अज्ञात चोरट्याकडून महिलेची पर्स चोरून एटीएम मधून १ लाख रूपये लंपास…
कोकण रेल्वेतून प्रवासादरम्यान केली होती चोरी…
वैभववाडी
कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स सोडून तिला तब्बल १ लाख १२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अज्ञात चोरटाकडून घडला आहे. यात पर्समधील १२ हजार तर एटीएम मधून १ लाख रुपये चोरल्याचा संबंधित महिलेचा दावा आहे. प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ (रा.आर्चिणे ता.वैभववाडी) असे तिचे नाव आहे. ही घटना २४ तारीखला घडली. दरम्यान महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रिया सकपाळ व त्यांचे पती २४ जूनला तुतारी एक्सप्रेसने आरक्षित डब्यातून दादर ते वैभववाडी असा प्रवास करत होते. रात्री ३ वा. च्या दरम्यान प्रिया संकपाळ या सीटवरुन खाली उतरत बाथरूम कडे गेल्या. परत त्या आपल्या सीटवर आल्या असता सीटवरील पर्स गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी पतीला उठवत हा प्रकार सांगितला. दोघांनी आजूबाजूला सर्वत्र शोधा शोध केली. मात्र पर्स आढळून आली नाही. पर्समध्ये मोबाईल तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड होते.
मोबाईल चोरीस गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वैभववाडी येथील एसबीआय बँकेत जात खात्यातील पैसे चोरीला जाऊ नये म्हणून अकाउंट ब्लॉक करण्यासाठी त्यांनी अधिकारी यांना सांगितले. दरम्यान त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना समजले. पर्स मधील मोबाईल व कागदपत्राचा आधार घेत अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये गायब केले असावेत असा संशय व्यक्त केला आहे. संकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.