*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’ चरणमिठी ‘*
दिसे मंदिर कळस
आली पंढरी पंढरी
जीव शिव भेटताना
जाई पूर्णत्वास वारी ||
चंद्रभागा उचंबळे
नामघोष गजराने
वाहे दुथडी भरून
टाळ मृदंग नादाने ||
वाळवंटी पसरला
भक्ती रसाचा सागर
सुखे भरुनिया घ्यावी
आत्मज्ञानाची घागर ||
वसे आनंद निधान
येथे पंढरी देऊळी
चराचर व्यापूनिया
मना मनाच्या राऊळी ||
वाट सरली सरली
आली मंदिर पायरी
तिथे टेकविता माथा
मन निवाले अंतरी ||
व्हावे सार्थक वारीचे
सारे द्वैत सरो देवा
माझे सावळे विठाई
द्यावा चरणी विसावा ||
*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*