You are currently viewing येईलच कसा कंटाळा?

येईलच कसा कंटाळा?

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाचे सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अनिल देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

परवाच माझ्या एका मित्राने आपुलकीने फोनवर तब्येतीची चौकशी केली . मलाही जरा मनोमन बरं वाटलं . बऱ्याच दिवसांपासून गाठी भेटी नाही ,अगत्याने चहा पाणी नाही . थोडं हळहळलो . पण त्याच्या “ कसं करमत रे तुला घरात बसुन ?”या प्रश्नाला मी खरंच तेव्हातरी ऊत्तर देऊ शकलो नाही ,पण मला मनोमना जे वाटलं ते असं …

 

*येईलच कसा कंटाळा?*

 

येईलंच कसा कंटाळा?

 

काहीतरीच तुमचं …

तुमचा प्रश्नच आहे वेंधळा

आपल्याच घरात आपल्याला … येईल कसा कंटाळा॥

 

माझ्या घरातली धूळ सुध्दा … माझ्यावरती प्रेम करते

किती झटकली तरीही … पुन्हा पुन्हा येऊन बसते॥

 

ताट वाटी भांडं …

ही सारीच माझी भावंडं

जेवताना रोज असते सोबत

पिठलं असो की श्रीखंड ॥

 

फ्रीज, मिक्सर, गिझर, टिव्ही … साऱ्या नव्हेत नुसत्याच वस्तू

रिमोट हातात घेतला की … लगेच म्हणतात ‘ तथास्तु ‘॥

 

कपाट नुसतं उघडलं की … उघडतात मनाचेही कप्पे

वरून खाली दिसत जातात आयुष्याचे सर्व टप्पे॥

 

पलंगावर आडवं पडून … खोचून घेतो मच्छरदाणी

तरी लपून बसलेला एक डास … कानामध्ये गुणगुणतो गाणी ॥

 

खिडकी, गँलरी, पॅसेज, बाल्कनी …

घर असतंच नंदनवन

कितव्याही मजल्यावर घर असो …

घरातंच तयार होतं अंगण ॥

 

पत्नि मुलं, सुना, नातू … घरात नेहमीच असते जाग

टेबलावरची एक कुंडी … फुलवते आयुष्याची बाग ॥

 

घरात नुसतं बसून रहा … वाढत जाईल जिव्हाळा

आपल्याच घरात आपल्याला

नाही येणार कंटाळा

प्रतिक्रिया व्यक्त करा