You are currently viewing वटसावित्री: नवे अन्वयार्थ..

वटसावित्री: नवे अन्वयार्थ..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*वटसावित्री: नवे अन्वयार्थ…*

 

१९६८ साली लग्न होऊन १९६९ ला नाशिकला

आलो. खेड्यातून आलेली मुलगी मी. मी लहान

असतांना कापडण्यात तरी कोणी महिला मला

वड पुजेला जातांना पाहिल्याचे नक्कीच आठवत नाही. त्यामुळे तो संस्कार माझ्यावर

नव्हताच. शाळेतल्या पत्र्याच्या पेटीतून आलेल्या पुस्तकात मात्र सत्यवान सावित्रीची

कथा सचित्र वाचली, पाहिली होती, ती चित्रे व

चांदोबा या मासिकातूनही अशा कथा वाचलेल्या मला आठवतात व आजही डोळ्यां

समोर ती चित्रे दिसतात. खूप छान मासिके होती ती वेगवेगळ्या कथा सांगणारी.त्या कथा

वाचून मी अक्षरश: थरारून भारावून जात असे.

गंमत म्हणजे चांदोबातल्या त्या भारतात न

पाहिलेल्या अक्राळविक्राळ हातपाय पसरलेल्या झाडांची मला भयंकर भीती वाटत

असे. विक्रम वेताळ त्या झाडांखाली असत.

तीच झाडे मी २००८ मध्ये इंग्लंड मधील तीन

महिने वास्तव्यात स्कॅाटलंडला नऊ दिवस मुक्कामाला असतांना मॅक्डोनॅाल्ड इस्टेटीत

ह्याची देही ह्याची डोळा पाहिली नि थक्क झाले. वाटले, अरे! लहानपणी चित्रात पाहिलेली झाडे खरी होती तर!

 

झाडावर चढलेला, लाकूड तोडत असलेला,

बळकट शरीराचा सत्यवान अजूनही मला डोळ्यासमोर दिसतो. अशा कथा वाचूनच

आमची पिढी घडली. तेव्हा पासूनच सावित्री

माझे आदराचे स्थान निर्माण झाले. ती हुशारही

किती? एकाच वरात यमराजाकडून तीन वर

तिने तिने पदरात पाडून बुद्धिमत्तेची केवढी चमक दाखवली. यमराजाचा पिच्छा तिने सोडला नाही. शिवाय त्याला प्रसन्न करून घेतले ते वेगळेच.सावित्रीची ही हुशारी तिला

व तिच्या कुटुंबाला वाचवू शकली.अशी पुराणातली कथा आपल्याला माहित आहे.आणि आपण तिच्यावर श्रद्धा ठेवली होती, अजूनही स्त्रिया ठेवतात हा परंपरेचाच

पगडा आहे हे नक्की.रूढी परंपरा सहजासहजी

नष्ट होत नसतात हे खरे आहे, नि ते आपण बघतो आहोत.

 

तिने वडाच्या गुणी झाडाखाली सत्यवानाला

झोपवले व ॲाक्सिजन मुळे त्याचे प्राण वाचले हा अन्वयार्थही मला पटतो.भयंकर विस्तृत असा पर्णसंभार,बऱ्यापैकी मोठी पाने, मजबूत मोठा देहविस्तार,भलेमोठे रूंद खोड,

व शतायुषी असा हा थंडगार छाया देणारा, घट्ट

मुळे रोवून पारंब्यांचा आधार घेत आपला वंशविस्तार वाढवणारा असा एक महान वृक्ष

आहे. त्याच्याकडे पाहताच प्रसन्नता तर वाटतेच पण त्याच्या शीतल छायेत मन सुखावते. त्याची पाणी साठवण्याची क्षमता अफाट आहे व आज त्याचीच आपल्याला गरज आहे. आपण, जे जे आपल्याला उपयोगी

पडतात त्यांची पूजा करतो, करत आलो आहोत. नद्या, सूर्य, नाग अशी त्याची काही उदा. आहेत. झाडे तर आपल्याला सर्वस्व देतात

व शेवट पर्यंत साथ देतात. त्यांच्या शिवाय आपले पानही हलत नाही. त्यांच्या मुळाखोडासह पूर्ण झाडाचाच आपण वापर करतो मग त्याची पूजा का नको? सावित्रीने व

नंतरच्या स्त्रियांनी जरी त्याचे वेगळे अन्वयार्थ

लावले असले तरी आज आपण वेगळा विचार

करु शकतोच ना! तो का करू नये? नक्कीच करावा.आपण त्याचे अंगभूत गुण जाणून घेऊन

एका वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू या. आणि त्याचा कण न् कण उपयुक्त आहे हे

लक्षात घेऊन मानवाचा हितकारी वृक्ष म्हणून

त्याच्याकडे पाहू या. उपवास सोडून द्या असं मी

म्हणणार नाही. पण ते प्रकृतीसाठी करा.लंघन

तब्बेतीला चांगले फायदेशीर आहे म्हणून करा.

आपण आजची पाणी टंचाईची परिस्थिती पाहता असे मुळात पाणी साठवणारे वृक्ष लावून त्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे व त्याचा गंभीरपणे आपण विचार

केला पाहिजे. तरच आपले भविष्य सुरक्षित राहून आपण काळाच्या कसोटीवर टिकून राहू

अन्यथा आपले भवितव्य आताच धोक्यात आले आहे हे विसरून चालणार नाही.

 

वटसावित्री अशी वेगळा विचार घेऊन आपण साजरी करू या.त्या दिवशी प्रत्येकाने एक झाड लावून त्याला वाढवण्याचे व तो पायावर

उभा राहीपर्यंत त्याच्या संरक्षणाची जबाबदारी

उचलू या. असे केल्यास वृक्ष वाढीला लागून

पर्यावरणाचा समतोल राखला जाईलच पण

आपली वसुंधराही हिरव्या शालूने नटून सुंदर

दिसेल. तिच्या वक्षावरील वृक्षराजीवर पक्ष्यांचे

गोकुळ नांदेल व त्यांचाही दृष्टी सुखाला उपयोग होईल.पक्षी रमतील, त्यांची घरटी वाढतील व त्यांनी खाल्लेल्या वडाच्या फळातून बीज प्रसार होऊन आपोआप वाढणाऱ्या वडांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढून ॲाक्सिजन व पर्यावरणाच्या संतुलनालाही मोठा उपयोग होईल. पर्यायाने आज ज्या चिंतेने आपण ग्रासलो आहोत ती

कमी होऊन समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.समाधान हा जीवनाचा ॲाक्सिजनच नाही का? आणि ते फक्त झाडेच

आपल्याला देऊ शकतात.ती ही वड पिंपळासारखी झाडेच.चला तर मग नवी दृष्टी-

नवी सृष्टी निर्माण करू व जुन्यातले सोने निवडून आपल्या नव्या विचारांचा दागिना घडवू

या. जुने ते सारेच टाकाऊ नसते हे जरी खरे असले तरी आज काळाच्या कसोटीवर सर्वच

गोष्टी तपासूनच घ्याव्या लागतील त्याला आपला इलाज नाही.

 

बरंय् मंडळी.. राम राम …

 

प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा