*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि.ग.सातपुते यांच्या कवितेचे श्रीकांत दिवशीकर यांनी केलेले रसग्रहण*
*शब्दफुले*
〰️〰️〰️〰️
निर्मली सुंदर सुमने उमलता
शब्दफुलांना वेचित राहीलो
गंध फुलांचे मज वेड लागता
शब्दसुंगधाला पेरीत राहिलो….
भावफुलांचा हा दरवळ सुंदर
चराचरात मी उधळू लागलो
शब्दभावनांना , उधाण येता
मीही अंतरी , मोहरूनी गेलो….
शब्ददान , ते त्या दयाघनाचे
ओंजळीत मीच झेलू लागलो
सरस्वतीची ती कृपा आगळी
शब्दाशब्दासंगे , डूलू लागलो….
शब्दभावनांचा स्पर्श लाघवी
भावशब्दार्था , उमजु लागलो
शब्दाशब्दातील जाणिवांना
हृदयांतरी नित्य जपत राहिलो….
〰️〰️〰️〰️〰️〰️
*रचना : १००*
*वि.ग.सातपुते( भावकवी )*
*कवितेचे मनोगत आणि रसग्रहण*श्रीकांत.दिवशीकर**
*भावकवी विगसा यांची..**
ही अनुभवातून आलेली वास्तववादी रचना आहे हे बहुदा फार कमी रसिकांना.माहीत असेल . लहानपणापासून त्यांना लागलेले हे कवितेचे वेड आजही तसेच आहे .शब्दांची फुले वेचीत जायचे आणि फुलांची कविता करायची आणि आयुष्यभर त्याचा दरवळणारा सुंगंध वाटत फिरायचे हे कवीचे वेड नाही तर काय म्हणायचे !!!
*कोणा कशी कळावी , वेडात काय गोडी*
*हे प्रेम मुढतेची*सुट्ती ना गूढ कोडी*
जीवनात अनेक प्रकारची सुख दु:खे , अडचणी संकटे , मान अपमान , कौतुक , अवेहलना , सारे सारे झेलून तटस्थपणे जगण्याचे एक शाश्वत सत्य कवीला उमगलेले असते .
विगसांची ही कविता अशाच शब्द फुलांच्या संगतीने आणि दयाघनाने दिलेल्या शब्द वरदानाने , आणि सरस्वतीच्या कृपाप्रसादाने स्वानंदाने जगता येणे सहज शक्य असते ही कल्पना आवडली .
कितीही अडचणीचे जगणे असले तरी आपण आपला आनंद मानून , त्याला जवळ घेता आले पाहिजे . *जगणे कसे फुलासारखे असावे*, आपल्या आनंदानं , कुणाची वाट न पाहता फुल नित्य उमलत असते , आपण कुठे जाणार , कुणाला सुगंध मिळणार , कुणाच्या अंगावर पडणार , कश्याचीही तमा न बाळगता उमलत राहणे हा आपला धर्म फुले कधीच सोडत नाहीत . असेच जीवन असले पाहिजे . शब्द भावनांचा लाघवी स्पर्श जेव्हा लाभतो तेव्हाच शब्द भावार्थ खऱ्या अर्थाने समजू शकतो .
इथे कवी *शब्दानाच फुलांची* उपमा देतो .म्हणूनच शब्द फुले ही निरंतर ह्रुदयात वास करत असतात ही कल्पना किती रोमांचपूर्ण आहे ,!!!
सकाळी अंगणात फुले सडा टाकून मोकळी होतात , रिते होण्यातले समृद्धपण ती फुले किती सहजपणाने दाखवतात .
कवीलाही, वाटते आयुष्य असंच जगता आलं तर ? . फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधीत करता येईल.
*सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना ही असतो….*
म्हणूनच आपल्या शब्दांनी सुगंध निर्माण करणाऱ्या माणसाच्या सहवासात आपण सतत राहिले पाहिजे .मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो असा सहवास मी अनुभवला आहे .
भूतकाळात , डोकावता कवीची रचना एक आंतरिक समाधान शोधत असते , म्हणूनच म्हणावेसे वाटते ” शब्द शब्द जपून ठेवावेत . कुठून येतात सारे शब्द, सरस्वतीचा आशीर्वाद पाठीशी असावा लागतो , तो काव्यातून प्रत्येकवेळी जाणवतो एवढे मात्र नक्की .
शब्दांची साथसंगत , शब्दांचा स्पर्श, आणि शब्दातील कोमल भावना ,यांचे नित्य दर्शन आणि सहवास लाभल्यावर अश्या रचना प्रगटल्या नाहीत तरच नवल !!
कवितेचे मनावर अधीराज्य असते , हृदयाच्या प्रत्येक स्पंदनावर कवितेचा अंकुश असतो, मनातले शब्दगुंजन कवितेतून जेंव्हा गुंजारव करीत असते
त्याचवेळी शब्दांची फुंकर अंतर्मनाला सुखावत राहते आणि मगच अश्या असंख्य वातावरण निर्मिती नंतरच हृदयाचा ठाव घेणारी शब्दफुले उमलत रहातात आणि कविता जन्म घेते .
उमललेली फुले आणि सुचलेले शब्द यांचे नाते युगान युगाचे आहे असे मला वाटते .कवीला याचीच भुरळ पडली म्हणून ही शब्दपुष्पे अर्पण केल्याशिवाय काव्यातली सात्विक अनुभूती आणि निर्मळ समाधानाची प्रचिती येणार नाही .अशी मनाची अवस्था झाली त्यातली अंतस्थ अस्वस्थता कवीला शांत बसू देत नाही , मग असे सुंदर काव्य जन्म घेते .
कविता कशी जन्मास येते ,याचे उत्तर कवीला सहज रित्या सांगता येत नाही .अंतर्मनात उमटलेल्या शब्द भावनांची जेव्हा उकल होते तेव्हाच काव्य जन्म घेते .अनुभवातून आलेल्या सुख दुःखाच्या प्रसंगातून मनाची एक बैठक तयार झालेली असते .
*भावकवी विगसा* आपल्या सर्व रचना या अश्याच वास्तववादी आहेत हे मी लहानपणापासून पहात आलो आहे. आणि ते अंतर्मनातील उमटलेल्या भावनांचे प्रतिबिंब आहे असे मला वाटते . इतक्या वर्षांच्या आपल्या सहवासानंतर आपल्या कवितेतील गूढार्थ मी समजू शकतो . दरवेळी व्यक्त होता येतेच असे नाही .पण काही रचना हृदयाला छेदून जातात आणि अशी शब्दफुले वाचल्यानंतर होणारे समाधान व्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही .
मित्रा , *असेच सुगंधी फुलाचे उत्तर शिंपीत जा..!!*
*श्रीकांत. दिवशीकर*
©️
*सातारा*