You are currently viewing विठू माऊली

विठू माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम लेख*

 

*विठू माऊली*

 

*विठू माऊली तू माऊली जगाची*

*माऊलीत मूर्ती विठ्ठलाची*

*विठ्ठला मायबापा*

 

विठ्ठल म्हणा , पांडुरंग म्हणा ज्याला देवात अनन्यसाधारण महत्त्व आहे,जो संत महात्म्यांचं आराध्य दैवत आहे असा हा सावळाराम भारतातील महाराष्ट्र आणि  कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो,जो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळ्या रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला तर‌ कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला‌ या देवतेला पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेने पाडुरंगाला मनोमन पूजत असतात.

पंढरीचा विठूराया हे कोणाही एका जाती धर्माचे दैवत नाही. प्रत्येक माणसांचे पंढरीची वारी एकदा तरी करण्याचे सुंदर स्वप्न असते. निसर्गाच्या नियमित ऋतुचक्रामध्ये रोहिणी, मृग व आर्द्रा‌‌ ही पावसाची तीन नक्षत्रे आहेत. ह्या तिन्ही नक्षत्रात शेतीची लावणी व पेरणी उरकून आषाढी एकादशीच्या दरम्यान सर्व सामान्य शेतकरी वर्गाला थोडी उसंत असते आणि अशा मोकळ्या उसंतीच्या वेळामध्ये त्याला विठूरायाचीच आठवण येते.

 

*आली कुठुनशी कानी*

*टाळ मृदंगाची धून‌*

*नाद विठ्ठल विठ्ठल*

*नाद विठ्ठल विठ्ठल*

*नाद‌ विठ्ठल विठ्ठल*

*उठे रोमारोमातून‌*

 

अशी साद ऐकू आली रे आली की स्वारी‌ त्वरीत आषाढीच्या वारीला जाण्यास सज्ज होते. गळ्यात तुळशीची माळ, डोईवर‌ पांडुरंगाची आवडती तुळस ,हातात भगवी पताका ,कपाळी बुक्का अन् हातात टाळ चिपळ्या‌आणि ओठांवर‌ अक्षय झरझर‌‌ झरणारे अमृत अभंग!

विठ्ठलाच्या दर्शनाची अनिवार ओढ भक्ताला शांत बसू‌ देत नाही.वर्षानुवर्ष नित्यनेमाने वारीला जाणारे‌ लोक बघून‌ मन‌ थक्क होतं. एक वेगळाच उत्साह संचारला असतो‌ या वारकऱ्यांमध्ये! एक तरी वारी अनुभवावी असंच या वारकऱ्यांकडे बघून वाटत असतं..

 

*विठ्ठल दर्शनाची ओढ*

*निघती वारकरी सारी*

*भक्तीभावाने करावया*

*क्षेत्र पंढरपूर वारी*

 

बघा आपल्या सर्वांचा अन्नदाता सुद्धा आपल्या रोजच्या कामाच्या रामरगाड्यापासून थोडीशी उसंत काढून‌ आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीला जातो. सर्वच वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले असतात,अगदी तहानभूक सुध्दा विसरलेले असतात.

 

*लोचन‌ किती पाणावले*

*पाय मातीत भेगाळले*

*पांडुरंगाच्या भेटीसाठी*

*मन भक्तांचे व्याकुळले*..

 

‌‌किती तरी दिवसांची पायपीट करून‌ पांडुरंगाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले‌ हे भक्त टाळ चिपळ्यांच्या नादात *जय हरी विठ्ठल जय‌ जय विठ्ठल* असा गजर‌ करत वारीत मजल‌ दरमजल‌ करीत पंढरपुरास पोहोचतात.

इथे कसलाच भेद नसतो, ना जातीचा ना पातीचा, लहान थोर, श्रीमंत गरीब कश्शाचाच नाही ! प्रत्येक जण इथे फक्त माऊली असतो. माऊलीच्या भेटीची आस बाळगणारा!

 

*तन झाले मधुर वीणा*

*मन तयांचे हो मृदंग*

*ओठातून नित्य झरती*

*अक्षय अमृत अभंग*

 

एकच आस असते‌ दिनरात विठ्ठल भेटीची‌…कधी

पंढरपूरला पोहोचतो, चंद्रभागेत स्नान करतो आणि गाभाऱ्यात पोहोचतो‌ ,आपल्या विठूरायाला डोळा भरून पाहण्यासाठी..एकदा का सावळ्याला डोळे भरून‌ पाहिलं‌ की पुढच्या एकादशी पर्यंत त्याला ही

भेटीची शिदोरी पुरणार असते.

 

*मुखी विठ्ठलाचा गजर*

*साठवी रूप लोचनात*

*व्हावे दर्शन माऊलींचे*

*एकची आस दिनरात*..

 

त्यासाठी दारात तिष्ठत उभे राहण्याची तयारी असते ..नि:संगपणे चालून‌आल्यावर

*भेटी लागी जीवा लागलीसे आस* ही तळमळ, ही असोशी प्रत्येक भक्ताला कारण ही विठू माउली भक्तांच्या हाकेला धावून जाणारी असते!तिच्या केवळ मुखदर्शनानेसुद्धा उधळतो‌ मनामनात भक्ती रंग आणि प्रत्येकाच्या मनगाभाऱ्यात वसत असतो‌ सखा पांडुरंग!

पुढल्या वर्षी परत येण्याचं‌ मनाशी पक्कं ठरवूनच!

 

*जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल* 🚩🚩

 

©️®️डॉ.सौ.मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा