कोविशिल्ड लसीला आपत्कालीन मंजुरी देण्याचे सूत्रांचे म्हणणे..
वृत्तसंस्था :
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने घेतल्याची बातमी समोर आली आहे. यावर आता डीसीजीआयला अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानंतर देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत दिल्लीत आज कोरोना तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ऑक्सफर्ड-एस्ट्राजनेकाची कोरोना लस कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराबाबत विचार करण्यात आला. त्यानंतर या लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या लसीचे तब्बल ५ कोटी डोस सीरम इन्स्टिट्यूटने तयार केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी सकाळीच कोल्ड स्टोरेजमधून या लसीच्या शॉटस्चा पुरवठा भारतातील विविध राज्यांत केला जाऊ शकतो. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील लसीकरणात ३० कोटी लोकांना लस दिली जाणार असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
तत्पूर्वी फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातील एक प्रेझेंटेशन तज्ज्ञ समितीसमोर दिले होते. त्यानंतर आज सीरमच्या कोविशिल्डला आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांत लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. ब्रिटन आणि अर्जेंटिनामध्ये सार्वजनिक वापरासाठी लसीला मंजुरी दिली आहे. आता भारतानेही कोविशिल्डला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याने लवकरच लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*कोणी विकसित केली लस?*
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील दी जेनर इन्स्टिट्यूट या संस्थेतील शास्त्रज्ञांनी ऍस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्वीडिश कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारी करून ही लस विकसित केली आहे. ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनेका यांनी या लसीची जागतिक पातळीवरील निर्मिती आणि वितरणासाठी करार केल्याचे ३० एप्रिल रोजी जाहीर केले होते.
*सीरमकडे ७.५० कोटी डोस तयार*
भारतातले सर्वात मोठे लस उत्पादक असणा-या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला यांनी आपल्याकडे ७.५० कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लसीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात १०० मिलियन म्हणजे १० कोटी डोस तयार असतील, असे त्यांनी सांगितले.
*आजपासून देशात ड्राय रन*
२ जानेवारीला देशातील प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. त्यानंतर उद्यापासून संपूर्ण देशात ड्राय रन सुरू होणार असून, देशात लसीकरण सुरू होण्याअगोदरची रंगीत तालिम प्रत्येक राज्यांतील ठराविक शहरात करून पाहिली जाणार आहे.