You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ विधानसभा प्रमुख; तर महिला विधानसभा संघटकपदी सुकन्या नरसुलेंना संधी

 

सावंतवाडी :

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली आहे. यात जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी विधानसभेसह कुडाळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी रुपेश राऊळ यांच्याकडे देण्यात आली आहे. तर महिला संघटक म्हणून सुकन्या नरसुले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नुकत्याच जाहीर करण्यात आले आहेत याबाबत ठाकरे शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.

बाबुराव धुरी हे यापूर्वी दोडामार्ग येथील उपजिल्हाप्रमुख या पदावर होते. त्यांना बढती देऊन थेट जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर रुपेश राऊळ हे सावंतवाडी तालुकाप्रमुख पदावर होते. त्यांना सावंतवाडी विधानसभा प्रमुखपदी बढती दिली आहे. रुपेश राऊळ हे गेली बारा वर्षे सावंतवाडी तालुकाप्रमुख म्हणून काम करत होते. तर बाबूराव धुरी हे प्रथम दोडामार्ग तालुकाप्रमुख त्यानंतर उपजिल्हाप्रमुख पदावर काम करत होते.

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते यांना (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले आणि कुडाळ) तालुका सहसंपर्कप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. याआधी ते जिल्हाप्रमुखपदी होते. तर रुपेश राऊळ आणि बाबूराव धुरी हे दोघेही पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत.

सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुखपदी कालिदास कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे हे पद मुंबई मनपाचे माजी नगरसेवक शैलेश परब यांच्याकडे होते. त्यांना अंधेरी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सावंतवाडी विधानसभा महिला संघटकपदी वेंगुर्ले येथील सौ सुकन्या नरसुले यांना संधी देण्यात आली आहे. त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी हा फेरबदल व खांदेपालट करण्यात आली आहे. महायुतीला टक्कर देऊन पुन्हा येथील शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा