सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील एका विहिरीत गाईचे वासरू पडले होते. न्हावेली येथील रहिवासी बंटी नाईक यांनी पावसाने भरलेल्या धोकादायक विहिरीत उतरून ग्रामस्थांच्या मदतीने वासराला सहिसलामत विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले.
न्हावेली येथील हिरव्या कापडाने झाकलेल्या विहिरीच्या शेजारी गाईची दोन जुळी वासरे एकमेकांशी झुंजत असताना त्यातील एक वासरू झुंजताना विहिरीवर कापड झाकलेले असल्याने अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडले. विहिरीच्या काठावर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या जुळ्या वासराने हंबरडा फोडल्याने ग्रामस्थांच्या सदर घटना लक्षात आली. तात्काळ तेथील रहिवासी बंटी नाईक यांनी विहिरीत उतरत दोरीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने बुडणाऱ्या वासराला जीवदान दिले.
एकीकडे माणूस माणुसकीला पारखा होत चालला असताना मुका जीव म्हणून ज्यांची गणना होते असे गाईचे वासरू आपल्या सोबत भांडत असलेले जुळे वासरू झुंजता झुंजता विहिरीत कोसळल्यावर त्याचा जीव वाचावा म्हणून विहिरीच्या काठावर जीवाच्या आकांताने हंबरडा फोडून ओरडत होते. खरतर जीव जरी मुका असला तरी त्याचा आक्रोश हृदय हेलावून सोडणारा होता. मुका जीव असला आणि त्याला आपल्यासारखे बोलता आले नाही तरी स्वतःच्या आवाजात बोलत ते जुळ्या वासराला वाचविण्यासाठी आपल्या परीने करत असलेले प्रयत्न खरंच वाखण्याजोगे होते. माणूस माणुसकी विसरला तरी मुक्या जीवाने मुक्या जीवाप्रती दाखवलेली माणुसकी म्हणजे माणसांसाठी खरी शिकवण आहे.