मान्यवर साहित्यिकांकडून पुस्तकांचे कौतुक
मालवण
कोकणातील लेखक श्री. चंद्रकांत पारकर यांनी लिहिलेल्या आणि चंदना पब्लिकेशन्स यांनी प्रकाशित केलेल्या ‘कोकणातील माणसं’ व ‘उधाण’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मालवण धुरीवाडा येथील अमूल मयेकर यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पारकर यांच्या दोन्ही पुस्तकांचे मान्यवर साहित्यिकांनी परीक्षण करून पारकर यांच्या लिखाणाचे कौतुक केले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा सौ. अमृता मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास मालवण मधील ज्येष्ठ साहित्यिक श्री. रविंद्र वराडकर व को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर, लेखक चंद्रकांत पारकर, अमूल मयेकर, श्री. कांडरकर, पत्रकार सौगंधराज बादेकर, सौ. नूतन वराडकर- कामतेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अमृता मयेकर यांनी लेखक हा जादुगार असतो. तो निर्जिव शब्दांना सजीव करतो. त्याची जादू ज्यावेळी पुस्तकरूपाने ‘कोकणातील माणसं’ आणि ‘उधाण’ च्या रूपाने आपल्यासमोर येतात त्यावेळी या दोन्ही पुस्तकांच्या लेखनाची उंची तूम्हाला दिसून येईल, असे सांगत लेखक पारकर याचे कौतुक केले. यावेळी रवींद्र वराडकर म्हणाले, साहित्यिकाचे पुस्तक हे अपत्य असतं, त्या गोंडस गुडगुडीत अशा अपत्यांच आपण प्रकाशन केलेलं आहे. समुद्राला भरती आली की, त्या भरतीबरोबर आठवणींची भरती मनामध्ये येत असते. या भरतीबरोबर मनामध्ये ज्या व्यक्ती उमटतात, त्यांचे स्वभाव, त्यांचे जीवन या सगळ्या गोष्टी त्यांनी ‘उधाण’ या ललितसंग्रहामध्ये मांडल्या आहेत, असेही ते म्हणाले. तर सुरेश ठाकूर सर यांनी पुस्तकाबद्दल बोलताना म्हणाले, कोरोनाला फाईट जर कोणी केले असेल तर ते अक्षरानी केले असेल. गेली वर्षभर जी जी माणसे पुस्तकांकडे वळली नाहीत ती माणसे आज कोरोनाच्या काळात घरात पुस्तके घेऊन बसली. आज वाचनापासून लांब गेलेला माणूस हा लेखकाने पुस्तकामध्ये आणलेला आहे. पारकर यांचे पुस्तक हातात घेतल्यावरच उधाण आल्यासारखं वाटतं. घरात पुस्तकरुपी उधाण असताना मी समुद्रावर कशाला जाऊ अशा शब्दात ठाकूर यांनी लेखक पारकर यांचे कौतुक केले. यावेळी अमूल मयेकर तसेच प्रागतिक हायस्कूलचे श्री. कांडरकर यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले तर आभार नूतन वराडकर- कामतेकर यांनी मानले.