*पुरात सापडलेल्याना काढले सुखरूप बाहेर*
कुडाळ :
रविवारी 7 जुलै रोजी सकाळी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कडावल व आवळेगाव सीमारेषेवर पीठ ढवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूने वाढत चाललेल्या पाण्यात वेढलेल्या 25-30 मोटरसायकलस्वार व एसटी प्रवाशी अशा सुमारे 35-40 लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम कडावल बाजार पेठ मित्र मंडळ व कडावल रिक्षा युनियन तर्फे करण्यात आले.
पांग्रड येथे उगम पावलेली पीठढवळ नदी कडावल आवळेगाव मधून तुडुंब भरून वाहत होती आणि या नदीच्या बाजूने जाणारा कुडाळ-घोडगे-पांग्रड रस्ता काल दुपारी साडेबारा एकच्या दरम्याने चर्मकारव्हाळ आवळेगाव व कडावल येथील डॉ. सुनील सावंत यांच्या दवाखाना यादरम्यान पीठढवळ नदीतील पात्र सोडून बाहेर आलेल्या पाण्याने पूर्ण ब्लॉक झालेला होता. चर्मकार व्हाळ व नदीच्या पात्रात मिसळणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्यामुळे 35 ते 40 प्रवासी मोटर सायकल सहित वाहून जाण्याच्या स्थितीमध्ये असताना एसटी ड्रायव्हर डिसूजा व आवळेगाव येथील कडावल बाजारपेठेतील कृषी उत्पन्न उत्पादन विक्रेते लालू सावंत यांनी विविध यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर व कडावल येथील माजी सरपंच विद्या मुंज ,उत्तम मुंज ,चेतन मोजकर ,सर्वेश वर्देकर , राज मुंज, राहूल मोरजकर, सुहास चव्हाण इतर बाजारपेठेतील तरुण मंडळी, रिक्षाचालक प्रमोद कदम, श्री बाबल्या जाधव, प्रा. अरुण मर्गज व इतर मंडळी घटनास्थळी जमा झाली व त्यानी मानवी साखळी करून रस्त्यावर चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या स्त्री-पुरुषांना सुखरूपपणे बाहेर काढले.
आज पर्यंत रस्त्यापासून सुमारे शंभर फूट दूर असलेल्या पीठढवळ नदी पात्रातील पाणी रस्त्यावर येऊन एवढ्या वेगाने वाहत कधी तुंबलेले नव्हते. अशा स्थितीत पाण्याचा वेग वाढत असतानाही धाडस दाखवून भयभीत झालेल्या प्रवाशांना कडावल येथील तरुणानी वाचवले. या त्यांच्या धाडसाचे व मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.