You are currently viewing अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित – तहसिलदार दीक्षांत देशपांडे

अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित – तहसिलदार दीक्षांत देशपांडे

अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित – तहसिलदार दीक्षांत देशपांडे

कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न..

कणकवली

अपयश ही यशाची पहिली पायरी असून ते आल्याशिवाय यशाचे महत्व कळत नाही. अपयशातून व्यक्तीला नवी उमेद मिळते. त्यातून तो यशाचे शिखर सर करण्यासाठी जिद्द, मेहनत, प्रयत्नांची पराकाष्टा करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले.

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात संपन्न झाला. यावेळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, गणेश जेठे, अशोक करंबेळकर, दिलीप हिंदळेकर, भाई चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, महेश सरनाईक, कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे, कार्यकारिणी सदस्य भास्कर रासम, किशोर राणे, उत्तम सावंत, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, चंद्रशेखर देसाई, भगवान लोके, सुधीर राणे, यांच्यासह पत्रकार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी 10 वी, 12 वी उत्तीर्ण तसेच कलाक्रीडा व विविध परिक्षांमध्ये यश मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी तहसिलदार श्री. देशपांडे यांनी स्पर्धा परिक्षेत आपल्याला आलेल्या यशापयशाचा उहापोह करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने विद्यार्थ्यांनी आपले उत्तम करिअर घडवावे असे आवाहन केले.
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले, पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्याचा कणकवली तालुका पत्रकार समितीचा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे यशवंतांच्या पाठिवर कौतुकाची थाप अन त्यांना प्रेरणाही मिळते. या प्रेरणेतून विद्यार्थी आपल्या पालक व शिक्षकांच्या आशा, आकांशा आ णि स्वप्ने पूर्ण करतात. यशवंतांचा गुणगौरव सोहळा त्यांच्यासाठी खरे टॉनिक आहे. चांगला अधिकारी बनण्यासाठी प्रामाणिक काम करणे आवश्यक असते. प्रशासकीय यंत्रणेत प्रामाणिकपणे काम करणार्‍या व्यक्तीची दखल शासन व प्रशासन घेत असते. कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन अधिकारी बनले पाहिजे. प्रशासनाच्या माध्यमातून जनसेवा करता येते, असे सांगून श्री. चव्हाण यांनी पत्रकारांच्या पाल्यांचे कौतुक केले.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे. ते करण्यासाठी पालकांनी पाल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आनंदी जीवन जगणे ही कला आहे ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्याचा कणकवली तालुका पत्रकार समितीचा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकारांच्या प्रत्येक सुख दुःखात जिल्हा पत्रकार संघ नेहमीच पाठिशी राहिला असून यापुढील काळात तो राहील, अशी ग्वाही श्री. तोरसकर यांनी दिली.
माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात अजित सावंत यांनी पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत अजित सावंत, दिगंबर वालवलकर, अनिकेत उचले यांनी, सूत्रसंचालन योगेश गोडवे तर आभार माणिक सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा