*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*स्वप्रतिभेच्या विळख्यातले स्वयंघोषित साहित्यिक*
*स्वप्रतिभेच्या विळख्यातले स्वयंघोषित साहित्यिक* या ओळीतच एक उपहास दडलेला आहे तसेच हा विषय देऊन लेखनास प्रवृत्त करणाऱ्यांच्या मनातही एक खोल विषाद दडलेला आहे याची जाणीव झाली आणि माझ्याही मुखातून अगदी प्रतिक्षिप्तपणे दोनच शब्द बाहेर पडले, “ खरे आहे!”
‘प्रतिभा’ या शब्दाचा मागोवा घेताना मात्र माझी थोडी तारांबळ झाली. प्रतिभा म्हणजे नेमके काय? प्रतिभा याचा अर्थ मी असा लावते— व्यक्तिमधील चमक, त्याच्यातील गुण, त्याचे कर्तृत्व, बुद्धिमत्ता यामध्ये महानता दर्शविते ती प्रतिभा आणि अशा व्यक्तीला प्रतिभासंपन्न व्यक्ती असे म्हटले जाते आणि ती त्या *व्यक्तीची* प्रतिमा बनते. थोडक्यात प्रतिभा आणि प्रतिमा हे दोन घनिष्ट संबंध असलेले शब्द आहेत. व्यक्तीच्या प्रतिभेचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा ती विविध कलाक्षेत्रांशी संबंधित असू शकते आणि त्या क्षेत्रात त्याने उल्लेखनीय, प्रकाशमान कामगिरी केलेली असते आणि म्हणून त्या *व्यक्तीकडे* त्या क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्ती म्हणून आपण पाहतो.
आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी जेव्हा प्रतिभावंत साहित्यिक या शब्दांचा उच्चार करते तेव्हा सुप्तपणे माझ्या मेंदूच्या सभागृहात अनेक दिग्गज साहित्यिकांचा ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केलं, ज्यांची मी चाहती आहे, ज्यांच्या साहित्याची मी पारायणे केली ज्यांचे लेखन, काव्य, माझ्या स्मरणशक्तीतून जराही नाहीसं झालेलं नाही अशांचा मेळावा भरतो आणि स्वतःला प्रतिभावंत समजणारी मी त्या सागरात एखाद्या बुडबुड्यासारखी झटकन विरूनही जाते.
बऱ्याच वर्षांपूर्वी मी सहजच एक कथा लिहिली होती आणि माध्यमांकडे पाठवली होती. मुंबई आकाशवाणीवरून ती प्रसारित झाली, प्रचंड गाजली. नंतर त्याच कथेला किडुकमिडुक पुरस्कारही मिळाले. तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते, “ बाबी ही तुझ्यासाठी सुरुवात आहे. तू लेखिका नाहीस, साहित्यिक तर नाहीच नाही. ही बिरुदं मिरवण्यासाठी तुला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. प्रतिभा असेल तुझ्यात पण म्हणून तू प्रतिभावंत नाहीस हे लक्षात ठेव. ही खूप मोठी तपस्या आहे, साधना आहे, अभ्यास आहे तेव्हा लिहितो तो लेखक किंवा जो काव्य करतो तो कवी हे समीकरण मनाशी कधीही बाळगू नकोस. लेखक, साहित्यिक, कवी अथवा प्रतिभावंत होण्यासाठी जी सर्जनशीलता हवी, तिच्या प्राप्तीसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि स्वतःला सिद्ध करावे लागते आणि त्याचे निकष फार निराळे असतात.”
तेव्हापासून झाडावर चढलेली मी जमिनीवर येऊन आपटलेलीच आहे.
त्यामुळेच आजच्या विषयातल्या “स्वप्रतिभेच्या विळख्यातले स्वयंघोषित साहित्यिक” या शब्दांनी माझ्या मनात चक्क वादळ उठवले. त्यातली मार्मिकता जाणून घेतानाही मला खूप गंमत वाटली.
*स्वप्रतिभेच्या विळख्यातले* आणि *स्वयंघोषित* हे शब्द किती चपखल आहेत आणि ते तसे वापरणार्या व्यक्तीबद्दल मला अपरंपार आदर वाटला. खरोखरच थातुरमातुर,र ला र ट ला ट लिहायचं, स्वत:ला प्रतिभावंतपणाचा विळखा घालायचा आणि ‘मी साहित्यिक’ म्हणून मिरवून घ्यायचे याला काय म्हणायचे? म्हणूनच, सभोवताली आलेला साहित्यिकांचा, कवी, कवयित्रींचा महापूर पाहून मी गुदमरते. अनेक साहित्य परिवार, साहित्य समूह, उपक्रम, संमेलने या माध्यमातून अगणित संख्येने लोक लिहिते झाले आहेत. अर्थात ही बाब नक्कीच स्तुत्य आहे. मराठी भाषेसाठी अभिमानास्पद आहे, “मराठी पाऊल पडते पुढे” ही भावना देणारी आहे शिवाय असंख्य प्रकाशन संस्था, प्रिंट ऑन डिमांड सारखी प्रकाशने यांच्यामुळे लिहिणाऱ्यांना आपलं साहित्य स्वतःच, स्वखर्चाने प्रकाशित करणंही सोपं झालेलं आहे. त्यामुळे वितरण , खप, मागणी या घटकांना काही काळ दूर ठेवले तरी या नवोदितांच्या नावे प्रकाशित झालेली त्यांची पुस्तके यांची आकडेवारी बरीच असू शकते.
जे. के. रोलिंग या लेखिकेने एक कथापात्र रंगवलं आणि तिच्या *हॅरी पॉटर* पुस्तकांच्या लाखो प्रती खपल्या. प्रतिभावंत व्यक्ती अशी असते जिची सर्जनशीलता अलौकिक ठरते. तुमच्या नावावर किती पुस्तके आहेत यावरून ती ठरत नाही. तेव्हा “स्वप्रतिभेच्या विळख्यात अडकलेल्या स्वयंघोषित साहित्यिकांनी” खरोखरच अंतर्मुख होऊन आत्मसंशोधन करावे. प्रतिभा, प्रतिमा आणि निर्मिती या साहित्यिक पथावर आपण नेमके कुठे आहोत याचा अंदाज घ्यावा.
मराठीत एक चांगली म्हण आहे. *वासरात लंगडी गाय शहाणी* म्हणजेच गाईच्या शहाणपणावर *अदृश्यपणे* एक प्रश्नचिन्ह उमटवलेले आहे नाही का?”
एक दिवस माझ्या एका मैत्रिणीने अगदी कौतुकाने तिच्या परिचयाच्या व्यासंगी गृहस्थाशी माझी ओळख करून दिली. ओळख करून देताना ती म्हणाली, “ ही पण लेखिका आहे बरं का? छान लिहिते.”
समोरची व्यक्ती निर्विकार आणि थंड होती. त्यांनी मला विचारलं,” काssय लिहिताss?”
या दोन शब्दात आणि प्रश्नात इतका उपरोध होता आणि “ही पण लेखिका आहे” हे सांगावं लागतं हा भाव— यानेच माझ्या मनावरचे सारे पापुद्रे खरवडून काढले गेले.
“आम्ही सिद्ध लेखिका” आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात माननीय साहित्यिका अरुणा ढेरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, “आम्ही सिद्ध लेखिका असे म्हणण्यापूर्वी आपण स्वतःला किती आणि कसे सिद्ध केले आहे आणि अजून कोणत्या आघाडीवर आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे याचा विचार झाला पाहिजे.”
एका महान लेखिकेच्या मुखातले हे विनम्र उद्गार ऐकून मी थक्क झाले आणि भानावरही आले.
शब्द मर्यादा असल्यामुळे मी इथेच थांबते.विषय आणि शीर्षक प्रबंधाचे असले तरी आपल्याला लिहायचा आहे निबंध पण जाता जाता एकच सांगते, “स्वप्रतिभेच्या विळख्यात अडकलेल्या स्वयंघोषित साहित्यिकांनो! अर्ध्याn हळकुंडात पिवळे होऊ नका. साहित्य क्षेत्रात अभिमानाने आणि उंच मानेने पाय *रोवून* उभे राहण्यासाठी आपल्यात असलेल्या प्रतिभेच्या अंशाला तावूनसुलाखून सिद्ध करा. डिजीटल माध्यामांवर मिळालेल्या इमोजींना मनातून हटवा आणि वैचारिक प्रगल्भता, *शब्दसंपदा*, *व्याकरणशुद्धता*, भाषा, शैली, वाचन, अभ्यास, निरीक्षण याचा चौफेर विचार करून मग ठरवा “मी साहित्यिक आहे का?”
चुकभूल द्यावी घ्यावी.
खरोखरच जे जिनीअस आणि टॅलंटेड आहेत त्यांनी या लेखनाकडे मात्र कृपया पाठ फिरवावी.
*राधिका भांडारकर*.