_*मुंबई विद्यापीठाचा ५७ वा विभागीय युवा महोत्सव ५ ऑगस्ट रोजी….*_
_*भोसले फार्मसी कॉलेजला यजमानपद जाहीर….*_
_सावंतवाडी :
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं असून यावर्षी यजमानपदाचा मान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला मिळाला आहे._
_या महोत्सवामध्ये नृत्य, गायन, संगीत, ललित कला आणि साहित्य अशा विविध विषयांच्या स्पर्धा घेण्यात येतात. सिंधुदुर्ग विभागीय युवा महोत्सव सोमवार ५ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होईल. युवा महोत्सवामध्ये सादरीकरण करणे ही विद्यार्थ्यासाठी एक सुवर्णसंधी असते. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाने रंगभूमी आणि मनोरंजन विश्वाला अनेक दर्जेदार कलाकार दिलेले आहेत. या विभागीय महोत्सवात जिल्ह्यातील चाळीस महाविद्यालये व जवळपास एक हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होतील._
_कार्यक्रमाचे आयोजन दर्जेदार व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्राध्यापक डॉ.आशिष नाईक आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप काम पहात आहेत. समन्वयक म्हणून प्रा.गायत्री आठलेकर व प्रा.संयुजा निकम जबाबदारी सांभाळत आहेत. कॉलेजला पहिल्यांदाच महोत्सवाच्या आयोजन पदाचा मान मिळाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या._