You are currently viewing वैष्णवांचा मेळा… आनंद सोहळा

वैष्णवांचा मेळा… आनंद सोहळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*वैष्णवांचा मेळा… आनंद सोहळा*

 

*ध्यानीमनी वसे माझ्या…हरि विठ्ठल सावळा*

*चालतो मी पायी वारी…भेटीस तुझ्या घननीळा*

 

मनामनावर राज्य करणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनास लागताच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण…बेधुंद झालेले वारकरी हातामध्ये टाळ, मृदंग, डोईवर तुळस घेऊन अनवाणी पायांनी पंढरीची वाट चालू लागतात…अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेला पंढरीचा सावळा कटेवर हात ठेवून आपल्या भक्तांच्या दर्शनासी निरंतर उभा असतो…आणि या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासी खांदावर भगवी पताका घेऊन उन्हातान्हात पाऊस पाण्याची किंचितही तमा न बाळगता “जय हरी विठ्ठल” चा गजर करत अखंड नामस्मरण करून वारी निघते पंढरीच्या वाटेवर…आपल्या लाडक्या विठुरायाला याची डोळा याची देही डोळे भरून पाहण्या…आपल्या दोन्ही नेत्रांच्या अखंड तेवणाऱ्या नेत्रांजनाने सावळ्या विठुरायाची पंचारती करत विठू चरणांवर लीन होतात वारकरी…ही वारी…म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी…भक्तीच्या ओसंडून वाहणाऱ्या रसात न्हाऊन निघणारी…भक्तांची मांदियाळी…एक अविस्मरणीय भक्तीचा सुखद सोहळाच….!

*एकच माझ्या मना आस…जन्मोजन्मी तुझा दास*

*पंढरीचा मी वारकरी…वारी चुको न दे हरी*

 

विठ्ठला, अनेकवर्षं तुझी करितो वारी…अंगी माझ्या बळ तूच देतो…

आध्यात्मिक शक्तीने भारले हे मन…भक्तांच्या भक्तीची तू परीक्षा घेतो…देहभान विसरून तुझ्या भक्तीत रममाण होण्याचं असं कोणतं रसायन तू भरलेस आमच्या अंगात…भक्त रंगून जातो तुझ्या वारीत रंगतो तुझ्याच भक्ती रसात…चालता पायी… हातामध्ये टाळ…गळ्यामध्ये झुलते तुळशीची माळ…अखंड नाम तुझेच मुखात…जय हरी विठ्ठल तन मन ध्यानात… !!

 

*तुझी वारी म्हणजे विठ्ठला…भक्ती आणि ज्ञानाधिष्ठित व्रत आहे…* समतेचं, एकतेचं जगातील लोभासवाणं रूप म्हणजे तूंचि विठ्ठल… विठोबा म्हणजे साक्षात… चैतन्याचा गाभा…म्हणून तर तुजला संबोधिले “विश्वदेव”…!

 

*बोलवा विठ्ठल…पहावा विठ्ठल…करावा विठ्ठल जिवेभावें…*

विठ्ठला तुझी वारी म्हणजे…

“संकल्पाची सरे वारी…सरे अहंकाराची वारी….सारीतसे वारी संसाराची…आता कर्मठा कैची वारी”…

तुझा वारकरी विठ्ठला…ध्यानीमनी स्वप्नी विठ्ठल पाहतो…शेतातल्या शेतात विठ्ठल वसतो… ज्वारीच्या कणसात त्याचा विठ्ठल हसतो…काळ्या मातीत त्याच्या विठ्ठल नाचतो… विठ्ठल मागे पुढे उभा दिसतो…!

तुझी वारी पाहुनी होते गहिवरायला… कोणत्या मातीची बनली माणसे त्यांना नको आवरायला…विठ्ठल भेटीची ओढ आषाढाच्या सुरुवातीस लागते…मन कासावीस होते…चालत पाऊले… ध्यान पंढरपुरास पोचते…!

*माझे माहेर पंढरी… आहे भीवरेच्या तीरी*

*बाप आणि आई…माझी विठ्ठल रखुमाई…*

 

वारीत माऊलींच्या शोभे रिंगण सोहळा…अलौकिक भासे विठ्ठल सावळा…अश्वदौड फेडी पारणे डोळ्यांचे…रिंगणात मुखी अभंग विठ्ठलाचे…

सर्व वारकरी…टाळकरी..झेंडेकरी…मृदंग वादक…विणेकरी करिती रिंगण…अश्व प्रदक्षिणा घालुनी करीतसे विठ्ठला वंदन..

दिवे घाटात पायी चालते वारी…दिंड्या पताका वैष्णव नाचवितो भारी…डोईवर तुळस… चालली विठ्ठलाच्या भेटी…विसावते जाउनी चंद्रभागेच्या काठी…!

सर्व जनांचा तू, देवा विठुराया… भाविक जन टेकवितो माथा तुझ्या पाया…भक्ती हीच संपत्ती वाटते वारकऱ्या… धनाला हृदयात नसे तुझ्या थारा…भीवरेचा तीर तो मानतो माहेर…विठ्ठल रखुमाई आई बाप वसे पंढरपूर…जय हरी विठ्ठल… मुखी म्हणोनी लहानथोर..एकमेका पायी डोकी…ठेवी भक्तीभावपर…धर्म,जात,पंथ विसरून जातो…प्रत्येकाच्या ठायी विठ्ठलाला पाहती…!!

 

पंढरपुरी तुझा अदृश्य वास…श्रद्धा भाविकांची त्यांना लाभे तुझा सहवास..!

आषाढी एकादशीला पंढरपुरी सामाजिक समता आणि विश्वबंधुत्वाची प्रचिती देणारा आषाढी वारीचा अनुपम्य अमृत सोहळा कळसाला पोहोचतो…विठ्ठल नामाच्या गजराने भूवैकुंठ पंढरपूर दुमदुमतं…

लाडक्या विठ्ठलाच्या ओढीने लाखो वारकरी भक्तिरसात चिंब न्हाऊन जातात…ज्ञानेश्वर माऊली…तुकाराम महाराजांच्या पालख्या सायंकाळी दाखल होतात…चंद्रभागेचं वाळवंट…नदीचा काठ…भक्तीच्या वाटा…भगव्या पताक्यांनी फुलतात…विटेवरच्या लावण्यशोभेची आभा पंढरीच्या पाण्यात मिसळते…आणि वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या पापण्या न मिटता…मनात विठ्ठल भेटीची आस घेऊन राजस सुकुमार मदनाचा पुतळा…अशा राजस विठ्ठलाच्या दर्शनाची पहाट उजळते…!

जनमाणसांत चैतन्याचा अंश एकच आहे ही मनोधारणा वाढत जाते…

अन्…

*आषाढी कार्तिकी भक्तजन येती…चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती…दर्शन हेळा मात्रा…तया होय मुक्ती…केशवासी नामदेव भावे ओवाळती…*

विठ्ठलाची भक्ती वाहत्या चंद्रभागेप्रमाणे अखंड…अव्याहत… अविरतपणे सुरूच राहते…!!!

 

©[दीपी]

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा