You are currently viewing अमित सामंतांना विधानपरिषद द्यावी, वाढदिनी मान्यवरांच्या शुभेच्छा…!

अमित सामंतांना विधानपरिषद द्यावी, वाढदिनी मान्यवरांच्या शुभेच्छा…!

पुढचा वाढदिवस कॅबिनेट मंत्री, दोन-तीन आमदारांच्या उपस्थित : अमित सामंत

 

कुडाळ :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सिंधुदुर्गवासियांची तसेच पक्षाची प्रामाणिक राहून सेवा करणाऱ्या शरद पवार यांचे निष्ठावंत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना विधान परिषदेवर घेऊन ‘आमदार’ बनण्याची संधी द्यावी अशा शुभेच्छा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या. कुडाळ मराठा समाज हॉल येथील अमित सामंत यांच्या वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर माझा पुढचा वाढदिवस कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते व दोन-तीन आमदारांच्या उपस्थित होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस कुडाळ येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,कोकण विभाग महिला आघाडी प्रमुख अर्चना घारे,शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनंत पिळणकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर,जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक,मंदार शिरसाट, भास्कर परब, पुंडलिक दळवी, द्वारकानाथ घुर्ये,अभय शिरसाट, किरण शिंदे,राजन नाईक, माजी सभापती राजन जाधव, बाळ कनयाळकर,रामा शिरसाट, सावली पाटकर, सचिन पाटकर, देवा टेमकर ऋतिक परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, गेली 25 वर्ष अमित सामंत हे जिल्ह्याच्या राजकारणात व समाजकारणात काम करत आहेत. जनतेला कायमच मदत करण्याचे ते काम करतात. पक्षात फूट पडुन राजकीय सत्तांतर झाले तरी सुध्दा पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिले. आमच्या शिवसनेतील फुटीनंतर सुध्दा त्यांनी आम्हाला अचुक असे मार्गदर्शन केले. सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुध्दा राष्ट्रवादी संघटना वाढत आहेत. त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. आता इंडिया आघाडीची सत्ता राज्यात येण्याचे वातावरण आहे. त्यात सामंत यांना निश्चितच चांगली पदे मिळतील असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला.

प्रविण भोसले म्हणाले की, आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे लढवय्ये आहेत. त्यांना विधानसभेवर संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. अर्चना घारे म्हणाल्या, पडत्या काळात अमित सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली, सत्ता असो वा नसो पण प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. वेळ प्रसंगी आधार आणि विश्वास एकच आपला भाऊ देवू शकतो. तो भाऊ सामंत यांच्या रूपाने मला मिळाला. संदेश पारकर म्हणाले, अमित सामंत यांची राजकीय स्वप्नं पुर्ण व्हावीत.अमित सामंत हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.अमित सामंत हे शरद पवार यांचे सच्चे कार्यकर्ते आहेत.आपला मित्र मोठा व्हावा, तो आमदार व्हावा पण वैभव नाईक यांना स्पर्धक न होता विधानपरिषदेवर जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सतिश सावंत म्हणाले, कुडाळातच तुम्ही सर्व एकत्र येतात पण आमच्या कणकवलीत मात्र हे चित्र दिसत नाही. अमित सामंत मोठे व्हावेत,आमदार होवून पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मनसे अध्यक्ष धीरज परब, आपचे अध्यक्ष विवेक ताम्हणकर, शिंदे शिवसेनेचे संजय भोगटे, व्हिक्टर डॉन्टस, द्वारकानाथ घुर्ये,बाळ कनयाळकर आदिंनी मनोगत व्यक्त करत अमित सामंत यांच्या राजकीय, सामाजिक कामाची, कार्याची आठवण करत मनपुर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी घोगळे यांनी करून शेवटी आभार मानले.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपण कुठेही जायच नाही. निष्ठा ही महत्वाची असते. म्हणुन आम्ही राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिलो. आमचा निर्णय योग्य आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. आजच्या राजकारणात मात्र निष्ठा दिसत नाही. आमदार नाईक यांना सुध्दा कित्येक प्रलोभने आली पण त्यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत रहाणे मान्य केले. त्यांचा निर्णय किती योग्य आहे हे लवकरच त्यांनाही कळेल. पुढील वर्षाचा माझा वाढदिवस कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते सोबत दोन ते तीन आमदारांच्या उपस्थितीत होईल असा विश्वास व्यक्त करत वाढदिवसानिमित्त दोडामार्ग, देवगड मधील जे कार्यकर्ते उपस्थित राहिलेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानत अमित सामंत यांनी ऋण व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा