काजूला दिडशेचा भाव मिळण्यासाठी प्रविण भोसले प्रयत्नशील
गोव्याच्या कृषीमंत्र्यांशी चर्चा; आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करणार…
सावंतवाडी
काजूला दिडशे रुपया पर्यंत हमीभाव मिळावा यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राज्याच्या कृषी आणि पणन मंत्र्यांना भेटून याबाबत धोरण ठरविण्याचे आवाहन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर गोव्यात देण्यात येणाऱ्या काजू भावाबाबतची माहिती आज त्यांनी घेतली. यावेळी बागायतदार संघटनेच्या पदाधिकार्यांना घेवून त्यांनी गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. यावेळी श्री. नाईक यांनी आम्ही दिडशेचा दर आता १७० पर्यंत देण्यासाठी प्रयत्नात आहोत, अशी माहिती शिष्टमंडळाला दिली.
सिंधुदुर्गातील काजूला दिडशे रुपयापर्यंत काजू भाव मिळावा यासाठी गेले अनेक दिवस बागायतदार संघटनेकडुन आंदोलन करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात मंत्री दीपक केसरकर यांनी ११० रुपये असलेल्या दराच्या ठिकाणी १३५ पर्यंत दर दिला जाईल. यातील १० रुपये हे शासनाकडुन अनुदान स्वरुपात दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र आचारसंहिता असल्यामुळे अद्याप पर्यंत संबंधित अनुदान आपल्याला मिळालेले नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागायतदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी श्री. भोसले यांच्या कानावर हा प्रकार घातला. यावेळी त्यांनी गोव्यात नेमका कोणता निकष लावला? याबाबतची माहिती खुद्द कृषी मंत्र्याकडून घेवू आणि त्यानंतर महाराष्ट्रात हा दर मिळण्यासाठी पाठपुरावा करू, असा निर्णय घेतला. त्यानुसार आज त्यांनी मंत्री नाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही महाराष्ट्राचे कृषी आणि पणन मंत्र्यांची भेट घेवून पाठपुरावा करणार असल्याचे श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सौ.अर्चना घारे-परब, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मंदार शिरोडकर, संदीप देसाई, दिवाकर म्हावळणकर, अशोक सावंत, आकाश नरसूले, संजय देसाई, योगेश कुबल, विवेक गवस, ऋतिक परब, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.