*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान कवी वि. ग. सातपुते यांच्या काव्याचे कवयित्री ऐश्वर्या डगावकर यांनी केलेले रसग्रहण*
*पाऊस*
🌧️🌧️🌧️🌧️
रिमझिमणारा पाऊस
बरसते संतत शब्दगंगा
मनांतरी वाहुनी दुथडी
नाहू घालीते , अंतरंगा..।।..
मन , सृष्टीचे प्रतिबिंब
लाघवी पुण्यपावनगंगा
बरसता ऋतू पावसाळी
प्रीतपूरी डुंबते भावगंगा..।।..
प्रसन्न हिरवळलेळी धरा
झुलविते मग्न आत्मरंगा
स्पर्शूनी , शीतल गारवा
सुखवी अलवार अंतरंगा..।।
भिजती चिंब क्षण हळवे
अवतरते अंतरी स्वर्गगंगा
झुळझुळ ओघळ लोचनी
ओंजळीत मुग्ध भावगंगा..।।
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
*📞9766544908*
वा! रिमझिमणा-या पावसाप्रमाणेच शब्दगंगा मनात दुथडी भरून वहात असते. वि.ग.सातपुते म्हणजे भावकवी आप्पा .! या कवीच्या मनात शब्दसंपदा इतक्या विपुल प्रमाणात आहेत की त्या सतत वहात असतात आणि आतल्या अंतःकरणास शुद्ध करत असतात म्हणजे नित्य नवीन भावनांनी ती अंतरंगास न्हाऊ घालत असतात.
कवी म्हणतात आपलं मन हेच खरंतर सृष्टीचं प्रतिबिंब आहे.मन आनंदी तर सर्व जग आनंदी .मनुष्याचे सर्व भाव संभ्रम मनाचा खेळ असतो.आपल्या अंतरंगातच सर्व ऋतू देखील सामावले आहे.
मानवी अंतरंगाचे विविध भाव हे बाह्यसृष्टीवर जरी अवलंबून असले तरी खरी सृष्टीच अंतरंग आहे.
ते प्रसन्न अंतरंग म्हणजेच हिरवे गार रुप घेतलेली धरा.आणि ती धरा आपल्या मनाला आतल्या आत्म्यास झुलवत असते.त्यात विविध रंग भरत असते .आणि तो रंग म्हणजे दूसरं तिसरं काही नसून केवळ श्रीरंग…!!!आत्मानंदात दंगलेल्या कवीला हे प्रसन्न मन झुलवत असतं आणि थंड गारवा देत असतं. यात कवीला असं म्हणायचं आहे की बाह्य ऋतूंचा जितका परिणाम आपल्या मनावर होत असतो. तो तर क्षणिक असतो त्याहीपेक्षा ज्याचं मनच सदा हिरवं म्हणजे प्रसन्न असतं ते आत्म्यास नेहमी आनंद देत असतं …!!
त्या आत्मानंदात चिंब भिजताना
हळव्या मनाला झालेला आनंद त्यांच्या लोचनातून म्हणजेच डोळ्यातून पाझरत असतो आणि तो आनंद ओंजळीत भरून घेतांना म्हणजेच मनरुपी ओंजळीत भरून घेतांना मनातील भावना ही मुग्ध हळुवार होतं जाते.आतल्या आत आत्मानंदात मग्न होऊन जाते.
*सौ ऐश्वर्या डगांवकर इंदूर*