You are currently viewing अखेर महाराष्ट्र शासनाकडून ऑटो रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना

अखेर महाराष्ट्र शासनाकडून ऑटो रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना

ऑटो रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालकांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा मिळणार लाभ

 

स्वाभिमानी कामगार संघटनेकडून शासनाच्या निर्णयाचं स्वागत..!

 

महाराष्ट्र शासनाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती मात्र मंडळाची कार्यपद्धती,रचना व नियमावली या बाबींची निश्चिती करण्यात आलेली नव्हती. राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांसाठी इमारत बांधकाम कामगार, घरेलू कामगार,माथाडी कामगार कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर मंडळाची स्थापना व्हावी व त्यातून त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जाव्यात यासाठी तत्कालीन कामगार मंत्री हसनजी मुश्रीफ यांची भेट घेत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात मंडळ स्थापनतेबाबत निर्णय करण्याची मागणी केली होती.मागील जवळपास दहा वर्षे अनेक संघटनांमार्फत याबाबतीत शासन स्तरावर पत्रव्यवहार व पाठपुरावा देखील चालू होता.अखेर शासनाने कल्याणकारी मंडळाच्या कार्यपद्धती व नियमावली निश्चिती करून प्रभावी अंमल बजावणी करण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळ समिती गठीत केली असून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्ह्यास्तरीय कार्यकारी समितीमार्फत ऑटो रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालकांची मंडळात रीतसर नोंदणी केली जाणार असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अनेक कल्याणकारी सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. या कल्याणकारी मंडळामार्फत जीवनविमा व अपंगत्व विमा योजना,आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५० हजारांपर्यंत),पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना,कामगार कौशल्य वृद्धी योजना,६५ वर्षावरील ऑटोरिक्षा/मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान,नविन ऑटो-रिक्षा / मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज आदी योजना राबविल्या जाणार आहेत. राज्य सरकारच्या ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापना करून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या धोरणाचे स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीने स्वागत असून संघटनेच्यावतीने जिल्ह्यात या संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याचे माहिती स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा