You are currently viewing प्रीपेड मीटर लावणार नाहीत असा सरकारचा निर्णय झाला नाही

प्रीपेड मीटर लावणार नाहीत असा सरकारचा निर्णय झाला नाही

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनाध्यक्ष प्रताप होगाडे यांचे जनता दरबारात वक्तव्य

 

*जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या जनता दरबारात तक्रारींचा वर्षाव*

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये वीज ग्राहकांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्री प्रताप होगाडे हे खास उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वीज ग्राहकांनी महावितरणच्या विरोधात तक्रारींचा अक्षरशः वर्षाव केला. वीज ग्राहकांच्या तक्रारींचे श्री.प्रताप होगाडे यांनी संकलन करून वीज ग्राहकांना योग्य असे मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी जनता दरबारासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रताप होगाडे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

 

*वीज ग्राहकांनी केला तक्रारींचा वर्षाव*

गेली काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याची वीज वितरण व्यवस्था अक्षरशः मोडकळीस आलेली असून गेली कित्येक दशके वीज वितरणकडून जुनाट वीज वाहिन्या, शेवटच्या घटका मोजत असलेले ट्रान्सफॉर्मर आणि मोडकळीस आलेले विजेचे खांब यांच्या आधारावरच वीज वितरण व्यवस्था सुरू आहे. त्यामुळे एका एका दिवसात जवळपास दहा वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये घडत असून महिन्यातील कमीत कमी पंधरा दिवस गावांमध्ये विजेचा पत्ता नसतो. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी जनता दरबारात अक्षरशः तक्रारींचा वर्षाव केला. माणगाव येथील सेलेस्तिन शिरोडकर यांनी गोवा राज्यातील वीज ग्राहकांना महाराष्ट्रातून विकत घेतलेली वीज सुद्धा कमी दराने दिली जाते, परंतु महाराष्ट्रात तोच दर शंभर ते दीडशे पट जास्त आहे. वीज चोरी होत असतानाही वीज गळती हा गोंडस शब्द वापरून वीज गळतीचा अधिभार ग्राहकांच्या माथी मारून ग्राहकांना भरमसाठ वीज बिले भरण्यास भाग पाडले जात आहे. अशी तक्रार केली तर गेली जवळपास ४० वर्षे पूर्वीचे वीज खांब अनेक ठिकाणी गंजलेल्या व मोडून पडण्याच्या अवस्थेत आहेत, त्याचे महावितरण कडून ऑडिट का केले जात नाही? कॉन्ट्रॅक्टर कडून करून घेतली जाणारी कामे ही भरमसाठ दर आकारून अधिकारी मॅनेज करतात अशा प्रकारची तक्रार श्रीनिवास करंदीकर, पाट यांनी मांडली. जिल्ह्यातील सर्व सबस्टेशनचा रिव्ह्यू घेऊन किती दिवस व किती वेळ वीज पुरवठा सुरू होता व किती वेळ बंद होता..? याची माहिती माहितीच्या अधिकाऱ्यात घ्यावी अशी सूचना रोनापाल येथील सुरेश गावडे यांनी केली. तळवडे येथे छोटे-मोठे काजू व कात कारखाने आहेत परंतु वीज जोडणी देण्यासाठी “सप्लाय नाही” असे सांगून अधिकारी टाळाटाळ करतात, ग्रामपंचायत जागा देण्यास तयार असतानाही सबस्टेशन करण्याची मानसिकता महावितरणच्या अधिकाऱ्यांची नाही. अशी नारायण जाधव यांनी खंत व्यक्त केली. वीज खंडित झाल्यावर अधिकाऱ्यांना विचारणा केली असता खारेपाटण येथून डायरेक्ट वीजपुरवठा खंडित झाल्याचे सराईत उत्तर नेहमीच दिले जाते. शेतीपंपाची वीज बिले मार्च एप्रिल मध्ये शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळीच काढली जातात व बीज बिल न भरल्यास वीज कट करण्याची धमकी दिली जाते. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बिल माफ झाले आहे हे खरे का? असा प्रश्न शिवराम आरोलकर वेंगुर्ला यांनी केला. शॉर्टसर्किट मुळे झालेली काजू बागेची नुकसान भरपाई वर्ष उलटले तरी दिली नाही, अशी तक्रार पांडुरंग दळवी, आंब्रड यांनी केली तर आंब्रड येथीलच केशव मुंज यांनी असाल ते सोनवणे हा ३६ किलोमीटरचा फिडर असून सोनवडे येथे जरी कुठला फॉल्ट झाला तर ३६ किलोमीटर एरियातील संपूर्ण वीज खंडित होते. यासाठी योग्य ती उपाययोजना करावी असे सांगून “वीज ग्राहक संघटना करत असलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे” असे म्हणत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संजय गावडे यांनी कुडाळ ते वेंगुर्ला व इन्सुली मळेवाड वेंगुर्ला असा ३३ केव्ही लाईन वरून वेंगुर्ला येथे होणारा वीज पुरवठा जंगलमय भागातून गेल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सदरची लाईन अंडरग्राउंड करून मिळावी अशी मागणी केली. जिल्हा समन्वयक राजेश राजाध्यक्ष यांनी जिल्ह्यात पिआरओ ऑफिस नाही का? असा प्रश्न उपस्थित करत तक्रार निवारण कक्ष जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले. जिल्ह्यात हजारो मीटर बंद असून महावितरण त्याची दखल न घेता सरासरी वीज देत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची लूट करत असल्याची तक्रार गणेश उर्फ बाळ बोर्डेकर यांनी मांडली. ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी दोडामार्ग येथे तीन प्रकल्प वीज निर्मिती प्रकल्प असूनही त्या प्रकल्पामधून निर्मित होणारी वीज गोवा कर्नाटक राज्यांना दिली जाते परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळत नाही, ती जिल्ह्याला मिळावी अशी मागणी केली तर मंदार शिरसाट यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी भाषा सुधारावी व ग्राहकांना योग्य शब्दात उत्तरे द्यावी, असे सुचविले. सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी “महावितरणकडे अपुरे कर्मचारी असूनही निदान १५ दिवस तरी ग्राहकांना वीज पुरवठा होतो हे अभिमानास्पद आहे” अशी मिश्किल टिप्पणी करत महावितरण व्यवस्थेची खिल्ली उडविली. यावेळी देवगड तालुका अध्यक्ष दिनेश पटेल, नंदकिशोर खरावडे, चंद्रकांत म्हापणकर, विठ्ठल दळवी, आदी अनेक वीज ग्राहकांनी होगाडे यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

 

*महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले अमूल्य मार्गदर्शन*

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री.होगाडे यांनी वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देत, “काय बरोबर व काय चुकीचे आहे” याबाबत योग्य असे मार्गदर्शन केले. गोव्यातील विजेचे दर हे केंद्राच्या अखत्यारीत असल्याने कमी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व गोवा यांची तुलना करणे योग्य होणार नाही असे सांगत महाराष्ट्रात वीज चोरी होत असूनही वीज गळती हा गोंडस शब्द वापरून होणारी वीज चोरी लपविली जात आहे. शेतकऱ्यांचा वीज वापर १५% असूनही तो ३०% दाखविला जातो. म्हणजे आपोआपच वीज गळती १५% दिसते. याचे मूल्यमापन केले असता जवळपास १२ हजार कोटी प्रतिवर्षी भ्रष्टाचार होत असून गृह, महसूल यानंतर वीज खाते हे सर्वात जास्त भ्रष्टाचारी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात आजचे जे वीजदर आहेत २० ते २५% कमी होऊन प्रति युनिट दोन रुपये वीज दर कमी करता येतो, परंतु तशी सरकारची मानसिकता नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हाभरातून जुनाट वीज खांब, वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, कमी दाबाचा वीज पुरवठा आदी सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर जिल्ह्यात महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चरच नसल्याचे मत श्री होगाडे यांनी व्यक्त केले. २००५ सालापर्यंत डीपीला भाडे देण्याची तरतूद होती. परंतु आपण वारंवार सांगून एकानेही भाड्याची मागणी केली नसल्याने २०२१ मध्ये नियम बदलले आणि भाडे देणे पद्धत बंद झाल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. वहन आकार आज आणि काल आलेला नसून २०१६ पासून वहन आकार आकारला जातो. पूर्वी असलेल्या वीज आकाराचे दोन भाग केले त्यातीलच एक म्हणजे वहन आकार. परंतु सोशल मीडियावर चुकीच्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल केली जाते, असे सांगत ग्राहकाने महावितरणकडे वीज जोडणीची मागणी केल्यानंतर एक महिन्यात तुम्हाला त्यांनी जोडणी दिली पाहिजे, जर वीज खांब टाकायचे असतील तर वीज जोडणीची मुदत तीन महिने आहे असेही सांगितले. विजेचा अपुरा पुरवठा होतो हे कारण देऊन व्यावसायिक ग्राहकांना वीज जोडणी नाकारणे हा गुन्हा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल सांगितले. वारंवार वीज खंडित होणे हा भयानक प्रश्न आहे. याकरिता लोकल एस ई, ई ई यांच्या ऑफिसवर मोर्चा न्या, शेतकऱ्यांनी वीज मीटर बसून घेऊन मीटर प्रमाणे वीज बिल भरा अशाही सूचना त्यांनी केल्या. शेती पंप विज बिल माफ होणार अशा प्रकारची जी माहिती समोर येत आहे त्यात शेतीपंपाचे मागील बिल किंवा थकबाकी याची माफी होणार नसून ४.५ हॉर्स पावरच्या आतील वीज वापर असलेल्या ग्राहकांची भविष्यात येणारी वीजबिले मोफत होतील असे विधान केले आहे. आंबड येथील ३६ किलोमीटरच्या फिडरचे किमान तीन तुकडे झाले पाहिजेत, तर अपघात नुकसान भरपाई बाबत बोलताना श्री होगाडे यांनी सांगितले की, घरगुती उपकरणे जळाली तर नुकसान भरपाईची कोणतीही तरतूद वीज वितरण कायद्यामध्ये नाही. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यात तशा प्रकारची तरतूद आहे, त्यासाठी अपघात अथवा नुकसान भरपाई झाल्यावर त्याचे योग्य ते रेकॉर्ड ठेवले पाहिजे, नुकसान भरपाई झालेल्या वस्तूचे बिल असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तलाठी पोलीस आदींकडून केला जाणारा पंचनामा वेळेत केला पाहिजे, शेती गुरेढोरे जनावरे आणि माणसांच्या नुकसान भरपाईसाठी पंचनामा अत्यंत आवश्यक बाब आहे, असे सांगत महावितरणकडे लाखो मीटर शिल्लक आहेत मग बाजारातून मीटर का आणायला सांगतात? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी मागणी करा. वीज मीटर कुडाळ मध्येच नव्हे तर आय टी आय, वगैरे मान्यताप्राप्त संस्थेत स्वतः उपस्थित राहून समोर टेस्टिंग करून घ्या, अशा प्रकारच्या सूचना श्री.होगाडे यांनी केल्या.

 

*प्रीपेड मीटर लावणार नाहीत असा कोणताही निर्णय झाला नाही, ही केवळ धूळ फेक*

महाराष्ट्रात विविध खाजगी कंपनीकडून प्रीपेड मीटर लावण्याची मंजुरी सरकारने दिली असून तशा प्रकारचा सर्वे अदानी कंपनीकडून सुरू असल्याबाबत ग्राहकांनी माहिती दिली व प्रीपेड मीटर लावणार नाहीत अशा बातम्या पेपर मध्ये येतात हे खरे आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर श्री प्रताप होगाडे यांनी प्रीपेड मीटर लावणार नाहीत असा कोणताही निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नसून भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी खोटी अफवा किंवा विधाने काही जणांकडून केली जात आहेत, परंतु “ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रीपेड मीटर बसविले जातील” अशा प्रकारचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते हे बरोबर आहे, असे सांगितले त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या विज बिलची झेरॉक्स प्रत जोडून “प्रीपेड मीटर बसविण्यात येऊ नये” असे दोन ओळींचे पत्र संबंधित उपकार्यकारी अधिकारी अथवा सहाय्यक अभियंता यांच्या ऑफिसमध्ये देत प्रीपेड वीज मीटरला विरोध करा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. उपस्थित ग्राहकांना त्यांनी स्मार्ट मीटर नाकारणे बाबतच्या अर्जाचे वितरण सुद्धा केले. *आपल्या घरात कोणता मीटर पाहिजे हे ठरविण्याचा अधिकार कंपनीला नाही तो अधिकार ग्राहकांचा आहे* त्यामुळे प्रीपेड मीटरला ठामपणे विरोध करा अन्यथा भविष्यात या मीटर साठी बारा हजार रुपये डिपॉझिट तुमच्याच वीज बिलातून प्रत्येक महिन्याला कापले जाईल व तुमचा सध्याचा जो मीटर आहे तो सुद्धा स्मार्ट मीटर आहे, त्याचे डिपॉझिट सुद्धा शून्य होणार. मीटर मोफत बसविणार ही महावितरण कंपनी करत असलेली जाहिरात बोगस आहे. ३०० युनिट पेक्षा कमी वीज आकार असणाऱ्या ग्राहकांना स्मार्ट मीटरची गरज नाही तर सरकारकडून सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी म्हणजे खाजगी करण्याच्या दिशेने असलेली वाटचाल आहे. याचा फायदा अदानीला आणि केवळ ग्राहकांना मनस्ताप होणार, एवढेच नव्हे तर बेरोजगारी वाढणार अनेक वायरमन, कर्मचारी, अधिकारी नोकऱ्या गमावून बसणार, ठेकेदार बेरोजगार होणार त्यामुळे वेळीच स्मार्ट मीटरना विरोध करा असेही त्यांनी सांगितले.

 

*१९१२* हा महावितरणचा तक्रार दाखल करण्याचा नंबर असून हे सर्वात मोठे हत्यार आहे. आपला मोबाईल नंबर वीज बिलाला रजिस्टर करा आणि या नंबर वर जेव्हा वीज पुरवठा खंडित होईल तेव्हा तेव्हा तक्रार दाखल करत जा. असा मौलिक सल्ला व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी दिला. वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना बोलण्याचे ट्रेनिंग देण्याची गरज असल्याचे सांगत वीज ग्राहक संघटनेने वर्षभर केलेल्या कामांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक ॲड.नंदनजी वेंगुर्लेकर यांनी केले व वीज ग्राहकांना अमूल्य असे मार्गदर्शन देखील केले. आभार प्रदर्शन जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे मावळते सचिव श्री निखिल नाईक यांनी केले. यावेळी श्री.निखिल नाईक यांनी तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा सचिव पदाचा राजीनामा दिल्याने नूतन जिल्हा सचिव म्हणून सावंतवाडीचे श्री.दीपक पटेकर यांना श्री.प्रताप होगाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मराठा समाज हॉल कुडाळ येथील आयोजित जनता दरबारासाठी कुडाळ नगरपालिकेचे नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका ज्योती दळवी, श्रेया गवंडे, राजू गवंडे मा.उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, माजी उपनगराध्यक्ष आफरीन करोल, वीज ग्राहक संघटनेच्या सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष संजय लाड सावंतवाडी, गुरुनाथ कुलकर्णी कणकवली, दिनेश पटेल देवगड, समीर शिंदे, कार्यकारणी सदस्य, अश्विन मुंज, लक्ष्मण निगुडकर, हनुमंत पेडणेकर, आधी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*श्री प्रताप होगाडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत वीज ग्राहक संघटनेने दिले निवेदन*

कुडाळ येथील जनता दरबार आटोपल्यानंतर वीज ग्राहक संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रताप होगाडे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांची भेट घेत वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या आणि महावितरणकडून वीज वितरण व्यवस्थेत होणारी दिरंगाई तसेच महावितरणच्या काही अधिकाऱ्यांकडून केली जाणारी अरेरावी आणि उद्धट वर्तन याबाबतची तक्रार लेखी निवेदनाद्वारे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वीज ग्राहक संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी श्री मच्छिंद्र सुकटे यांची देखील भेट घेत त्यांच्याकडे निवेदन सादर करत आपले म्हणणे मांडले. या जिल्हा मेळाव्यातून दाखल झालेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे संकलन करून रत्नागिरी येथील विभागीय कार्यालय तसेच मुंबई येथील प्रतापगडचे मुख्य कार्यालय आणि मंत्रालय येथे सदरच्या संकलन केलेल्या तक्रारी येत्या काही दिवसात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट व जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली. या जनता दरबारासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व वीज ग्राहक लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवरांचे जिल्हा वीज ग्राहक संघटनेने आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा