एक पोलिस अधिकारीच चोरीची गाडी वापरत असल्याची धक्कादायक माहिती उत्तर प्रदेशमध्ये समोर आली आहे. उत्तर प्रदेशात एका व्यक्तीची वॅगनोर कार २०१८ साली चोरीला गेली. कार चोरीला गेल्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेला दोन वर्ष झाल्यानंतर कार मालकाला ३० डिसेंबर २०२० म्हणजेच या आठवडयाच्या बुधवारी चक्क सर्व्हिस सेंटरमधून फोन जातो. सर्व्हिस सेंटरचा कर्मचारी फोनवर कार मालकाला गाडीच्या सर्व्हिसिंगबाबत फिडबॅक विचारतो. हा प्रश्न एकूण कार मालक चक्रावून जातो. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस येतो़
सर्व्हिस सेंटरच्या मालकाशी बातचित केल्यानंतर कार मालकाला माहित पडते की, ती कार एक पोलीस अधिकारी वापरत आहे. विशेष म्हणजे तो पोलिस अधिकारी कुख्यात गुंड विकास दुबे याच्या टोळीकडून ३ जुलै २०२० रोजी झालेल्या गोळीबारातील जखमी पोलिस अधिका-यांपैकी एक आहे. त्यामुळे कार मालक ओमेंद्र सोनी यांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
नेमके प्रकरण काय?
ओमेंद्र सोनी यांची कार ३१ डिसेंबर २०१८ रोजी बर्रा येथील कार वॉशिंग सेंटर येथून चोरीला गेली. याप्रकरणी सोनी यांनी तातडीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस आपल्याला आपली गाडी शोधून देतील, अशा आशेवर सोनी होते. याच आशेतून दोन वर्ष निघून गेले. त्यानंतर ३० डिसेंबरला अचानक सोनी यांना एका सर्व्हिस सेंटरमधून फोन आला. याच फोनमुळे सोनी यांच्या गाडीचा तपास लागला.
खरंतर सोनी यांची गाडी कानपूरच्या बिठूर पोलिस ठाण्याचे अधिकारी कौशलेंद्र प्रताप सिंह वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सर्विस सेंटरच्या मालकानेच माहिती दिली. पोलीस अधिका-याने ती कार सर्व्हिस सेंटरला लावली होती. गाडीच्या सर्व्हिसिंगनंतर सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिसिंग कशी झाली, याबाबत फिडबॅक घेण्यासाठी एका कर्मचा-याने सोनी यांना फोन केला. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर कानपूरसह संपूर्ण देशभरात या विषयावर चर्चा सुरु आहे.
या घटनेप्रकरणी कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहित अग्रवाल यांनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात योग्य कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.