सिंधुदुर्ग पोलीस दलात चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलिसांचा सत्कार
सिंधुनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सध्या पोलीस भरती मध्ये गुंतलेले असले तरीही जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावे म्हणून दक्षताही घेतली जात आहे. पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व नागरिकांना चांगली सेवा मिळावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचा कटाक्ष आहे. म्हणूनच चांगले काम करणाऱ्या पोलिसांचा गौरव या निमित्ताने त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील पोलिसांचा शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय क्राईम बैठकीमध्ये सत्कार करण्यात आला.
अनेक गुन्ह्यांमध्ये जलद गतीने तपास करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अंमलदार महिला पोलीस यांच्या कामाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा गौरव समारंभ आयोजित केला. महिला अत्याचार निवारण कक्ष देवगड व कणकवली उपविभागीय पोलीस कार्यालय स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग क्राइम ब्रांच, यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व विविध गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. प्रशस्तीपत्र देऊन या पोलिसांचा गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांची कडक निगराणी असणे आवश्यक आहे अशी भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षकांची आहे. व त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गोवा बनावटीची दारू वाहतूक, अमली पदार्थांचा वापर व वाहतूक व त्या संदर्भातील गुन्हे, मोबाईल चोरी, अनेक पुण्यात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींचा शोध व पळून गेलेले गुन्हेगार, सीसीटीव्ही फुटेज च्या आधार घेत गुन्हेगार शोधण्यात पोलिसांनी केलेले काम, न्यायालयीन कामकाजात पोलिसांनी केलेले उत्कृष्ट तपास काम अशा सर्व बाबींचा विचार करून यात चांगले काम करणाऱ्या या पोलिसांचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यामुळे पोलीस दलातून या गौरव समारंभाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये तपासी अमलदार 58 मिळून 166 पोलिसांचा गौरव करण्यात आला.