊन गेले तेव्हा कुठे एक स्थळ मिळाले मुलगा एका नामांकित कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे असं सांगुन माझं लग्न झालं पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते तरी जे आले पदराशी ते बांधुन घेतले गाठीशी,काय करणार काही दिवस सुरळीत चालले पण नवरा म्हणायचा की वडीलांच घर माझ्या नावावर कर,पण मी नाही म्हणायचे म्हणून आमच्यात भांडण होवू लागली.या गोष्टींसाठी वडिलांनीही नकार दिल्यावर तर तो हातात जे सापडेल‌ त्याच्याने मला मारझोड करायचा. नवऱ्याचा त्रास खूप असाह्य व्हायला लागला शोवटी विभक्त होण्याचा विचार केला पण त्याआधीच नवरा अपघातात गेला.ऐन तारूण्यात मुलगी विधवा झाल्याचं दुःख आईला सहन झालं नाही आणि तिनं वर्षाच्या कालावधीत आई बाबा दोघंही सोडून गेले.माणसांच्या गर्दीत मी एकटे पडले रे शेखर.😢त्या वेळी आपलं म्हणून कोणीही जवळ नव्हते कोणाचेही सहकार्य मिळाले नाही जवळचे सख्ये सारे नातेवाईक दुर झालेत.आता जगाव की मरावं हा एकच प्रश्न डोळ्यासमोर उभा होता.जगावं तर कोणासाठी आणि मरावं तर का. आयुष्य म्हणजे शेवटी काय,ऊन सावलीचं ना रे शेखर…’

‘खर आहे तुझं मग दुसरं लग्न…..’

‘कोणावर विश्वास ठेवायचा एकाने एव्हढा त्रास दिल्यावर दुसऱ्याकडून काय अपेक्षा ठेवायची घरदार प्रॉपर्टी पाहून कोणीही लग्न केलं असतं रे पण प्रेम नसतं मिळालं.माणसं आहेत रे पण त्यांच्यात माणूसकी दिसत नाही आपलेपणा दिसत नाही तेव्हा प्रेम तरी कसं मिळेल.’

‘अं…ते पण खरंच आहे म्हणा’

‘म्हणून मी लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि स्वतःच दुखः कुठे तरी विसरावं म्हणून मी एका मुक बधीर आणि मतीमंद मुलांच्या शाळेत नोकरीला लागले.आते तेच माझ‌ं विश्व आहे.जगतेय रे मी शेखर या वासनेने बरबटलेल्या गिधाड माणसांच्या गर्दीत स्वतःला सावरतं.इथून पुढे माझं काय होईल मला माहीत नाही,तरीही मी जगतेय.पण एक सांगु शेखर जगण्याला कुणाचा तरी आधार‌ असला ना तर मरण्याची भिती वाटत नाही. खूप प्रेम करणाऱ्या आपल्या माणसांच्या खा़ंद्यावर डोकं ठेऊन मन मोकळे तरी करता येते.जगण्याचा आनंद तरी घेता येतो पण त्याला ही नशीब लागते खरचं एकट्या माणसाला जगणं खूप अवघड जातं’.

‘हो खरं आहे वसुधा,एकट्या माणसाला जगणं खूप अवघड जातं,सुख दुःखाची देवाणघेवाण करायला कोणाचा तरी आधार असायला हवा.काही हरकत नाही माझ्याकडून तुझ्यासाठी काही करता आले तर मी निश्चित प्रयत्न करेल’

‘म्हणजे….’

एखाद्या वधू वर सूचक मंडळा मार्फत तुझ्यासाठी चांगला मुलगा सुचवण्यासाठी सांगेन मी त्यांना’

‘तू नाही होऊ शकत माझ्या आयुष्याचा आधार शेखर?’

‘काय बोलतेस तू वसुधा ऊगाच काहीही बोलू नकोस’

‘का!कॉलेजला असताना मी तुला आवडायची ना?तुला माझ्याशी लग्न करायचं असा निरोप तू तुझ्या मित्रांच्या हातून पाठवला होतास मगं’

‘हो,पाठवला होता पण तुच नकार दिसलास ना?तुच म्हणाली होतीस की शेखर तू दिसायला चांगला आणि हुशार मुलगा आहेस पण मी एका प्राचार्यची मुलगी आणि तुझे वडील कुठेतरी कामाला तेव्हा हे जमून येणं शक्य नाही असं म्हणून तू नाकारलस मला,आणि आज बघ काय अवस्था आहे तुझी.वेळ काळानुसार दिवस बदलतात वसुधा दिवस कुणाचे एकसारखे नसतात.तेव्हा माणसाने माणसाला समजून घेतले तर ह्रदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी प्रेम शिल्लक रहात काय,बघ स्वतः कडे तेव्हा तू काय होतीस आणि आज मी कुठे आहे.’

‘😭😭😭खरच चुकले रे मी शेखर मी तुला नाही समजू शकले वेळ निघून गेल्यावरच समज आली रे.’

‘ पण आता काय उपयोग,खरत माझंच चुकलं होतं एका गरीब मुलाने एका प्राचार्यच्या मुली सोबत लग्नाचे स्वप्न बघायला नको होते पण माझी परिस्थिती बदलवण्याचा मला आत्मविश्वास होता म्हणून मी तुला लग्नाच मागणं घातलं होतं पण तुला तुझ्या श्रीमंतीचा गर्व होता ना’

‘तसं नाही रे शेखर…’

‘चल सोड आता तो विषय झालं गेल‌ं ते विसर माझं आयुष्य कसंही असलं ना तरी मी सुखात आहे’

‘ तुझं आयुष्य कसंही असलं तरी त्यात प्रेम नाहीये ना.काही गोष्टी सांगायला असता शेखर,पण मन समजून घ्यायला तयार नाही. मला कळतंय तू आतून खूप तुटलाय,खचलाय तू बोलू शकत नाही,अशा वेळी तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे.शेखर अरे कळतंय का तुला नियतीनेच आपल्याला पुन्हा एकत्र आणलय’

‘हे बघं वसुधा हे नियती फिरतीवर माझा विश्वास नाही….’

‘समजू शकते मी तुला पण तुझं माझं आयुष्य अशा वळणावर आहे की तिथे फक्त अंधार आहे आणि अशा अंधारातून बाहेर पडायला एकमेकांना आधाराची गरज आहे.तेव्हा मी खरचं भ्रमात होते म्हणून तुला नकार दिला पण आता….आज’

‘नाही वसुधा नाही तू चुकीचा विचार करू नकोस,तुझं माझं दुःख सारखं असलं तरी आयुष्य वेगळ आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप सुखात आहे. मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो माझं आयुष्य फक्त तिच आणि तिच्यासाठीच आहे.माझी निशा वेडी जरी असली ना तरी ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे समजलं!’

‘मग तू काय शेवटपर्यंत….’

‘हो… शेवटपर्यंत मी तिच्यासाठी जगणार आहे माझ्या संघर्षाच्या काळात तिने मला खूप साथ दिली माझ्या दुःखात तिने मला खूप धिर दिला,अडचणी आधार दिला तिने मला कधीच रडू दिले नाही.तिच दुःख तिचा त्रास तिने मला कधीच सांगीतला नाही ती सतत हसत रहायची आणि मला हसर ठेवायची तेव्हा मला तिच्यासाठीच जगायचं आहे आणि मी तिचाच राहून जगणार आहे.समजलं चल निघतोय मी आता…’

‘पुन्हा कधी भेटशील’

‘कधीच नाही.एकदा जर भेटीची सवय लागली ना वसुधा,तर मन बदलायला वेळ लागत नाही आणि मन बदलली की आपली सख्यी माणसं दुरावतात तेव्हा असं काही होईल असं तू करू नकोस आणि मला शोधू नकोस माझा जराही विचार करू नकोस तुझं आयुष्य तू तुझ्या पध्दतीने जगं माझं मला जगू दे’

‘अरे…पण… ‘

‘जातो मी’

‘नाही शेखर,येतो म्हण’

‘नाही….. ‘

 

*’संजय धनगव्हाळ’*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा