You are currently viewing नात्यांची वीण

नात्यांची वीण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम लेख*

 

*नात्यांची वीण*

 

माणूस जन्माला आला की त्याला आपसूकच नाती चिकटतात. आजीआजोबा,आईबाबा,काका काकू,मामा मामी,मावशी आत्या हरतऱ्हेची‌ नाती.

मित्र निवडायचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल पण नातेवाईक निवडायचं स्वातंत्र्य? छे छे  ते नाही मिळत. कारण ते by default तुमच्या आयुष्यात असतात.

 

*नात्यांची गुंफण अलवार फुललेली*

*मानवी भावभावना शब्दांत गुंफलेली*

*कधी कच्ची तर कधी तलम वीण उलगडलेली*

 

पूर्वी सर्रास एकत्र कुटुंब पद्धत होती.त्यात सगळे सख्खे चुलत, आतेमामे भावंड गुण्यागोविंदाने नांदायची.एकमेकांना सांभाळून घ्यायची, एकमेकांवर अधिकार गाजवायची. क्वचित प्रसंगी रूसवेफुगवे असायचे,वादावादीही व्हायची  पण ती तेवढ्यापुरती.परत आपले गळ्यात गळे घालून तयार.मोठ्यांचा आदरयुक्त धाक असायचा.पण त्यात गोडी होती. नात्यांची ओढ होती. सगळ्या गोष्टी वाटून घेणं ,काळजी घेणं होतं एकमेकांसाठी कुठलीही गोष्ट करायची तयारी होती. त्यात आनंद होता नात्यांची  वीण घट्ट होती.

*बंध सहवास माया आपुलकीच्या धाग्यांनी गुंफलेली*

*जितकी नाती सहज तितकी सहज फुललेली*

*घट्ट बंधात मऊ मुलायम भाव उमललेली*

हळूहळू विभक्त कुटुंब पद्धती आली. शहरापरामाणे गावाकडेही हेच चित्र पहायला मिळते.चुलत आतेमामे भावंड आता distant cousins झाले.. Caring  sharing बदललं.अहंकार मोठा झाला.त्यामुळे नात्यांची समीकरणं बदलली. सगळीच कडे असं असेल असं नाही.अपवाद असतीलही आणि असावेतसुद्धा.

सध्या मोबाईल इंटरनेट मुळे आयुष्य एकदम यंत्रवत झालं आहे.आभासीयुग झपाट्याने वाढतंय. त्यामुळे एकटेपणा वाढत चालला आहे.आपल्या मनातल्या भावना,चुका  खंत कुणाला सांगावी असं वाटलः तर अशी जवळची व्यक्ती सगळ्यांना भेटेलच असं नाही. अशा वेळी समवयस्क नातीच उपयोगी पडतात.

………पण आजकाल  नाती ही सोईप्रमाणे बदलताना दिसतात.त्याचे अनुभव थोड्याफार फरकाने आपल्या सगळ्यांना येतातच. काही नाती ही ओंजळीतल्या पाण्यासारखी  असतात.पाणी कसं ओंजळीत रहात नाही.हात फक्त ओले होतात. म्हणजे  जेवढ्यास तेवढी. काही नाती ओंजळीतल्या फुलासारखी असतात.थोड्या सहवासानेसुद्धा आनंद देणारी..काही नाती मोत्या सारखी असतात. मऊ मुलायम पण आश्वासक. अत्यंत जवळची. सख्खीच  असतील असंही नाही. पण ती तुमच्या बरोबर कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी रहातात.. काही नाती नुसती मिरवायला पण असू शकतात बरं का!त्यांचा जेव्हा स्वार्थ  असेल तेव्हा  तुमची आठवण काढणारी.आपण किती जवळचे आहोत असं उगाच  भासवणारी.

*काही नाती जन्मभर जोडलेली*

*काही नाती बंधनात अडकलेली*

*काही कोणत्याही नावांच्या पलिकडली*

प्रत्येकाच्या आयुष्यात  नाती आणि नातेवाईक हा अविभाज्य घटक आहे. नाती जपावी‌ नव्हे ती

जपायलाच हवीत. काही नाती अगदी जवळची मोत्या सारखी असावीत की ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य मौल्यवान होऊन जातं. नात्यांची  वीण घट्टं होते.

*नात्यांची गुंफण करताना माणसं घडवायची*

*त्यांची जडणघडण शांतपणे पहायची*

*नात्यांची गुंफण कशिदाकारी म्हणून जपायची*

 

. तुमच्याही आयुष्यात तुम्हाला अशी मोत्यासारखी मौल्यवान नाती लाभो हीच मनोमन सदिच्छा!

 

©️®️ डॉ.सौ. मानसी पाटील‌

प्रतिक्रिया व्यक्त करा