You are currently viewing मच्छिमारांबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर होतील!

मच्छिमारांबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर होतील!

मत्स्यधोरणास खासदार आमदारांचाच विरोध – बाबा मोंडकर

मुबंईत उद्या होणाऱ्या बैठकीत मच्छिमारांच्या समस्या मांडणार…

मालवण

गेल्या दहा वर्षात येथील माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक या विरोधकांनी मत्स्य धोरण न होण्यासाठी प्रयत्न केले. मच्छिमारांबाबत जे काही निर्णय झाले ते सर्व आपणच केल्याची शोबाजी राऊत व नाईक यांनी केली. मात्र राष्ट्रीय मत्स्य धोरण जाहीर होण्यासाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रीय मत्स्य धोरणा बाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्या २३ रोजी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. यामध्ये मच्छिमारांबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर होतील, असा विश्वास भाजपचे मालवण शहराध्यक्ष आणि मत्स्य धोरण महाराष्ट्र समितीचे सदस्य बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, दादा वाघ, जॉन नरोना, महेश सारंग, सौरभ ताम्हणकर, दत्तात्रय केळूसकर, बबलू राऊत, ललित चव्हाण, आबा हडकर, निषय पालेकर, निनाद बादेकर, नंदू देसाई, नितेश पेडणेकर आदी उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी कोणत्याही धोरणाचा आधार नव्हता. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी व मत्स्य धोरण ठरविण्यासाठी प्रथमच एक समिती गठीत झाली. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात कोणतीही समिती गठीत झाली नव्हती. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात समिती गठीत झाली. याच समितीची बैठक उद्या मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर होणार आहे.
सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर मच्छिमार कुटुंबे आहेत. येथील पारंपरिक मच्छिमारांसमोर पर्ससीन व एलइडी मासेमारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र पर्ससीन व एलइडी एवढ्याच पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या नसून अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत. अनधिकृत मासेमारीवर ड्रोन द्वारे लक्ष ठेवणे, गस्ती नौका तैनात करणे याबाबत आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रयत्न झाले नाहीत. गेल्या दोन वर्षात मच्छिमारांबाबत ज्या काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, त्या आपणच केल्या अशी जाहिरात व शोबाजी आमदार नाईक व विनायक राऊत यांनी केली. मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून उद्या होणाऱ्या बैठकीत मच्छिमारांचे विविध प्रश्न आपण मांडणार आहोत. मच्छिमारांना डिझेलप्रमाणे पेट्रोलवर परतावा मिळावा, किनारपट्टीवरील सीआरझेड च्या प्रश्नावर मार्ग निघावा, शेरे जमिनी किंवा मासेमारी गावातील जमिनी मच्छिमारांच्या मालकीच्या व्हाव्यात, बंद पडलेल्या मत्स्य संस्था पुनर्जीवीत कराव्या, मासेमारी बंदी कालावधीत मत्स्य विक्रेत्या महिलांना अनुदान मिळावे, मासेमारीतून होणाऱ्या निर्यातीमध्ये मच्छिमारांना लाभ मिळावा, मत्स्य शाळा पुनर्जीवीत कराव्यात, शीतगृह व्यवस्था करणे, किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता निर्माण करणे अशा विविध मागण्या मांडून त्यावर चर्चा होणार आहे. याबाबत सरकारकडून धोरणात्मक निर्णय जाहीर होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही श्री. मोंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले

प्रतिक्रिया व्यक्त करा