*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वटवृक्ष…*
वटवृक्षाची पहा सावली जशी माऊलीची माया
स्वत: झेलुनी नित्य देतसे थंडगार नेहमी छाया..
घरकुल त्याचे पहा पसारा गोकूळ नांदे खांद्यावरी
किलबिलती ती चिमणपांखरे झुला बांधती तयावरी…
येताजाता पांथस्थांना विश्रांतीचे स्थान असे
पर्णकुटी ती जणू भासते,कुशीत जो तो तिथे बसे…
छत्रछाया दाट वडाची रूप देखणे किती तरी
फळे चाखती पक्षी विहरती किती कोटरे वडावरी…
प्राणवायुचा दाता वड हा मुळात पाणी साठवितो
जणू आजोबा काठीधारी पारंब्या पकडत जातो..
एकरभरही असतो पसारा गुरे वासरे विसावती
आयुषमानही असतो वड हा फळे लागती गोड
किती…
पर्यावरणा झाडे रक्षती, वसुंधरेची ही बाळे
वड पिंपळ उंबर निंब निवारती प्रदूषण काळे..
देशी झाडे लावा जन हो भरीस कुणाच्या पडू नका
एक झाड एक माणूस वाचवते हे विसरू नका…
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)