You are currently viewing डॉमिनोज मराठी ऍप सुरू करणार

डॉमिनोज मराठी ऍप सुरू करणार

मराठीत व्यवहार करण्याच्या मुद्यावरून जगप्रसिद्ध ऍमेझॉनला धडा शिकवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे वळवला आहे. डॉमिनोजच्या ऍप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच ऍप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन डॉमिनोजने मनसेला पत्राद्वारे दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेने ऍमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला मनसेने पत्रं, इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्याचा पाठपुरावा केला. मात्र, ऍमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे प्रचंड आक्रमक झाली होती.

त्यानंतर मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये ऍमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळ्ळखट्याकनंतर ऍमेझॉनने शरणागती पत्करत सात दिवसांत अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. हा सर्व प्रकार पाहता डॉमिनोजने अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्करल्याचे चित्र दिसत आहे.

ऍमेझॉन, स्विगी, झोमॅटो नंतर आता डॉमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या ऍपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत ऍप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. ऍमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरू केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरूप धारण केले होते. मनसेकडून मुंबईभरात ऍमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले होते.. यावर नो मराठी, नो ऍमेझॉन असा मजकूर लिहिण्यात आला होता.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा