*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान भावकवी वि.ग.सातपुते (विगसा) यांच्या “सांजाळ” या रचनेचे विनय पारखी यांनी केलेले रसग्रहण*
“सांजाळ”
मित्रहो ,
संध्याकाळचा प्रहर याविषयी प्रत्येक कवीचा संध्याकाळकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. संध्याकाळच्या कविता अनेक रंग रूपांनी आपल्या समोर येतात, जसे क्षितिजावरचे संध्याकाळचे रंग क्षणक्षणाला बदलतात ना अगदी तशाच असतात *या ‘संध्याकाळच्या कविता’*. कोणाची संध्याकाळ प्रेमाची गुलाबी असते तर कोणाची मन अस्वस्थ करणारी उदास तर कोणाची समईच्या दिव्याप्रमाणे तेवणारी शांत, पवित्र,अध्यात्मिक तर कोणाची घुंगरांच्या आणि ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या पाऊलांसारखी लयबद्ध परंतु बंदिस्त, दुसऱ्याचे मन रिझवता रिझवता स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला लावणारी. अनेक कवींनी या संध्याकाळचे वर्णन आपापल्या परीने खूप सुंदर प्रकारे केले आहे.
संध्याकाळ, सांजाळ, सांज, तिन्हीसांजा, कातरवेळ कशीही असो ती कधी ना कधी तरी प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की येणार असते आणि त्यात आयुष्याची संध्याकाळ म्हटलं तर प्रथम आठवते ती *भा. रा. तांब्यांची ‘ढळला रे ढळला दिन सखया ,संध्या छाया भिवविती हृदया’ ही वास्तवदर्शी कविता.* अशा असंख्य प्रतिभावान कवींच्या अनेक संध्याकाळच्या कविता रसिकांच्या मनावर गारुड करतात. *तशीच एक विगसा सरांनी लिहिलेली कविता म्हणजे ‘सांजाळ’.*
असं म्हणतात की संध्याकाळ हळूहळू संधीप्रकाशात विरत जाते तसतशी मानवी मनात पोकळी निर्माण होत जाते. मन कितीही तरुण असलं तरी शरीराला मर्यादा असतात. उतारवयात कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. ही उतारवयातील संध्याकाळची कातरवेळ मन अस्वस्थ करते, वाटतं जीवनाचा दिवस संपत आला आहे; म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी यावर उपाय म्हणून की काय अशा संध्याकाळच्या सुंदर दिवेलागणीच्या वेळेला *’शुभंकरोती कल्याणम*’ किंवा यासारखी देवाची स्तुती करणारी स्तुतिस्तोस्त्र्ये म्हणण्याची प्रथा पाडली असेल.
दिवस-रात्र, ऊन-पाऊस, सुख-दुःख, चढ-उतार तसेच सकाळ-संध्याकाळ हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. परंतु आपल्या जीवनांत असलेल्या विलोभनिय संध्याकाळचं आणि त्यानंतर येणाऱ्या कातरवेळेचं अस्तित्व आपल्याला विशेष जाणवतं ते म्हणजे आपल्या उतारवयात. या पृथ्वीतलावर अमरत्वाचं वरदान घेऊन कोणीच जन्माला येत नाही. ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू हा येणारच आहे; हे विधिलिखित सत्य आहे. जसा सूर्याचा उदय म्हणजे सकाळ आणि सूर्याचा अस्त म्हणजे संध्याकाळ असते तसेच असते आपले जगणे. हा जन्ममरणाचा प्रवास असाच अव्याहतपणे सतत चालू असतो. प्रहर बदलतो, ऋतू बदलतात पण मन मात्र अचलपणे एकट्यानेच निमूटपणे सगळं सहन करत असतं. आपणही आपल्या मनःपटलावर असे अनेक प्रश्न अधांतरित ठेवून ते सर्व प्रश्न अर्धवट सोडून गडद अंधाराच्या मिठीत हळूहळू ओढले जात असतो. जसा परतीच्या वाटेवर मावळतीला हळूहळू अस्ताला चाललेला सूर्य जसे आपले रंग बदलतो ना तसंच संध्याकाळचा हा आसमंत हळूहळू अलगदपणे चोर पावलांनी आपल्या काळजात घुसू लागतो. जसजसा प्रहर बदलत जातो तसतसा मनातील हळव्या प्रश्नांचा कल्लोळ उचंबळून येतो. अशा या उदास कातरवेळी मनात लपलेल्या भावना हळूहळू आपलं डोकं वर काढू लागतात. जसे हळूहळू क्षितिजावरचे ते मनमोहक रंग ओसरू लागतात तसा अंधार दाटून येऊ लागतो; तसतशा मनातल्या भावलहरी अस्थिर आणि चंचल होऊ लागतात. हळवं मन वितळून जातं. मनात साचवून ठेवलेल्या भावनांचा बांध हळूहळू सैल होऊ लागतो. गेल्या कित्येक दिवसांत जपलेल्या त्या अव्यक्त भावनांना आपण अचानकपणे कुरवाळू लागतो. त्या भावनांचा लेखाजोखा आपल्याच मनाशी आपण मांडायला लागतो. विचारांचं काहूर माजत. त्या नाजूक तरल हळव्या प्रेमाच्या संवेदनांनी डोळ्यांच्या ओलावलेल्या पापण्यात ती *’सांजाळ’* अलगदपणे मिटून जाते.
भूतकाळातील काही घडून गेलेल्या गोष्टी अशा असतात की ज्यांचं आपल्या मनात असलेलं दुःख, सल, वेदना आपण इतरांशी मन मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाही. कारण ते आपल्या मनातील हृदयाच्या खोल कप्प्यात दडलेलं आपलं गुज असतं. त्यावर काळ हेच औषध असतं. परंतु काही गोष्टी आपण विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या आपल्याला विसरता येत नाहीत. अशीच मनाला लागून राहिलेली एक सल कवीच्या मनाला उद्विग्न करत आहे. ही सल, ही वेदना भावनिक आहे. त्यात विरह ही आहे आणि त्यात समाधानाच सुख ही आहे. *अशीच एक विगसा सरांची ‘सांजाळ’ नावाची कविता.*
या कवितेत विगसा (वि.ग. सातपुते) सरांनी उतारवयात परिस्थितीने हताश होऊन शरीराने थकलेल्या एका प्रियकराची व्यथा मांडली आहे. या उतारवयात का ? कोणाला दोष द्यायचा. जे भोग नशिबी आले आहेत ते तर प्राक्तनाचा भाग आहेत असं या प्रियकराला वाटतं. भूतकाळाच्या गर्तेत प्रियकराचं हरवलेलं प्रेम अजूनही त्याच्या हृदयी तसंच ताज टवटवीत आहे. प्रेयसीच्या त्या सुरम्य आठवणींनी ती संध्याकाळ प्रियकराला मोहरून टाकते. *अशाच तिच्या अनेक आठवणींत घालवलेली ‘सांजाळ’ आज क्षितिजापल्याड थबकल्यासारखी वाटते.*
त्या आठवणी आज अनेक वर्षे झाली तरी विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाहीत. संध्याकाळच्या वेळेला दरवळणारा बकुळीचा सुगंध प्रियकराला त्याच्या त्या निःस्सीम प्रेमाची आठवण करून देतो आणि नकळत त्याच्या मनात प्रश्न उद्भवतो आणि त्याच उत्तर तो प्रियकर आपल्यालाच शोधायला सांगतो.
*खरंच प्रीतिविण जगणं म्हणजे* *जगणं असतं कां हो ?*
*सांजाळ*
किती, कसे, कुठे शोधू तुला
अशी कुठे? तूं हरवुनी गेली…
लोचनी रूप तुझेच लाघवी
पापणी, नित्य पाणावलेली…
प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे
क्षितिजी सांजाळ थबकलेली…
निलांबरी, मोहोळ आठवांचे
निमिषात तूंच उठवुनी गेली…
हे सारे, आज कसे विसरावे
अशी कुठे गं तूच हरवून गेली…
प्रीतिविण कां? जगणे असते
धुंद श्वासात, गंधाळते बकुळी
शीणलो तरी वाटते तुला पहावे
सांजाळलेल्या या कातरवेळी…
खरंच संध्याकाळ या विषयावर असंख्य कविता, गाणी आहेत. त्या सगळ्यांची नुसती आठवण काढायची म्हटली तरी कित्येक संध्याकाळ अशाच घालवाव्या लागतील. अशा या सुरेख आणि सुरेल संध्याकाळसाठी कवी ग्रेस यांच्या कवितेच्या ओळी आठवतात आणि फक्त एवढंच म्हणावसं वाटत…
*स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे*
*हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे.*
*भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते.*
*© विनय पारखी*
Cell – 9819673320
Mail – vinayparkhi@gmail.com