You are currently viewing मालवण शहरात हत्तीरोगाचे मिळाले तीन रुग्ण…

मालवण शहरात हत्तीरोगाचे मिळाले तीन रुग्ण…

मालवण शहरात हत्तीरोगाचे मिळाले तीन रुग्ण…

शहरात १३ हजार लोकसंख्येचे सर्व्हेक्षण सुरू:जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी
मालवण शहरात तब्बल दहा वर्षानंतर ८ जुलै २०२४ रोजी सापडलेल्या हत्तीरोग बाधित रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे त्यानंतर १५ ते १७ जुलै या कालावधीत घेतलेला विशेष सर्वेक्षनात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मालवण शहरातील १३हजार लोकसंख्येचे हत्तीरोग सर्वेक्षण आज पासून विशेष दहा पथकामार्फत करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांनी केले आहे.

मालवण शहरात तब्बल दहा वर्षानंतर हत्तीरोग बाधित तीन रुग्ण सापडल्यानंतर सुरू असलेल्या उपाय योजनेबाबत आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ स्वप्नील बोधमवाड उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉसई धुरी म्हणाल्या, बाधित रुग्ण आढळलेल्या मालवण शहरातील गवंडीवाडा, सोमवार पेठ या भागातील रहिवाशांचे एकूण १२३२एवढे रक्त नमुने संकलित करण्यात आलेले होते. सदर रक्त नमुनांची जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत विशेष तपासणी पथकामार्फत केलेल्या तपासणीत तीन रक्त नमुने दूषित आढळलेले आहेत. या तीनही रुग्णांना त्वरित प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्यात आलेला आहे. तसेच खबरदारी म्हणून मालवण शहरातील सर्व १३ हजार लोकसंख्येचे हत्तीरोग सर्वेक्षण करण्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आज २६ जुलै पासून मालवण शहरात दहा विशेष पथकामार्फत रात्र कालीन रक्त नमुना सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय कीटक समहारक पथकामार्फत प्रत्येक वार्डामध्ये कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. डांस अळी नियंत्रणासाठी व धूर फवारणीसाठी जिल्हास्तरावरून अळीनाशकाचा पुरवठा स्थानिक स्वराज्य संस्थेत करण्यात आलेला आहे. रात्र कालीन रक्तनमुना सर्वेक्षण पथकाकरीता आवश्यक सर्वेक्षण साहित्य जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सर्वेक्षणाबाबत नियोजन व सनियंत्रण करण्यात येत आहे. मालवण शहरांमध्ये सापडलेल्या बाधित तिन्ही रुग्णांमध्ये सद्यस्थितीत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत मात्र त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन तात्काळ उपचार सुरू केले आहेत. तसेच सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दोन वर्षा आतील मुले आणि गंभीर आजारी व्यक्ती त्यांचे रक्त नमुने घेतले जाणार नाहीत. आवश्यक असलेल्या गोळ्या व फवारणीसाठी डी टी आर पावडर उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी डॉ सई धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी स्वप्निल बोदमवाड म्हणाले, मालवण शहर हत्ती रोगासाठी जोखीमग्रस्त आहे .या शहरातील हत्तीरोग सर्वेक्षणामध्ये सन २०१४ पर्यंत आढळलेले ७० रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी ५१ बाह्य लक्षणे युक्त रुग्ण व २ अंडरुद्दी रुग्ण असे एकूण ५३ रुग्ण मालवण शहर विभागातील आहेत. सर्व रुग्णउपचाराखाली आहेत तर सन २०१४ ते मे २०२४ या कालावधीत एकही हत्तीरोग रुग्ण आढळून आलेला नाही. हत्तीरोग रुग्ण शोधण्यासाठी हत्तीरोग रात्र चिकित्सालय मालवण मार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. हत्तीरोग हा कीटकजन्य आजारामध्ये मोडतो दूषित क्युलेक्स डासाच्या चाव्यामुळे हत्ती रोगाचा प्रसार होतो. तर अयोग्य पद्धतीची गटारे, घाण व प्रदूषित पाण्यात या डासाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. मानवी रक्तात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हत्तीरोग जंतू आढळतात त्यामुळे रात्री ८ ते १२ या दरम्यान रक्त नमुना संकलित करून हत्ती रोगाचे निदान करता येते. त्यानुसार नव्याने हत्तीरोग सापडलेल्या बाधित क्षेत्रात व मालवण संपूर्ण शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे हे सर्वेक्षण रात्रीच्या वेळी आठ ते बारा या वेळेत होणार असल्याने मालवण शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णाचा शोध आणि त्यावर उपाय योजना करून हत्तीरोग निर्मूलनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. अशी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा