You are currently viewing सीसीटीव्ही

सीसीटीव्ही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*सीसीटीव्ही*

 

जर का मी असं म्हणलं की आजपासून तुम्ही घरात किंवा घराबाहेर असतानासुद्धा तुमच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे तर तुम्ही एकदम सजग व्हाल. अगदी अकृत्रिम, सहज असा तुमचा वावर राहणार नाही. जाणीवपूर्वक आव आणून तुमच्या हालचाली होतील आणि ओढून ताणून उसण हसू चेहऱ्यावर आणून तुम्ही जास्तीत जास्त सौहार्द पूर्ण पद्धतीने बोलाल वागाल. जास्तीत जास्त दुसऱ्याला प्रेमानं किंवा आदर देऊन स्वतःची प्रतिमा उंच होईल असंच वागण्याचा प्रयत्न कराल कारण हे सगळं रेकॉर्ड होतंय किंबहुना कुणीतरी पाहत आहे या दडपणाखाली तुम्ही असाल… खर आहे ना? आणि जेव्हा मी तुम्हाला सांगेन की …हा, आता सीसीटीव्ही कॅमेरे बंद केलेले आहेत, तेव्हा तुम्ही खुश होऊन सुटकेचा नि:श्वास टाकाल. आपलं अंग बिनधास्तपणे सोफ्यावर टाकून द्याल. कदाचित जे काही तुम्ही कपडे घातलेले आहेत त्यातून रिलॅक्स होण्यासाठी घरगुती साध्या कपड्यांमध्ये याल. रोजची जी आपली भाषा आहे बोलण्याची त्या पद्धतीने बोलाल आणि वागाल. थोडक्यात म्हणजे तुम्ही ताण रहित राहाल म्हणजेच मूळ स्वभावानुसार वागाल.

 

आता मी हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दल जे बोलले ते का बोलले हे सांगते. कालच माझी मुलगी मला म्हणाली की, तू सध्या मेडिटेशन करत नाहीस का?

 

मी म्हणलं, नाही, फक्त योगा आणि प्राणायाम करते.

 

तुला सध्या कामाचा लोड आहे का?

 

मी म्हणलो हो, तो तर असतोच.

 

हं, तर मग तू कामाचा ताण कमी करण्यासाठी काय विचार केला आहेस का?

 

नाही, पण तू आज का विचारतेस मला हे?

 

नाही तू मागच्या आठवड्यापासून खूप छोट्या छोट्या गोष्टींवर चिडते जसं की तू आधी चिडायची नाहीस. आधी तू खूप कूल असायचीस आणि आता इतकी जास्त चिडते आहेस की कळत नाही आम्हाला तुला नक्की काय झालंय?

 

मग तिनं मला अलिकडे घडलेले प्रसंग सांगितले की जे खरंच क्षुल्लक होते पण माझी त्यावरची प्रतिक्रिया नक्कीच क्षुल्लक नव्हती. मला या संवादानं थोडस अपराधी वाटलंच पण त्याही पेक्षा जास्त अंतर्मुख केलं की आपण अगदी सहज उत्स्फूर्तपणे किंवा नैसर्गिक रित्या किंवा आतताईने म्हणा, ज्या प्रतिक्रिया देतो त्या आपल्या त्राग्यातून येतात पण इतरांच्या नजरेतून त्या योग्य असतीलच असं नाही. शिवाय आपण ज्या पद्धतीने रिऍक्ट होतो ती जर का नेहमीपेक्षा वेगळी असेल तर आपली मुलं जी लहानपणापासून आपल्याला बघत आली आहेत त्यांना तो फरक कळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला यात जाणवली आणि आवडलीही की माझी लेकरं माणसांच्या वागण्याचं इतकं व्यवस्थित विश्लेषण करू शकतात. मी हे वेगळं सांगायला नको की आई-वडिलांना मुलं सतत ऑब्झर्व्ह करत असतात. आई-वडील हे कायम संपूर्ण आयुष्यभर मुलांच्या सीसीटीव्हीच्या कक्षेत असतातच. ही गोष्ट दिवसा,घरात , घराबाहेर ,रात्री झोपेत असा कुठेही कधीही तुम्ही नाकारू शकत नाही , त्यानुसार तुम्हाला जबाबदारीनेच वागाव लागेल. कारण मुलांना जन्म देणं हा तुमचा चॉईस होता आणि आता त्यांना योग्यरित्या वाढवणं हा तुमच्या चॉईसचा भाग नाहीये… ही तुमची जबाबदारी आहे. हा विचार करणं आवश्यक आहे जसं की तुम्हाला तुमची मुलं कशी म्हणून हवी आहेत? तसं तुम्ही त्यांना वाढवायला हवं. म्हणजे तुम्हाला तुमची मुलं तुमच्यासारखीच हवीत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तसं असेल तर तुम्ही जसं मनाला येईल त्याप्रमाणे वाटेल तसं वागू शकता. पण तुम्हाला एक आदर्श किंवा अगदी थोडक्यात सांगायचं तर इतर यशस्वी मुलं ज्यांच्याशी आपण त्यांची तुलना करतो तशी हवीत, तर आपणच आरशात पहायला हवं. ती बघ कशी स्वतःच्या बळावर पुढं गेली…तो बघ तो त्यान हे किती ग्रेट काम केलं तो किती हुशार आहे,,, वगैरे वगैरे. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनेच तुमच्या मुलांशी वागलं पाहिजे कारण तुम्हाला ती तशी झालेली हवी आहेत. मग तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्यातल्या चुका सुद्धा हेतू पुरस्सर टाळता यायला हव्यात. तुमचा आवाज नॉर्मल पेक्षा वर जाऊ नये याची खबरदारी तुम्हीच घ्यायला हवी तर तुम्ही मुलांना सांगू शकाल उलट बोलू नकोस, मोठ्याने बोलू नकोस. तुम्हाला वाटत असेल की मुलांनी व्यायाम केला पाहिजे तर प्रथम तुम्ही तो केला पाहिजे. तुमचा फिटनेस, तुमचा उत्साह आणि तुमची हेल्थ बघून मुलांच्या मनात त्या गोष्टी रुजतात आणि आज नाहीतर उद्या ते नक्कीच त्या दृष्टीने प्रयत्न करतात. हे सगळं करताना आई वडीलांचं परस्परांना सहकार्य असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय हे शक्यच नाही. त्या दोघांच्यातली मतभिन्नता मुलांना लगेच कळते आणि वेळ प्रसंगी ते त्या गोष्टीचा फायदाही घ्यायला शिकतात. मतभिन्नता असेलच तर ती मुलांसमोर निदान उघड तरी करायला नको. मी थोडं चुकीच्या मोडवर चालते की माझा नवरा याबाबतीत डोळ्यांनी दटावत असतो, बर्याच वेळा मी थांबते तिथं. कधी कधी मी सांगते तेव्हा तो थांबतो. हे विचार जुळणं आणि नाही जुळले तरी त्या प्रसंगापुरतं शांत राहणं आपण आधीच ठरवावं लागेल.

मुख्य म्हणजे मुलांशी एक भावनिक नातं जपलं तर खूप काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात. कधी आपल्याला काही टेन्शन असेल, एखादं अपयश आपण पचवत असू किंवा एखाद्या अतिशय वाईट काळामधून जरी आपण जात असलो तरी आपली बॉडी लँग्वेज, आपल्या चेहऱ्यावरचे भाव बघून सुद्धा मुलांना लक्षात येतं की काहीतरी कुठेतरी गडबड आहे आणि ते समजून घ्यायचा प्रयत्न करतात; त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्या गोष्टी मनातल्या मनात निस्तरायचा सुद्धा ते प्रयत्न करतात. हे ताण किंवा या उतार चढावाच्या गोष्टी जिथे शक्य असतील तिथे आपण मुलांना सांगू शकलो किंवा प्रसंगी त्यांच्याकडून सुद्धा आपण जर त्यावरची मतं जाणून घेऊ शकलो तर तुमची मुलंच तुमची भक्कम सपोर्ट सिस्टीम बनू शकतात.मुलांच्या जगात ज्या गोष्टींना ते सामोरे जातात, जे तणाव त्यांना असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी कधी कधी ते स्वतः आपल्याशी विचार विनिमय करून त्यातनं मार्ग काढू शकतात. तसं पाहायला गेलं तर लग्नाच्या जोडीदारानंतर सगळ्यात उत्तम मित्र किंवा मैत्रिणी कोण असतील तर ती आपली मुलंच असतात. फरक एवढाच असतो की आपल्याला पालक म्हणून आणि मित्र म्हणून अशा दोन्ही पातळ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात जे सोपं नसतंच. मुलांबरोबर आपणही पालक म्हणून प्रत्येक पायरी नव्याने चढत असतो. खूप गोष्टी नव्याने शिकत असतो. पालक म्हणून प्रत्येक वळणावर आपली सुद्धा जडणघडण होत असते. आपण जेव्हा तिऱ्हाईताच्या नजरेतन जोखून पाहायला शिकू तेव्हा ही अवघड कसरत सुद्धा सहज पार पाडू. फक्त हे सगळं सतत जाणीवपूर्वक ठरवून करावं लागेल जोपर्यंत ते सहजपणे आपल्या आतून येत नाही तोपर्यंत. हे सोपं आहे. यासाठी हवा संपूर्ण कुटुंबात मोकळा संवाद. वनराज सिंह जसं थोडं अंतर चालून गेल्यावर पुन्हा मागं वळून बघतो तसंच आपल्या वागण्याचं सिंहावलोकन थोड्या थोड्या अंतराने करत राहूया. मागं वळून आपल्या चुका पहाणं,त्यावर चर्चा करणं आणि त्यातून काहीतरी शिकणं…खूप अवघड आहे का? तेही आपल्या साठीच. आणि एक भान नेहमी ठेवायचं की आपली मुलं आजूबाजूला वावरत आहेत, प्रत्येक गोष्ट ते पंचेंद्रियांमार्फत टिपून घेत आहेत. आपल्या वर नजर रोखलेले सीसीटीव्ही कायम ऑनच राहणार आहेत हे आणि एवढेच फक्त आपण लक्षात ठेवायच आहे…पुढे मग अगदी सहज येईल ही सहजता आपल्यामधे.

मग? राहताय ना आजपासून, नाही.. आतापासूनच सीसीटीव्ही रेडी?

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा