You are currently viewing बांद्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळ सदृश परिस्थितीमुळे अनेक बागायती उध्वस्त

बांद्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळ सदृश परिस्थितीमुळे अनेक बागायती उध्वस्त

बांद्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळ सदृश परिस्थितीमुळे अनेक बागायती उध्वस्त

महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू..

बांदा

बांदा शहर व परिसराला काल बुधवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी महावितरण कंपनीचे वीज खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्रीपासून आज दिवसभर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत बांदा शहरातील वीज पुरवठा पूर्ववत केला. यामध्ये महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोनशी, तांबोळी व असनीये ही गावे गेली दोन दिवस अंधारात आहेत. डिंगणे, गाळेल परिसरात चक्रीवादळाने अनेक बागायती उध्वस्त झाल्या असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून सुरु आहेत.

गेले दोन दिवस बांदा परिसरात जोरदार वादळी पाऊस कोसळत आहे. गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली.
वादळी पावसाचा सर्वाधिक फटका हा असनीये पंचक्रोशीला बसला. कोनशी, तांबोळी व आसनीये येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दोन ठिकाणी मुख्य वीज वहिनी तुटून पडल्याने व ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजपुरवठा खंडित झाला. गेले दोन दिवस वीज खंडित असल्याने याठिकाणी महावितरण कडून युद्धापातळीवर काम सुरु आहे. विलवडे येथे तीन ठिकाणी वीज वाहक तारा तुटल्याने १५ हून अधिक ग्राहक बाधित झाले आहेत. भालावल येथे मुख्य वाहिनीचा खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. वाफोली येथे खांब पडल्याने ५० हून अधिक वीज ग्राहक बाधित झाले आहेत. नेतर्डे येथे तीन, डेगवे येथे दोन व बांदा येथे एक खांब पडल्याने शेकडो ग्राहक बाधित झाले आहेत. बांदा, डिंगणे, नेतर्डे व वाफोली येथे ११ फ्युज कंडक्टर निकामी झाल्याने या परिसरातील शेकडो ग्राहक हे काळोखात आहेत.
बांदा परिसरात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे कोसळली आहेत. त्यामुळे तारा तुटून रस्त्यावर पडल्या. मात्र तात्काळ रात्रीच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांच्यासह कर्मचारी यांनी रात्रभर तसेच आज दिवसभर बिघाड दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये वीज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गाळेल, नेतर्डे व डिंगणे येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कोट :-
पाऊस पडत असताना १५ ते २० मिनिटांची छोटी छोटी वादळे होत असल्याने याचा फटका महावितरणच्या सेवेवर होत आहे. जंगलातून व गर्द झाडीतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांवर झाडे किंवा झाडांच्या फ़ांद्या कोसळत असल्याने वीज तारा तुटणे तसेच खांब पडण्याच्या घटना घडतं आहेत. गेल्या आठ दिवसात हे प्रकार वारंवार होत असल्याने याचा परिणाम वीज सेवेवर होत आहे. महावितरणचे कर्मचारी हे दिवसरात्र तांत्रिक तसेच नैसर्गिक बिघाड दूर करून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा