You are currently viewing दे टाळी

दे टाळी

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाचे ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*दे टाळी*

 

परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो . वक्ता गंभिर पणे आपले विचार व्यक्त करीत होता . सर्व सभागृह स्तब्ध होते . आणि अचानक टाळ्यांचा कडकडाट कानावर आलां , जो तो आजुबाजूला , मागेपुढे पाहू लागला ! पण प्रेक्षकतर सगळे स्तब्ध होते , स्टेजवर पण भयाण शांतता ! कोणालाच काही समजेना ,उमजेना की हा टाळ्यांचा कडकडाट येतोय कुठून ? आणि टाळ्यांचा कडकडाट जसा अचानक आलां तसा क्षणांत बंदही झाला ! त्याचे झाले असे की कोणा एका सद्गृहस्ताचा फोन वाजत होतां व तो टाळ्यांच्या आवाजाचा रिंगटोन बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न ( जमेल तेवढा लाजून ) करत होता ! व शरमेने तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होतां ! खरंच अशावेळी माणसाची काय अवस्था होते नाही ?

खरंतर हरी नामाचा गजर करणाऱ्या टाळ्या , कौतुकाच्या आणि आनंदाच्या टाळ्या , कलेला मनापासून दाद देणाऱ्या टाळ्या , स्वागत करणाऱ्या टाळ्या , शुक् शुक् करून ( वेगवेगळे ) संकेत देणाऱ्या टाळ्या ,सत्काराच्या – विजयाच्या टाळ्या . खेळातील आनंदाच्या टाळ्या .

प्रसंग वेगवेगळे, परंतु सगळ्या प्रसंगांच्या शेवटी एक सामायिक गोष्ट घडतेच घडते आणि ती म्हणजे उपस्थित प्रेक्षक, श्रोते यांच्याकडून होणारा टाळ्यांचा कडकडाट. एखादी कलाकृती आवडल्याची ती पोचपावती असते. टाळ्या पडल्यानंतरच आपल्या कामाचे चीज झाल्याची भावना कलाकाराची होते. टाळी ही आनंद व्यक्त करण्याची अगदी सोपी प्रक्रिया नि उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. पण असं काहीही नसतांना अचानक हा टाळ्यांचा रिंगटोन वाजला आणि सगळे अवाक् झाले .

मी पण झालो .

थोडा विचार करू लागलो की या आनंद देणाऱ्या किंवा व्यक्त करणाऱ्या टाळ्यांमागे नेमकं काय दडलंय ?

आता पहा आपण घरी किंवा देवळात आरती करत असतांना अगदी सहज आरतीच्या चालीवर तालबद्ध टाळ्या वाजवायला लागतो. आरती म्हणताना, किर्तन, भजन करताना टाळ्या वाजविणे ही पूर्वापार चालत आलेली प्रथा. टाळ्या वाजवून देवाची प्रार्थना केल्यानं पापाचं क्षालन होतं, असं पूर्वज सांगत आले आणि आपण ऐकत आलो. हे यामागचं धार्मिक कारण झालंं. परंतु टाळ्या वाजवणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही हितावह आहे. अर्थात यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत.

तसे टाळी वाजवल्यामुळे अनेक फायदे पण आहेत

टाळी वाजवणे हा एक व्यायाम आहे. आपल्या शरीरात अनेक प्रेशर पॉइंट्स असतात, ज्या पैकी 28 आपल्या हातावर असतात. टाळी वाजवल्यामुळे हे प्रेशर पॉइंट्स दाबले जातात. व त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. टाळी वाजवल्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि शरीरात ऑक्सिजनचा संचारही व्यवस्थित होतो.

टाळी वाजवल्यामुळे काही रुग्णांना जसे सांधेदुखी, मान आणि पाठीच्या दुखण्याने त्रस्त असणारी मंडळी , यामुळे कदाचित प्रेशर पॉइंट दाबल्याने वेदना कमी होत असाव्यात !

टाळी वाजवल्यामुळे रक्तसंचार वाढतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगल्या पद्धतीने होतो आणि ऑक्सिजनचा प्रवाह चांगला झाल्यामुळे फुफ्फुस निरोगी राहतात. रक्ताभिसरण वाढते. व ते आपल्या शरिराला उपयुक्तच आहे नाही कां?

लहान मुलांनी पण टाळी वाजवणे फायदेशीर असते. यामुळे कोणताही व्यायाम न करता खेळताखेळताच त्यांच्या हाताचे प्रेशर पॉइंट दबले जातात. ज्यामुळे रक्तसंचार वाढतो .

कौतुकाने वाजवलेल्या टाळ्या कोणाला आवडत नाहीत? लहान मुलेसुद्धा आनंद झाल्याची प्रतिक्रिया टाळ्या वाजवूनच देतात. त्यांना कशी टाळी वाजवायची हे सांगावंही लागत नाही. मोठ्यांचं अनुकरण करत ती मुलं टाळ्या वाजवतात. त्यावेळेस त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. लहान मुलांचं दुडक्या चालीत चालणं, बोबडं बोलणं जितकं लोभस असतं ना तितकंच टाळ्या वाजवणं हे देखील दृष्ट लागण्याजोगं असतं. त्यांच्या बाललीला पाहून आपण टाळ्या वाजवल्या तर त्यांनाही कोण आनंद होतो.

किन्नरांना पोटाची खळगी भरण्यासाठी टाळीचा वापर होतो. तृतीयपंथीयांचं संपूर्ण जीवन टाळ्यांवर असतं. हे किन्नर लोक आपल्या समुदयातील लोकांना संकेत देण्यासाठी सुध्दा टाळ्या वाजवत असतात .

आमच्या लहानपणी तशी करमणूकीची साधनं फारच तुटपुंजी असायची . गावांतल्या मंदीरातिल किर्तन ( ते ही घरातिल एखाद्या वयस्कर माणसाने नेलं तर ! कारण आम्ही तसे उपद्व्यापी !!) त्यातही टाळ्या वाजवायची आवश्यकता फक्त भजनांत पडत असे , नाही म्हणायला आमच्या शाळेत फिरते जादुगार येत असे तेंव्हा वा शाळेतून जात – येत असतांना रस्त्यावरचे डोंबारी – खेळ चालू असतांना – टाळ्यांचा भडिमार निदान मी तरी करीत असे ( त्या मुळे शाळेला झालेला ऊशीर आणि बनलेला “कोंबडा “अजूनही चांगलाच स्मरणांत आहे !)

मराठी माणसं तशी टाळ्या वाजवून दाद देण्यांत कंजूष आहेत असा सरसकट समज आहे ! ( पण मी पुण्यात आल्या पासून ही आवई खोटी आहे हा स्वानुभव !)

बऱ्याच टि. व्ही मालिकेत (मराठी सोडून ) हंशा आणि टाळ्या अक्षरशः पेरलेल्या असतात . मला तर काही वेळेस हे कां हसताय किंवा टाळ्या वाजवत आहे ? हाच प्रश्न पडतो . कघी कघी तर त्याचा अतिरेक ही झालेला असतो !

आपण सकाळी एखाद्या बागेत वगैरे ठिकाणी पहातो की बरीच माणसं विनाकारण टाळ्या वाजवत असतांत असे आपणांस वाटते , पण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते हा केवढा फायदा !

तर मग या गोष्टी वर “द्या टाळी “!!

 

*अनिल देशपांडे *

प्रतिक्रिया व्यक्त करा