किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचा वृक्ष लागवड अभियानचा स्तुत्य उपक्रम
ओरोस :
किर्लोस कृषि विज्ञान केंद्राद्वारे सिंधुदुर्ग मध्ये वृक्ष लागवड अभियान राबविले जात आहे. या वर्षी १५ हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हे अभियान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या ओरोस येथील प्राधिकरण प्रक्षेत्रामध्ये ब्रिगे. सुधीर सावंत आणि उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांना ब्रिगे. सुधीर सावंत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्थापन केलेल्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये पर्यावरण संरक्षण हे एक मुख्य उद्दीष्ट आहे. झाडे ही नैसर्गिक संपत्ती असून ती पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याची ऊर्जा देतात. म्हणून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. झाडे जीवन बदलू शकतात म्हणून प्रत्येक माणसाने झाडांशी व जंगलाशी नाळ जोडली पाहिजे. एक झाड तोडले तर दहा झाडे लावली पाहिजेत. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. एकीकडे मानवाने प्रगती मध्ये कल्पनेच्या पलीकडे गगन भरारी घेतली आहे. परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा ह्रास होत आहे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. याचे परिणाम आज आपण पाहत आहोत. भरमसाठ जंगलतोडमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसत असून शुद्ध हवा व ऑक्सीजनसाठी झाडांशिवाय पर्याय नाही असे ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले.
यावेळी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून वृक्ष लागवडसाठी शुभेच्छा दिल्या. वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आरोग्य व पर्यावरण संतुलित राहण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन महत्वाचे आहे. कृषि विज्ञान केंद्र गेले तीन वर्षे वृक्ष लागवड अभियानाचा स्तुत्य उपक्रम राबवित असून वन विभाग व सामाजिक वनिकरण द्वारे रोपांचा पुरवठा करून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी संगितले.
कृषि विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या सौजन्याने या अभियानाची अंमलबाजवणी चालू आहे. यावेळी केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, प्राचार्य योगेश पेडणेकर, शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंतभोसले, सुमेधा तावडे, वन खात्याचे परिक्षेत्र वन अधिकारी अमित कटके, सामाजिक वनीकरणचे परिक्षेत्र वन अधिकारी विनोद बेलवाडकर, वनपाल सुनील सावंत, अमित चव्हाण, श्रीकृष्ण परीट, वनरक्षक रोहित यायणीकर, उत्तम कांबळे, प्रियांका पाटील, शरद कानडे, उद्योजक संतोष कदम, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे, नाना सावंत, श्याम सावंत, प्राध्यापक व कृषि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.