You are currently viewing बेसूर

बेसूर

*लेखिका पत्रकार “मेघनुश्री” मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*बेसूर*

 

त्रासिक, तापट, हट्टी आणि रागीट असे विचारवंत एकत्र आले की, दिनक्रमांतील सूरांत ताल धरणे महाकठीण होऊन बसते. तणावांत हास्याची लकेर लुप्त होते. कोणताही ऋतू काहीजणांना आनंद देत नाही, त्यामुळे लावलेल्या अगरबत्तीचा सुगंधही घरांत पसरत नाही. स्वत: केलेले काम फक्त बरोबर असते, दुसरे निर्बुद्ध, “त्यांला काय कळतंय?” या वाक्याचे दिवसांतून दहा वेळा उच्चारण, जणू जग जिंकल्याचा आविर्भाव.

तसं खरं बघायला गेलं तर गेल्या दोन पिढ्यांआधी ज्या परीस्थितीत विवाह होत होते, त्यावेळी केवळ नशिबाने दान पदरांत टाकले म्हणून सुस्थळी विराजमान झाले. आजची शैक्षणिक पात्रतेची उंची आणि संगणकीय ज्ञानप्राप्ती, पाहताना असे लक्षांत येते की या लोकांना घरांतली सोडाच, बाहेरची सोयरीकही मिळाली नसती. टेंभा कशाचा मिरवायचा हेही कळत नाही. सर्व सोयीनियुक्त जीवनांतही भ्रमणध्वनीवर भोकाड पसरणे चालूच असते. ‘निराधार आकाशाचा भारही परमेश्वर साहतो’ मग मुलाबाळांविषयी अविश्वास दाखवून, चिडचिड करत राहणे ही इतिकर्तव्यता कितपत योग्य आहे. शेवटी काय टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.

पूर्वीचा काळ निराळा होता. प्रपंचात अनेक हात मदतीला असायचे. “आमच्या वयाच्या होऊन तेवढे वर्ष संसारांत कष्ट करून दाखवा.” आजच्या पिढीचे कष्टांचे स्वरूप बदललेले आहे. आत्ता चाळीशी, पन्नाशीच्या पुढे असलेली पिढी त्यांनीही बरेच व्याप-ताप सोसलेले आहेत फक्त सोयीसुविधांमुळे मागच्या पिढीच्या ते लक्षांत येत नाही, तुलना मात्र कायमची होत रहाते. त्याकाळी घरांतून बाहेर न पडता अनेक गोष्टी साध्य करता यायच्या. आजची धावपळ, अर्थार्जन, महागाईला तोंड देता देता येणारे नाकीनऊ, खर्चिक शिक्षणव्यवस्था हे सगळे काम कितीतरी पटीने वाढले आहे. पासवर्ड, घराची लॅच की यापैकी काहीही विसरून चालत नाही. संगणकीय ज्ञाना सोबत दुचाकी, चारचाकी चे कौशल्य या सगळ्यातून विरंगुळ्याचे शोधलेले दोन क्षण, केलेला प्रवास गृहावस्थेतील कुरबुरीस कारणीभूत ठरतात. पैशाचा प्रॉब्लेम ‘कमतरता’ सध्या कुठेच नसतो, पण मन शांत रहात नाही. वेगळा विचार करण्याची शक्ती गमावून बसलेले लोक तीच नकारात्मकता सर्वत्र पसरवत रहातात.

आजचा पालकवर्ग सुस्थितीत आहे त्यामुळे १०वी-१२वी विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोली असते, पण म्हणून फोनवरील वायफळ गप्पा, संभाषण महत्वाचे की घरांतील विद्यार्थ्याचे भविष्य हेच समजून घेतले पाहिजे. पालकवर्गाला स्पर्धा समोर दिसत असते, अर्ध्या-एक टक्का गुणांकनाचे महत्व वाढत, त्यांवर त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण भविष्यकाळ अवलंबून असतो. संपर्क कमी झाला तरी जे टिकून रहाते ते खरे नाते. मोबाईल फोन झालेत म्हणून रडगाणी सांगण्यासाठी त्याचा दुरूपयोग ही गोष्ट निराशेची आहे. प्रेम केलं ते त्यांच्या पिढीने आणि संसारही असे दुराग्रही मत दिसून येते. स्पर्धेच्या जगतात तग धरून रहाताना मेंदूचा किती भूगा होत असेल याचा विचार व्हायला हवा. वयोपरत्वे वाढणारा शारीरिक त्रास बराच असतो, पण तो समंजसपणाने सोसणारे कमी असतात आणि एक दिवस अचानक जग सोडून जातात. दुसऱ्यांची उणी-दुणी काढत, विव्हळत कण्हणारे काही कमी नसतात. बेसूर, भसाड्या आवाजांत इतरांचे जगणे मुश्कील करून टाकतात.

वैचारिक सखोलता, कार्यमग्नता असली की कशालाच वेळ मिळत नाही. कुणाला सतत संवादाची, समाजकार्याची गरज असते. जगण्यासाठी सरत्या काळांतही शर्थीचे प्रयत्न करणारे असतात. स्वभावातील समंजसता आणि लढवय्याची वृत्ती असणारे मात्र कुटुंबास नेहमीच प्रिय असतात. आसपासच्या मंथरांनी केलेला मनांतला प्रवेश पूर्णतः घातक ठरतो आणि मग एकटेपणा खायला उठतो, आयुष्याच्या सुरवातीच्या काळांत केलेली घमेंड आठवतं रहाते. पश्चातापाच्या आगीत भेसूर होऊन जळण्यापेक्षा आपुलकीचे, आत्मीयतेचे सौंदर्य कुणालाही निश्चित भावेल, मन आपोआप तिकडेच वळेल. एखादे काय पण हजारो कामे केली तरी त्याची आठवण ठेवली जात नाही. धान्याच्या राशीतही कसपट शोधणारे असेच असतात. जिथे पत्रास ठेवली जात नाही त्याचाच उदो उदो होतो, कारण त्याने मिळवलेले कर्तुत्व एवढेच असते.

असे अनेक प्रसंग रोजच्या व्यवहारांत समोर येतात, पहायला मिळतात. एखादे माणूस उन्हांतानातून, पावसांतून महत प्रयासाने बाजार करून घरी परततो अपेक्षा एवढीच असते की खरेदीस पसंती मिळावी. तर त्याच्या आनंदावर लगेच विरजण टाकले जाते. हे तसे मिळाले नाही का ? यापेक्षा मोठे/लहान नव्हते का ? हे साफ चुकीचे वाटते. अरे स्वत: निवांत बसणार शिळ्या, ताज्यातला फरक बघत निदान घरापर्यंत मिळतंय हेही नसे थोडके ही भूमिका फार कमी वेळां पहायला मिळते. जन्माला आल्यापासून हसणे हरवून बसल्यासारखे वावरणे, अतिजलद विचारसरणी, नको त्या चर्चा करत बसायची सवय, यांची बाल्यावस्था आणि तारुण्यही या सवयींनी खराब गेलेले असतेच, मग वृद्धापकाळ तरी कसा चांगला जाणार ? अडचणी कितीही आल्या तरी दुसऱ्या दिवशीची सकाळ “फिटे अंधाराचे जाळे होण्यासाठी”, आदल्या दिवशीच्या कातरवेळेचे सौंदर्य “संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा” जे शब्दांशब्दातून प्रतीत होते ते उमगायला हवे.

 

मेघनुश्री – [लेखिका,पत्रकार]

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा