You are currently viewing पंचतारांकित हॉटेलचे स्वागतच, पण सर्वसामान्य रुग्णांच काय…? – प्रविण भोसले

पंचतारांकित हॉटेलचे स्वागतच, पण सर्वसामान्य रुग्णांच काय…? – प्रविण भोसले

पंचतारांकित हॉटेलचे स्वागतच, पण सर्वसामान्य रुग्णांच काय…? – प्रविण भोसले

सावंतवाडी :

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच सावंतवाडीत पंचतारांकित हॉटेल निर्माण करण्याचे भाष्य केले. निवडणूक आली की सावंतवाडी मतदार संघातील भोळ्या जनतेच्या भावनांशी खेळ करत काहीतरी कोटीची कोटी उड्डाणे घेऊन येथील जनतेला खोटी स्वप्ने दाखवायची ही मंत्री महोदयांची जुनी पद्धत आहे. आताही ते आपल्या याच पद्धतीला अनुसरून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत घोषणांचा पाऊस पडणार आहे. परंतु आजपर्यंत त्यांनी केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी केला आहे.

सावंतवाडी मतदारसंघात सेट टॉप बॉक्स प्रत्येक घरात येणार, येथील महिलांना विविध पद्धतीने स्वयंरोजगार निर्माण करणार, बेरोजगारांसाठी विविध पद्धतीचे उद्योगधंदे निर्माण होणार, चष्म्याचा कारखाना निर्माण करणार, एवढेच काय तर सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येणार अशा कितीतरी कोटीची कोटी उड्डाणे घेणाऱ्या घोषणा यापूर्वी देखील केसरकारांनी केलेल्या असून सावंतवाडी मतदारसंघातील सुज्ञ मतदार त्या घोषणा आजही विसरलेल्या नाहीत. आता पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेल निर्माण करू अशी केसरकर यांची घोषणेचा निश्चित येथील जनता स्वागत करेल पण सर्वसामान्य रुग्णांचे येथे प्रचंड हाल होत आहेत. जनसामान्यांचे रोज जीव जात आहेत. येथील सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत असून त्यांना गोळ्या, औषधे देखील पुरेसे प्रमाणात या शासनाकडून पुरविले जात नसल्याचे दिसते.
अपघातग्रस्त रुग्णांना येथे पुरेश्या उपचार सुविधा नसल्यामुळे गोव्यात उपचारासाठी जावे लागते. हे मागील पंधरा वर्षे आमदार आणि मंत्री असलेल्या केसरकरांना दिसत नाही का ?म्हणून उगीच कोटीची कोटी उड्डाणे घेणाऱ्या घोषणा करायच्या आणि येथील जनतेचा भ्रमनिरास करायचा, हाच उपक्रम त्यांनी गेल्या 15 वर्षात अवलंबला आहे, असाही टोला श्री भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा