विशेष संपादकीय…..
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवली पूरस्थिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ठरली कुचकामी*
*जिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने प्रशासकीय अधिकारी सुशेगाद*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरू असून दरवर्षी प्रमाणेच जुलै महिना हा जिल्ह्याच्या आपत्कालीन यंत्रणेची आणि जिल्हा प्रशासनाची परीक्षा घेणारा ठरला. आपत्कालीन यंत्रणेची तालीम घेणे, यंत्रणा सुसज्ज करणे इत्यादी उठाठेवी केवळ पाऊस येण्यापूर्वी केल्या जातात आणि अतिवृष्टी सुरू झाल्यावर हीच तालीम घेतलेली यंत्रणा आणि तालीम घेणारे अधिकारी सर्वच भूमिगत होतात की काय..? हे समजेनासे झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहिली असता जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणे बरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे वाभाडे निघाल्याचे दर्शन आज समस्त जिल्हावासियांना झाले. खुद्द जिथे जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा दिवस रात्र तैनात असते, अधिकारी वर्ग ऐश आरामात बसलेले असतात त्याच ओरोस मध्ये जनतेवर संकट आल्यावर एकही अधिकारी, जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहचू शकत नाही म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचेच आपल्या प्रशासनावर, अधिकारी वर्गावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात मध्यरात्री नंतर सुरू झालेला पाऊस पहाटेच्या सुमारास उग्र स्वरूप घेतो आणि एका क्षणाची उसंत न घेता कोसळतो म्हणजे जिल्हा जलमय होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नसते. मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारे जिल्ह्यातील काही भागात पावसाने दैना उडाली होती. दोन वर्षांपूर्वी वागदे येथे गड नदीचे चढलेले पाणी असे हायवेवर पाणी येण्याचे प्रकार देखील घडले आहेत. तरी सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडतात हे नक्कीच निषेधार्ह..! जिल्ह्याचे अनेक अधिकारी सुट्टीत जिल्ह्यात राहत नसल्याने जिल्ह्यातील लोकांवर आलेल्या संकटाची त्यांना जाणीव नसते. आपण काम करत असलेले ठिकाण, जिल्हा आपले घर समजून काम केल्यास नक्कीच जिल्ह्यावर आपत्ती येणार नाही परंतु प्रशासनाचे अधिकारी सुशेगाद असल्याने जिल्ह्यातील जनतेला आपत्कालीन परिस्थितीत बेघर होण्याची वेळ येते.
वेळ कोणाला सांगून येत नाही परंतु येण्यापूर्वी आपण येत असल्याची पुसटशी कल्पना देते. तरीही प्रशासन झोपेत राहते..? का..? की झोपेचे सोंग घेते..? हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना देखील जिल्हाधिकारी निश्चिंत होऊन इतर जिल्हावारीवर जातात आणि त्यांच्या प्रशासनातील अधिकारी खुद्द ओरोस मध्ये संकट आपल्यावर घरी रविवार साजरा करून लोकांची घरे बुडल्यावर, किमती सामान वाहून गेल्यावर, बाया, म्हाताऱ्या लोकांचे प्राण कंठात आल्यावर येतात म्हणजे प्रशासनाच्या दिरंगाईचा कहर म्हणायला हरकत नाही. कुडाळ कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांनी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांचा घेतलेला समाचार व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे जिल्हाधिकारी आपल्या कामात किती तत्पर आहेत, जिल्हा प्रशासनावर त्यांची किती पकड आहे याची झलक पहायला मिळाली. आम.वैभव नाईक यांनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले नाहीत तर तहसीलदार, मंडळ अधिकारी आदींना जिथे लोक पाण्यात अडकले तिथे पाण्यात नेत त्यांच्या कामाच्या पद्धतीची अक्षरशः चिरफाड केली. त्यामुळे कुचकामी ठरलेली जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा आणि गंज लागलेली आपत्कालीन यंत्रणा दोन्ही तैनात असणे म्हणजे काय हे साऱ्या लोकांना समजले.
ओरोस येथे पाणी भरायला सुरुवात झाल्यावर दुपारी १ च्या दरम्याने लोकांनी घरातून बाहेर सुरक्षित जागी जाणे पसंत केले. काहीजण भरलेले पाणी पहायला गेले असता एका घरात ८० वर्षांची वृद्धा गळ्यापर्यंत भरलेल्या पाण्यात तब्बल दोन ते तीन तास जीव मुठीत धरून जगण्यासाठी संघर्ष करत होती.. आणि जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणा सुशेगाद झोपलेली. अशावेळी गोसावी नामक पोलीस कर्मचाऱ्याने धावपळ करून मालवण येथून आपत्कालीन टीम मागवली आणि वृद्धेला सुखरूप घरातून बाहेर काढण्यास मदत केली. अडिज तीन तास पाण्यात अडकलेली ती वृद्धा बाहेर आणल्यावर थंडीने थरथरत होती. तिची घाबरलेली केविलवाणी स्थिती पाहिल्यावर नक्कीच निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात कोणाच्याही मनात चीड उत्पन्न होईल. १ वाजता घरांमध्ये पाणी शिरले असता संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणी अधिकारी तिथे फिरकत नाहीत म्हणजे बेजबाबदार पणाचा कळस म्हणायला हरकत नाही. आपत्कालीन यंत्रणेवर सरकार वारेमाप खर्च करते आणि ऐन संकटाच्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कामी येत नाही त्यावेळी अशा यंत्रणा काय कामाच्या..? हा प्रश्न उभा राहतो. गेल्या दोन दिवसांपूर्वी जबाबदार जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात, बांद्यात पूरस्थिती निर्माण झाली तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे का..? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी केला होता..आणि दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा किती सज्ज आहे याचे दर्शन संपूर्ण जिल्ह्याला झाले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ओरोस जर सुरक्षित नसेल तर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावांची काय परिस्थिती असेल याचा विचारही न केलेला बरा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने कहर केला तरी सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये कोसळलेला पाऊस जिल्ह्यातील महामार्गावर पाण्याचा तांडव करतो हे आज जिल्हातील लोकांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी नवीन राहिले नाही. त्यामुळे भविष्यात तरी जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी आणि जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला झोपेतून जागे करावे अशी अपेक्षा जिल्हावासिय करत आहेत. अजून एक दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करते हे लवकरच दिसून येईल.