You are currently viewing कांदे नवमी

कांदे नवमी

काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाचे सदस्य ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख

*कांदे नवमी*

 

आज सकाळी फिरायला जाऊ की नको , या द्विधा मनस्थितीत मी होतो . कारण बाहेर चांगलाच पाऊस पडत होता , त्यातुन रात्री मी बऱ्यापैकी ओला ही झालो होतो . थोडे थांबू या असा विचार करून गॅलरीतून पावसाची व आजूबाजूच्या थंडगार वातावरणाची मजा घेत होतो ! आणि अचानक् पाऊस थांबला ! मी लगबगीने बाहेर फिरायला निघालो ! रोज भेटणारी माणसं भेटत होती Hi , नमस्कार , जुजबी विचार पुस होत होती . आमच्या नेहमीच्या कट्यावर बहुतेक मित्र मंडळी जमली व रोजच्या शिरस्त्या प्रमाणे चहाची टूम निघाली , जवळच्याच ( पण रोजच्याच ) टपरी वर जमलो ! तो पर्यंत रिमझीम पाऊस सुरू झाला !

आणि मग या पावसाळी घुंद वातावरणांत गरम – गरम भजी खाण्याची कोणाला तरी लहर आली व लगेच ती ॲार्डर देऊन अंमलात ही आली ..

शेजारच्या टेबला वरून एकाने पाव मिसळ खातांना “ अरे जरा कांदा देतोस कां? असे विचारले ?” आणि मग आम्ही सर्वांनी कांदा – भजीची ॲार्डर दिली . तेवढ्यात कोणा एकाच्या लक्षांत आलं की आज कांदे नवमी आहे . मग काय सगळ्यांनीच गिल्ला केला ..

 

मित्रा . जरा कांदा घेतोस.. ?

आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या माणसाने परत एकदां आवाज दिला ..

तसा वेटर विनम्रपणे त्याच्याजवळ आला …

सर … चॉप करून देऊ की पिसेस मध्ये … ?

तसा तो बेफिकीर स्वरात म्हणाला … आण कसाही ….

आणि पुढच्याच क्षणी माझी मान गर्कन वळली ..

चेहऱ्यावर कमालीची नापसंती … कपाळावर ठळक आठी …

‘आधी रसने भुलविले – मग उदर शमविले’ (हा माझाच श्लोक आहे .. उगाच वेदपुराणात शोधू नये) या कॅटेगिरी मधला मी आहे …

खाण्याच्या बाबतीत चवीशी तडजोड होऊ शकत नाही … असं माझं ‘भीष्ममत’ आहे ..

आणि कांदा हा चव वाढवणाऱ्या समस्त गोष्टींमध्ये अग्रस्थानी आहे … यात शंका नाही .. कांदा हा जगातला असा एकमेव पदार्थ आहे .. जो कसा चिरलाय, यावरून तो कशाबरोबर खायचा हे ठरतं.

नाही कळलं … ? एक मिनिट … समजावून सांगतो …

 

एकच कांदा वेगवेगळ्या पद्धतीने चिरला की त्याची चव वेगवेगळी लागते ..

म्हणजे बघा .. पावभाजी सोबतच कांदा …

हा साधारण पाव सेंटीमीटर च्या आकारात एकसारखा चिरलेला हवा ..

कांदा असा चिरला की त्याला हलकासा रस सुटतो ..

हा रस भाजीच्या तिखटपणाला अचूक छेद देत तिची गंमत वाढवतो …

 

मिसळीचा कांदा .. तोही खरं तर बारीक चिरलेला ..

पण त्यात वरच्यासारखी एकसंधता असता कामा नये ..

काही तुकडे लहान हवेत … काही किंचित मोठे हवेत .. !

मिसळीत असूनही कांद्याने आपली आयडेंटिटी टिकवली पाहिजे … तर मजा आहे ..

तर्रीत तरंगणारी मिसळ खाताना कांद्याचा एखादा किंचित मोठा तुकडा दाताखाली येतो तेव्हा जी अनुभूती येते ती निव्वळ अवर्णनीय.

 

बऱ्याचदा जेवणात आपण गोल चकत्या केलेला कांदा घेतो …

दातांना चाळा आणि जिभेला ब्रेक म्हणून ठीक आहे …

पण माझ्या दृष्टीने त्याची फार मोठी ओळख नाही ..

त्यापेक्षा मद्यपान करत असताना सॅलड मध्ये असलेला हाच गोल चकतीचा कांदा जास्त रंगत आणत असावा (माझा एक समज हं उगीच शंका नको ! ) …

मद्याची कडवट चव जिभेवर असताना हा कांदा जिभेवर चुरचुरला की पिण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत असावं ( हे पण एक निरीक्षण ,

बाकी काही नाही …)

 

ताटात वाढली जाणारी कांद्याची अजून एक पद्धत म्हणजे ‘कंटाळकांदा’…

जेवणाची ताटं वाढलेली असताना नवऱ्याने ऐनवेळी कांदा मागितला की बायको रागाने कांद्यावर वार करून त्याच्या चार फोडी करते आणि वाढते .. त्याला ‘कंटाळकांदा’ असं म्हणावं …

हा प्रकार आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहे … कारण तो सोपा आहे ..

पण मला तो केविलवाणा वाटतो …

एखादा नको असलेला मुलगा आपल्या ग्रुपमध्ये शिरला की कसं फिलिंग येतं .. अगदी तसं फिलिंग हा कांदा देतो … अशा प्रकारे चार तुकडे करून कांदा देणारी हॉटेल्सही मला फार रुचत नाहीत …

कारण त्यात प्रेमाने खाऊ घालण्यापेक्षा कर्तव्य उरकल्याची भावनाच जास्त असते ..

ताटातलं खाद्य बदलेल … तसं कांद्याचं रूप बदलून वाढतो .. तो खरा ..

 

म्हणजे कधी कधी तुम्ही तंदूर ऑर्डर करता आणि त्या सोबत एक विलक्षण इंटरेस्टिंग कांदा येतो ..

हा कांदा पाकळी पाकळी वेगळी करून सर्व्ह केला जातॊ …

तंदूरमधल्या बटाट्यापासून .. पनिरपर्यंत आणि चिकनपासून कबाबपर्यंत प्रत्येकाशी याची सलगी असते … अर्धवट खरपूस भाजलेला .. तंदूरच्या मसाल्यात चिंब झालेला आणि आपल्या सोबत्याला (पनीर / चिकन) घट्ट बिलगलेला पाकळीचा कांदा म्हणजे स्वर्गसुख … ! तो टाळून इतर कुठलाही कांदा तंदूरसोबत खाणारे खाद्यनगरीचे गुन्हेगार आहेत .. असं माझं आपलं मत आहे…( परत एकदा फक्त निरीक्षण . माझं मत खरं किंवा खोटं असू शकतं .. बाकी तमांसाहारीच जाणे !)

 

अर्थात तंदूरबरोबरचा हा कांदा बटर चिकन बरोबर अजिबात शोभत नाही …

किंबहुना कुठल्याच पंजाबी डिशसोबत शोभत नाही …

तिथे व्हिनेगर मध्ये बुडवलेला हलकासा लालसर झालेला आंबटसर अख्खा कांदाच हवा … ( हे मात्र सराईतगारच सांगू जाणे …)

घी मध्ये शब्दशः न्हायलेली बटर चिकनची डिश .. गरम गरम नानच्या तुकड्यासोबत तिचा घास घ्यायचा आणि मग एकच चावा घेऊन अर्धा कांदा फस्त करायचा …

देवा … सुखाची परमोच्च कल्पना … त्या क्षणी देवाने उचललं तरी मोक्ष मिळेल अशी स्थिती .. ( हॅाटेल मघे सोबत आलेल्या काही मांसाहारी खवैयांची टिपणी आहे . नाही तरी

मी आशाळभूत पणे जवळच आलेल्या आषाढी एकादशीचा वारकरी !।

 

हो पण … याच बटर चिकनची जागा जेव्हा कोल्हापुरी मटण घेतं .. तेव्हा कांद्याचं रूप ही निर्विवादपणे बदलतं … तिथे झणझणीत पांढऱ्या तांबड्याबरोबर गोड दह्यात सराबोर असलेला उभा चिरलेला कांदाच तोंडी लावायला हवा .. आणि कोल्हापूरचं मालवण झालं की हाच गोल चिरलेला कांदा लिंबाच्या रसात कुस्करून खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर वाढला जायला हवा … हा अनुभव कोल्हापूरातला !

 

आणखी एक महत्वाचं …

जेव्हा चुलीवरची भाकरी … भरली वांगी आणि झुणका ताटात सजतो .. तेव्हा कांदा चिरण्या-कापण्याच्या आणि सोलण्याच्या फंदात पडूच नये … जमिनीवर ठेवावा नि हाताने उभा चेचावा ..

हो .. पण यातल्या बाहेरच्या पाकळ्या खायच्या नाहीत हां …

मधली कोवळी पाकळी खायची फक्त … हे मी लहान पणापासून जळगांव – वरणगांव मघे सतत अनुभवलं आहे व अजुनही केंव्हातरी अनुभवत असतो !

तुम्हाला म्हणून सांगतो .. या पुढे शहाळ्यातली मलई झक मारेल ..असं आपलं माझं मत

 

एकूण काय … ‘जैसा देश वैसा वेष च्या धर्तीवर … जसं जेवण तसा कांदा !

तेव्हा यापुढे हॉटेलात काय किंवा घरी काय ‘आण कसाही’ म्हणायची चूक कृपया करू नका ..

चोखंदळ रहा … अहो, शास्त्र असतं ते …. !

तुम्ही म्हणाल आता लवकरच चातुर्मास सुरू होतोय आणि हा काय कांदा , लसुण युक्त मांसाहार , शाकाहार सांगुन आमचे व्रत वैकल्यात अडथळे आणतोय ….

तर तसं नाही , मस्त खवैये बना … कांदा लसुण सगळं खा ..

कांदा व त्याचे महत्व वेगळे सांगायला नकोच ..,

पण कांदा – भजी वर ताव मारून …

कांदा भजी अवघी विठाई आपुली … समजून कांदे नवमी साजरी करू या …

*****************

अनिल देशपांडे

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा