– जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री स्वयं रोजगार योजना व मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेचे उद्दीष्ट बँकानी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. शेतकरी केंद्रबिंदू मानून बँकानी पीक कर्ज वितरण वाढीसाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या (DLCC) बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक (LDM) पी.के. परमनिक, आरसेटीचे संचालक आर. परब, विविध बँकेचे व्यवस्थापक, महामंडळांचे व्यवस्थापक, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी पुढे म्हणाल्या, चालु वर्षापासून पशुसंवर्धन, मासेमारी, कुक्कुटपालन या व्यवसायासाठी पीक कर्ज सुविधेतून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकांनी या व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन द्यावे. आरसेटीच्या माध्यमातून अत्यावश्यक असणारे व रोजगार मिळवून देणारे विविध व्यवसायांचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात यावे. आरसेटी व जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) यांच्याशी संलग्न होवून प्रशिक्षणाचे आयोजन करावे. असे सांगून, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी मा. निवडणूक आयोगाने ग्रामपंचयात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयकृत अथवा शेड्युल्ड बँकमध्ये चालू किंवा बचत खाते उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची खाती उघडताना उमेदवारांना बँकांनी सहकार्य करावे, असे निर्देश दिले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, पी.एम. किसान योजना याबाबतचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. बँकानी पीक कर्ज वाटप अहवाल संबंधित वरिष्ठ कार्यालयांना वेळेत पाठवावा. रब्बी पीक कर्ज वाटप उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.
जिल्ह्यामध्ये बचत गटांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी M.S.R.L.M.अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम आला आहे ही बाब जिल्ह्यासाठी अभिनंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी नाबार्ड जिल्हा बँकेच्या संभाव्यता मुक्त ऋण योजना या पुस्तकाचे प्रकाशनही जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.