You are currently viewing हतबल मनाची वेदना..

हतबल मनाची वेदना..

*पत्रकार लेखक कवी सागर बाणदार लिखित अप्रतिम लेख*

 

*हतबल मनाची वेदना…*

 

त्यांच्या हाॅटेलमध्ये कायमच देवपुजा आणि महामृत्युंजय मंञचा ( मशीनव्दारे )

जप चालतो.आणि ते तसे

देवाचे निस्सीम भक्त असून आपल्या हाॅटेल व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून ब-याचदा तिर्थयाञा करतात.या माहितीच्या आधारे कुणालाही ते धार्मिक वृत्तीचे आहेत, याबद्दल शंका येण्याचे कारण नाही.पण ,परवा मी ऑफिसकडे निघालो असताना दुपारची वेळ असल्याने चहा घेण्यासाठी त्यांच्या हाॅटेलमध्ये थांबलो.आणि थोड्याच वेळात चहा घेऊन त्याचे पैसे देण्यासाठी काऊंटरजवळ आलो.मला ऑफिसला जायला उशीर व्हायला नको म्हणून मी गडबडीत त्यांना चहाचे पैसे दिले.पण ,मी दिलेल्या पैशातील उर्वरित पैसे ते मला परत देणार होते.म्हणून मला थांबावे लागले.त्याच वेळी संपूर्ण शरीर वाकलेले ,चेह-यावर सुरकुत्या पडलेल्या आणि उजव्या हातात एक पिशवी अन् तोच हात पुढे ( थरथरणारा )करत एक वृध्द आजोबा म्हणाले ,एक भजी उधार द्या की.त्यांचा हतबल आवाज कानावर पडताच माझे लक्ष नकळत त्यांच्याकडे गेले.याचवेळी त्या हाॅटेल चालकांनी मला उर्वरित पैसे देत त्यांच्याकडे बघत म्हणाले ,मालक बाहेर गेलेत ,आम्ही उधार देत नाही.यावर ते आजोबा काहीच न बोलता फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे अगदी निर्विकारपणे बघत राहिले.अन् तो हतबल मनाचा क्षण बघून माझ्या मनात अगदी चरर्र झाले.अन् काय ही हतबल अवस्था असे स्वतःच्या मनालाच विचारत लागलीच मी त्या हाॅटेल चालकांना म्हणालो ,या आजोबांना गरम वडापाव द्या आणि त्याचे हे पैसे घ्या.त्यांना पैसे देताना ते हाॅटेलचालक काहीसे आश्चर्याने ( की अपराधी भावनेने )माझ्याकडे काही सेकंद बघत राहिले.याचवेळी त्यांचे काही नोकरही माझ्याकडे बघत राहिले.तेव्हाच त्या हाॅटेल चालकांनी त्या आजोबांकडे गरम वडापावची प्लेट दिली.तसे ते आजोबा तिथेच आडोसा बघून दोन घास पोटाला खायला बसले.

पण ,मी याकडे मुद्दाम कानाडोळा करुन तिथून लागलीच काढता पाय घेऊन गाडीला किक मारुन ऑफिसच्या दिशेने निघालो.तसा माझ्या मनात एकच विचार घोळू लागला की ,खरंच अध्यात्म समजणारा ,भक्तीभाव जाणून तो आपल्या जगण्यात उतरवणारा, सत्कार्याची कास धरणारा धार्मिक वृत्तीचा माणूस असं खोटं बोलून परिस्थितीने हतबल झालेल्या भुकेल्या माणसाला अशी तुच्छतेची वागणूक देऊ शकतो का ? त्याला दानधर्माचे महत्व किंवा जनसेवा हीच ईश्वरसेवा ही शिकवण जराही उमजली नसेल का ? तसेच केवळ कर्मकांड म्हणजेच खरी ईश्वरसेवा अशी त्याची भ्रामक कल्पना झाली असेल का ? याहीपेक्षा एका वडापावने तो भिकेकंगाल झाला असता का ? अशा असंख्य प्रश्नांनी माझ्या मनाला अस्वस्थ , बेचैन करुन टाकले.आजही त्या सा-या प्रश्नांनी माझे मन मलाच विचारत राहते की ,असे किती दिवस केवळ धार्मिक कर्मकांड करुन तू देवाला शोधायचा प्रयत्न करणार आहेस.तुला परिस्थितीने हतबल झालेल्या माणसाला मदत करण्यात , दानधर्म करण्यातला परम आनंद ,सुख देणारा देव कधी भेटणार आहे ? प्रत्येकाच्या कल्याणाची भावना मनात जागृत ठेवणं म्हणजेच तो आत्मचैतन्याचा खरा साक्षात्कार आहे ,हरघडीला उदात्त ,चांगलं काही इतरांना देत राहण्याची जाणीव कायम ठेवणं म्हणजेच या साऱ्या मोहमयी पसा-यातून जीवन मुक्तीचा मार्ग गवसणं आहे ,हे सारं अध्यात्माचं मूळ फक्त आणि फक्त माणसाच्या परोपकार आणि चांगुलपणात दडलं आहे.म्हणूनच मग् नकळत माझ्या ओठांवर…

 

देव देव्हाऱ्यात नाही,

देव नाही देवालयी

देव चोरून नेईल

अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे,

देव दाही दिशी कोंदे

देव आभाळी सागरी,

देव आहे चराचरी

देव शोधूनिया पाही,

देव सर्वाभूताठायी

देव मूर्तीत ना मावे,

तीर्थक्षेत्रात ना दावे

देव आपणांत आहे,

शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या जड देही,

देव भरूनिया राही

देव स्वये जगन्नाथ,

देव अगाध अनंत

देव सगुण निर्गुण,

देव विश्वाचे कारण

काळ येई काळ जाई,

देव आहे तैसा राही !

 

या भक्तीगीताच्या ओळी रेंगाळत राहतात.मग् सरतेशेवटी केवळ आंधळेपणाने देवाची भक्ती केली की ,ती तुम्हाला निश्चित कृतघ्नपणाने वागायला सांगून

खड्यात पाडेल.म्हणूनच , धर्मग्रंथातला शब्द अन् शब्द ,संतांची शिकवण हे आपल्या विवेकबुद्धीने

सर्व अंगांनी तपासून जगण्यात उतरवण्याचा थोडाफार प्रयत्न झाला तरी आयुष्य अंतर्बाह्य उजळून निघेल ,यात काहीच शंका नाही.पण , त्यासाठी आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आपण कसा जगतो ,यावरच आपल्या आयुष्याची खरी समृद्धता व श्रीमंती ही ठरलेली असते.हे सारं परिस्थितीने हतबल झालेल्या आजोबांच्या निमित्ताने आपल्याला विचार करायला भाग पाडावं , हे नक्कीच शोभनीय नाही.पण , परोपकार, दानधर्म , चांगुलपणा यातूनच देव चराचरी व्यापलेला असून त्याचं चैतन्य स्वरुप हे दररोजच्या आचार – विचारातून प्रगट होऊन ते मानवरुपी देवाचीच प्रचिती देत राहतं.म्हणूनच आपल्याकडे आलेला याचक ( मदत मागणारा )हा खरंतर सेवा करण्याची संधी देत असतो.ती संधी जाणूनबुजून डावलणं म्हणजे ती शुध्द आचार – विचारांशी केलेली प्रतारणाच ठरते.याशिवाय केवळ पाप – पुण्याच्या गोष्टी प्रत्यक्ष आचरणाशिवाय निरर्थक ठरतात.

स्वार्थापलिकडे जाऊन मनाला

एवढं जरी कळलं तरी खरं अध्यात्म जगण्यात उतरवण्याची ती खरी सुरुवात होऊ शकते , तसेच माणसातला महात्मा होण्याच्या साधनेतली सिध्दी म्हणून राजमार्ग ठरु शकतो.

 

-सागर बाणदार

प्रतिक्रिया व्यक्त करा