*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*(२५)माझे गाव कापडणे…*
आमच्या गल्ल्या म्हणजे, हेटली(खालची)
गल्ली, वरली गल्ली, गापुय गल्ली, बोरसे गल्ली, बजार पेठ, माईवाडा(माळी वाडा)
अहिराणीत ळ नाही, गुळ- गुई, डाळ- दाय,
नरढाणे- नल्लानं, जयगाव, धुये (धुळे) अशी
आमची मवाळ, प्रेमळ भाषा आहे.शेती न्यहाळोद रस्ता, कौठय रस्ता, वरला मया, हेटला मया, अशी शेत रस्त्यांची नावे आहेत.
वरला मयामा जानं से, कौठय रस्ताले जानं से.
अशी भाषा आहे गोड गोड. पण प्रसंगी ती कपडे
फेडायलाही मागेपुढे बघत नाही इतकी कठोर
होते. व्हायलाच हवी ना? “टीट फॅार टॅट” न्यायच आहे जगाचा.
खेड्यात काही गोष्टी किती लाईटली घेतल्या
जातात पहा. आमच्या गल्ली जवळच एक वेडी
बाई होती. फार जुनी गोष्ट आहे. कुणाचेच नाव
मला आता आठवत नाही. अतिशय साधी, माथाभरून पदर, उंबऱ्याबाहेर क्वचित पडणारी
अशी ती सभ्य स्त्री होती. वेड लागण्यापूर्वीचे
तिचे वर्तन अतिशय सभ्य व साधेपणाचे होते.
आपलं घर आपली मुलं एवढंच तिचं विश्व होतं.
पापभिरू, घराबाहेर न पडणारी अशी ती क्वचित कुणाच्या नजरेस पडत असे.पण, हाय रे दैवदुर्विलास! माहित नाही कसे? तिला वेड
लागले. कुणाच्या घरातले आपल्याला काय माहित ना? कुणाच्या नशिबात काय लिहिले असेल ते कुणालाच माहित नसते. मी सात आठ वर्षांची असेन. ती गल्लीतून हिंडू लागली.
गावभर फिरू लागली.
मुले मागून फिरत. मी तर तिला खूप घाबरत असे. तिच्या आसपासही मी कधी गेले नाही.
तशी ती निरूपद्रवी होती. पण कुणी छेड
काढल्यावर चिडत असे. गावात लग्ने होत.
बायकांची पंगत बसली की त्या रांगेत जाऊन
बसे. किती खावे हे तिला कळत नसे. वाढणारे भसकन् पुऱ्या वाढत.वाढणारे भरपूर भातही वाढत असत. जेवण करून ती निघून जाई. तिला मुले होती व वेडेपणातही
मुले होत होती. तेव्हा मला कळत नव्हते पण
आता वाटते, कशी घेत असेल बाळाला? घरचे
घेऊ देत होते का? मातृत्व! किती महान गोष्ट
आहे जगातील. काहींना तप करून मिळत नाही. नि ही वेडेपणातही आई होत होती. तिला आई बनवले जात होते,शरम वाटते मला लिहितांनाही व आताही माझ्या हृदयात खड्डा पडतो आहे.
तिला भरती करण्याऐवजी तिला मातृत्व बहाल
केले जात होते जे सांभाळायची तिची शारिरीक व मानसिक अवस्था पार कोलमडलेली होती. वा रे समाज! वाह रे माणसा, ती कशीही असो, शेवटी भोगवस्तूच
ना तुझ्या लेखी? बाकीची मुले सांभाळून तिला
औषधपाणी करून ठीक करण्या ऐवजी तिला
अशाही अवस्थेत आई बनवायचे? केवढा क्रूर आहे व लंपट आहे हो माणूस? नंतर नंतर तिची
स्थिती अधिक अधिक बिघडत गेली. सारा दिवस ती गावभर हिंडे. तिची टिंगलटवाळी होई.बिच्चारी! नखही न दिसणारी, काय तिची
अवस्था! ना घरच्यांना सोयर होते ना गावाला
सुतक..! घरात सारेच कुटुंबिय हजर असतांना
ही अवस्था होती तिची. नंतर ती दोन दोन तीन तीन दिवस गायब राहू लागली. कुणी म्हणे इथे
पाहिली, कुणी म्हणे तिथे पाहिली. स्त्रियांना
निसर्गानेच इतके नाजुक प्रश्न दिले आहेत की
मला तिच्या वेडेपणाचा विचारही करवत नाही
इतके दु:ख होते. पण आपला गेंड्याची कातडी
असलेला समाज डोळ्यावर कातडी ओढून घोरत पडू शकतो. त्याला काही फरक पडत नाही, हं.. मला काय करायचे? ही त्याची वृत्ती
असते.म्हणून मी सुरूवातीलाच म्हणाले,काही
काही गोष्टी लाईटली घेतल्या जातात.नजर
मरून जाते. बघण्याची सवय होऊन जाते.
नंतर मी धुळ्याला शिकायला गेले नि तिचे
पुढे काय झाले माहित नाही.पण आताही
आठवण आली की मन कातर होते, देवा का
करतोस तू असे? असे त्या परमात्म्याला विचारावेसे वाटते.तो मौन आहे, उत्तर देणार नाही, मला माहित आहे. देवाने माणसाला बुद्धी
दिली आहे, ती गैरवापर करण्यासाठी का?
समाजातील व्यक्तिंचे वर्तन पाहिले की माझा
हा समज पक्का व्हायला लागतो. चांगल्या चांगल्या घरातील स्रियांना मी सुनांना छळतांना
पाहिले आहे. मी नेहमी म्हणायची, माझ्या हातात बंदुक दिली तर ह्या साऱ्या सासवांना
रांगेत उभे करून प्रथम त्यांच्यावर गोळ्या झाडेन मी, इतका मला त्यांचा राग येतो. काही
सासवांनी सुनांना रात्रंदिवस कामाच्या घाण्याला जुंपले तर काहींनी त्यांना घरात सुखाने नांदूच दिले नाही.मुलांचे आईवर प्रेम
असते म्हणून काय त्यांना आपल्या दावणीला
बांधून ठेवायचे? की त्यांचा संसार फुलवायला
मदत करायची? पण नाही, मुलगा आपला, सून
परकी.आपणही बाहेरूनच या घरी येऊन मालकीण बनलो हे त्या पार विसरतात व पकड अधिक अधिक घट्ट करण्याच्या नादात
मुलाचा संसार पार विस्कटून टाकतात.अशी
अनेक उदाहरणे तुमच्याही डोळ्यांसमोर आली
असतीलंच, शेवटी “ पळसाला पाने तिनच”.
याच्या अगदी उलट परिस्थिती काही घरात मी
पाहिली. घरातील सुना अत्यंत लाडक्या.अगदी
मुली सारखी वागणूक दिली गेलेली माझ्या नजरेत आहे. तेव्हा कळत नव्हते पण आता लक्षात येते सारे आठवून नि मनाला बरे ही वाटते. चला, अशा सुस्वभावी सासवाही होत्या
तर..
मला खूप सोसावे लागले, माझ्या सासूने मला
खूप त्रास दिला मग हिला का सुखात राहू देऊ?
अशी या सासवांची मेंटॅलिटी होती त्या मुळे ना
त्यांना सुख मिळाले ना कुटुंबाला.घरात सतत
भांडणे वादावादी अशांतता, कशासाठी?
आता मात्र परिस्थिती बरीच बदललेली आहे.
सुना शिरजोर झाल्या आहेत. सासवा कोपऱ्यात गप्प बसल्या आहेत.माझ्या सासरी
आमच्या घरासमोर व शेजारी दोन्हीकडे नवरे
बायकांना मारायचे व सासवा गंमत पहायच्या.
स्त्रिया इतक्या निर्दय कशा असू शकतात हो?
साधे कुत्र्याला दगड मारला तरी जीव तळमळतो मग घरात मुलगा बायकोला मारतांना ह्यांना आनंद कसा होऊ शकतो?
शेवटी बहुरत्ना वसुंधरा, असेच म्हणावे लागेल.
आमच्या शेजारचा तो मारकुट्या नवरा मला फार वर्षांनी एका लग्नात भेटला असता त्याला
झाडल्याशिवाय राहिले नाही मी. हो, आता काय मला भीती होती ? तेव्हा मी नवीन व सासरी होते. गप्प बसला.ऐकून घेतले मुकाट्याने. नशिब.
खरंच, या पृथ्वीवरती नाना रत्ने आहेत. कोण
कसे तर कोण कसे?बुद्धी सर्वांनाच आहे पण
तिचा वापर कोण कसा करेल सांगता येत नाही.स्वार्थ माणसाला कोणत्या टोकाला घेऊन जाईल सांगता येत नाही. आताच माझ्या
ऐकण्यात आले आहे की एकाने म्हाताऱ्या बापाची जबरदस्ती सही घेऊन आपल्या मुलाच्या नावाने इस्टेट करून घेतली,मोठ्या
भावाला बेदखल करून, ती ही वकिलाकडून
नोटरी बोलावून, म्हणजे प्रश्न यायला नको.
घ्या, करा तुम्हाला काय करायचे ते! बोंबला.
माणूस इतका कसा नीच होऊ शकतो हो?
भावाची इस्टेट हडपायची? ना लाज ना लज्जा.
ना पापाची भीती. अहो, आता इथेच फेडावे लागते सारे. आई मरतांना जे जमले नाही ते
त्याने बाप मरतांना केलेच. किती निर्लज्जपणा?
होय हो, संस्कारच नाहीत चांगले तर ते असेच
वागणार ना? गुंड व स्वार्थी लोकच असे वागू
शकतात. ज्याच्यात थोडीही नितीमत्ता शिल्लक आहे ते असे करणारच नाहीत. नितीमत्ता अशा लोकांच्या गावी ही नसते.
भोगतील नंतर, आपण पाहू.
बरंय् मंडळी, राम राम..
जयहिंद.. जय महाराष्ट्र.
आपलीच,
प्रा. सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)