You are currently viewing भारतासाठी संमिश्र होता दुसरा दिवस

भारतासाठी संमिश्र होता दुसरा दिवस

*नेमबाजीत पदक जिंकले, बॅडमिंटनमध्ये आशा कायम*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतासाठी दुसरा दिवस शानदार ठरला. मनू भाकरने नेमबाजीत कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले आहे. तिने १० मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून आपले पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. रमिता जिंदालनेही पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. तिने १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 

टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुलाने दमदार कामगिरी करत आपला पहिला सामना जिंकला, मनिका बत्रा देखील तिचा पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरली, परंतु अनुभवी पुरुष टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर बाहेर पडला.

 

तिरंदाजीतही भारताला निराशेचा सामना करावा लागला. दीपिका कुमारा, अंजली भगत आणि भजन कौर या त्रिकुटाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. सेलिंगमध्ये बलराज पनवारने रिपेचेजमध्ये दमदार कामगिरी दाखवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

 

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी विजयाने सुरुवात केली आहे. टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाईचाही पराभव झाला.

 

जलतरण स्पर्धेत भारताचे आव्हान रविवारी संपुष्टात आले. श्रीहरी नटराज आणि धिनिधी देसिंघू आपापल्या श्रेणींमध्ये उपांत्य फेरी गाठू शकले नाहीत. नटराजने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये ५५.०१ सेकंदाच्या वेळेसह संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला होता. एकूण गुणतालिकेत तो ३३व्या स्थानावर आहे. अव्वल १६ जलतरणपटूच उपांत्य फेरीत पोहोचतात.

 

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला मोठा झटका बसला आहे. त्याचा पहिल्या फेरीचा विजय अवैध ठरला आहे. त्याने शनिवारी पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन स्पर्धेत ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनवर विजय मिळवला होता. मात्र, आता कॉर्डन कोपरच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हकालपट्टीमुळे सेन याची मेहनत व्यर्थ गेली. याचा अर्थ लक्ष्यचा केव्हिन कॉर्डनवर झालेला विजय क्रमवारीत मोजला जाणार नाही. आता भारतीय बॅडमिंटनपटूला आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. जे. क्रिस्टीविरुद्धचा चुरशीचा सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचे भवितव्य ठरवेल.

 

रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी या भारतीय जोडीला पहिल्याच फेरीत गेल मॉनफिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन या फ्रेंच जोडीकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रेंच जोडीने त्यांचा ५-७,६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह फ्रेंच जोडीने दुसरी फेरी गाठली. आता त्यांचा सामना टीम पुएत्झ आणि केविन क्रॅविट्झ या द्वितीय मानांकित जर्मन जोडीशी होणार आहे. याआधी पुरुष एकेरीत भारताचा एकमेव टेनिसपटू सुमित नागल याला पहिल्या फेरीत फ्रान्सच्या कोरेंटिन माउटेकडून तीन सेटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले.

 

दोन वेळची विश्वविजेती निखत जरीनने रविवारी येथे जर्मनीच्या मॅक्सी करीना क्लोत्झरचा पराभव करून ऑलिम्पिक महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. येथील नॉर्थ पॅरिस एरिना येथे झालेल्या शेवटच्या ३२ फेरीच्या सामन्यात २८ वर्षीय निखतने जर्मन बॉक्सरवर ५-० असा विजय मिळवला. गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये निखतला आशियाई क्रीडा स्पर्धा आणि सध्याची फ्लायवेट वर्ल्ड चॅम्पियन चीनची वू यू हिचे आव्हान असेल. अव्वल मानांकित वू यूला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा