You are currently viewing अशा या सावित्री

अशा या सावित्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अशा या सावित्री*

 

पुराणातील सत्यवान सावित्रीची कथा…

 

वर्षानुवर्षं ऐकतोय भक्तीभावानं, तन्मय तेनं, विश्वासानं…

आणि त्याच श्रद्धेनं दरवर्षी वटवृक्षाला मारतो फेऱ्या न चुकता नेमानं…

 

त्या वटपर्णांच्या प्राणवायुतून मिळाले तिच्या पतीला नवसंजीवन

अन् सुटले त्या एकाच यमाचे आवळलेले करपाश…

 

आहेत अशा अनेक सावित्री आजही जरी सावित्री हे त्यांचं नाव नाही…

 

पण यमही आता निरनिराळ्या भयंकर रुपात सामोरा येतोय…

अपघात, घातपात, हार्टअटॅक, कॅन्सर ही तर नित्याचीच रूपं ओळखीची आणि सवयीचीही…

 

पण किडनी फेल होण्यासारखे असाध्य जीवघेणे रोग…

ही सुद्धा त्या यमाचीच आणखी काही अक्राळविक्राळ रुपं…

 

आज खरे जिवंत वटवृक्ष सापडतात कुठं सहजासहजी…

पण चुकून सापडलाच एखादा…तर… त्याच्यामुळे आताच्या या यमाचा काही वाकडं होत नाही बरं…

 

त्यासाठी वाढवावं लागेल आपणा सगळ्यांनाच वटवृक्षाचे सैन्य

पुरवावी लागेल मुबलक प्राणवायूची रसद आपल्या शरीराला…

 

म्हणजे आक्रमणाआधीच प्रतिबंध करू शकु आपण या रोगरूपी शत्रुंचा

मुळावरच घाव घालु त्यांच्या लक्षणांच्या…

 

आणि आपल्या मुलाबाळांच्या स्वास्थ्यासाठी करावी लागेल बेगमी पैशाची? नव्हे, शुद्ध हवेची, स्वच्छ जलाची

कारण ती पैसे मोजुन तरी मिळेलच ह्याची काय शाश्वती…

 

पण तोपर्यंत तरी स्वतःचा देह हाच एक वटवृक्ष असतो तिच्यासाठी

आणि त्यातील तिची किडनी म्हणजे जणू त्याचा बहि:श्चर प्राण…

 

पूर्वी नाही का जादूच्या, पऱ्यांच्या गोष्टीत राक्षसाचे प्राण दुसऱ्याच एखाद्या गोष्टीत सुरक्षित असायचे…

फरक एवढाच की तेव्हा त्याचे प्राण हरण करायचे असत…

 

आता पती परमेश्वराचे प्राण वाचवायची पराकाष्ठा करायची असते

पण त्यासाठी वडाच्या नव्हे, तर दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात

आणि स्वतःची किडनी कर्तव्यभावनेने दान करावी लागते…

 

अशा कितीतरी सावित्री जगताहेत आज मुक्या ओठानं, अबोलपणं, आपल्या भरल्या कपाळासाठी…

 

सांगा कुठल्या पुराणात नोंद होईल यांच्या नावाची

कुठला इतिहास दखल घेईल यांच्या त्यागाची

 

आणि आणखी एक मराठा छळणारा अनुत्तरीत प्रश्न…

 

तसाच प्रसंग आला तर…

किती सत्यवान उभे राहतील पाठी? आपल्या जन्मसावित्रीसाठी…

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

 

©® या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा