You are currently viewing पाऊस आणि खिडकी

पाऊस आणि खिडकी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*पाऊस आणि खिडकी*

 

जाणिवेची गेली ७०/७२ वर्षे अनेक पावसाळे अनुभवले. प्रत्येक पावसाळा वेगळा. कधी मुक्त, मुसळधार, कधी टपटपणारा, कधी किरकिरणारा, कधी माळरानावरचा, तर कधी शहरातल्या गर्दीतला. चिखल, ओल, खड्डे, हातात छत्री किंवा अंगावरचा रेनकोट सांभाळत, पावलं जपून उचलत, ँ मधूनच एखाद्या गतिमान वाहनाने उडालेला पाण्याचा फवारा झेलत, चालत लावणारा, कधी हवासा कधी नकोसा पाऊस. समुद्राच्या लाटांवर थयथय नाचणारा पाऊस पाहताना बेभान झालेलं मन, धबधबणाऱ्या पावसात आवडत्या व्यक्तिला बिलगून घेतलेला तो रोमांचक अनुभव. आयुष्याच्या एकेका पायरीवर अनुभवलेला विविध रंगी, विविध स्पर्शी, विविध भावनेचा, संथ, खट्याळ, वादळी, हळुवार,नाहीतर झोंबणारा पाऊस. त्या पावसात खाल्लेली गरमागरम कांद्याची भजी किंवा शेगडीवर भाजलेला खमंग बुट्टा…

 

आता मात्र तो फक्त खिडकीत येऊन बसलाय. “आला रे आला पाऊस आला” म्हणत, धावत पावसात भिजायला, उड्या मारायला, अंगावर त्याला मुक्तपणे कोसळू देणारी मी— आता मात्र फक्त घराच्या समोरच्या भागातल्या खिडकीतून या एकेकाळीच्या माझ्या प्रिय सवंगड्याशी संवाद साधते. हा पाऊसही कसा वाट काढत अलगद माझ्या खिडकीपाशी टपकत राहतो. अनेक आठवणी घेऊन एखाद्या जुन्या प्रियकरासारखा अलगद भेटतो.

पावसानं बदललेलं बाहेरच्या सृष्टीचं हिरवं रूप मी खिडकीतूनच न्याहाळते. मेघांनी भरलेलं काळंभोर आकाश आणि डोंगरावर अवचित विश्रांती घेणारे हेच मेघ या खिडकीतून बघताना आयुष्याचे अनेक रमणीय,आनंदी क्षण पुन्हा ओले होतात. हा पाऊस माझ्या खिडकीवर टपटप करतो. मला म्हणतो,” ये ना बाहेर. फुगड्या घालू, झिम्मा खेळू, गाणी म्हणू.” अशी विनवणी करतो. मैत्रीचे अनेक किस्से आळवतो आणि त्याच क्षणी मलाही पुन्हा वाटतं या वयाचं ओझं झटकून द्यावं, पुन्हा लहान व्हावं. कागदाच्या होड्या कराव्यात, “पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला खोट्टा” म्हणून पुन्हा एकदा मुक्तपणे गावं.

 

पाऊस म्हणजे बालपण, पाऊस म्हणजे तारुण्य. या वृद्धत्वाचं आवरण टाकून मनसोक्त या पावसाला बिलगावं.

मग उघड्या खिडकीतूनच मी पावसाला म्हणते,”अरे! ही ओलसर हवा मानवत नाही. पायात पेटके येतात. छत्री धरून हातालाही रग लागते छत्रीविना भिजण्याचे थोडे भय वाटते. उगीच आजारी वगैरे नको रे पडायला. आता काहीच सोसत नाही. हे बघ! तू असा मिस्कीलपणे हसू नकोस. तुला काय वाटतं? मी रडकी, घाबरट, अगदीच रंगहीन झाले आहे का? मुळीच नाही. माझ्या प्रवाहात अजूनही एक हिरवा अंकुर आहे. तुला भेटण्याची तितकीच आर्त आस आजही आहे. ही बघ आलेच मी.”

खिडकीची तावदानं वाऱ्याने सुसाट फडफडतात आणि तो बाहेर कोसळणारा पाऊस घरातच शिरतो…सारं अंग भिजवून टाकतो.

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा