You are currently viewing पुस्तकप्रेमी समूहाच्या पुस्तक परिचय अभियानाचे पाचव्या वर्षात पदार्पण

पुस्तकप्रेमी समूहाच्या पुस्तक परिचय अभियानाचे पाचव्या वर्षात पदार्पण

कोल्हापूर :

 

वाचन संस्कृती जपण्याचे हेतूने व्हाट्सअप आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर कार्यरत असलेल्या पुस्तकप्रेमी समूहाच्या पुस्तक परिचय अभियानाने आता पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील चार वर्षात एकही दिवसाचा खंड न पडता अखंडितपणे पुस्तकप्रेमी समूहाने विविध भाषेतील 1460 पेक्षा अधिक पुस्तकांचा समाजमाध्यमांवर परिचय करून दिला आहे. कोरोना काळात सगळी जगरहाटी थांबली, खूप वाईट वाईट गोष्टी घडल्या पण प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यातील एक म्हणजे पुस्तकप्रेमी समूहाचे गठन.

कोल्हापूरच्या कृष्णा दिवटे यांनी केवळ 6 सदस्यांसह 14 जून, 2020 रोजी हा समूह सुरु केला होता. चार वर्षात या समूहाने विशाल रूप धारण केले असून आजघडीला व्हाट्सअप समूहाची सदस्य संख्या पाचशेहून अधिक तर फेसबुक समूहात पन्नास हजार सदस्य आहेत. समूहाच्या सदस्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील मराठी भाषिक जसे आहेत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, दुबई, सिंगापूर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया येथील मराठी भाषिक साहित्यप्रेमी आहेत. इथे जसे सामान्य साहित्यप्रेमी वाचक आहेत तसेच रामदास भटकळ, अनिल मेहता, नितीन हिरवे, अखिल मेहता, बिपीन बाकळे, भाग्यश्री कसोटे पाटील यासारखे प्रकाशक व विश्वास पाटील, चंद्रशेखर टिळक, अरुण म्हात्रे, शुचिता नांदापूरकर फडके, छाया महाजन, मोनिका गजेंद्रगडकर, राधिका कुंटे, आश्लेषा महाजन, देवा झिंजाड, अभय सदावर्ते, माधव जोशी, राहुल फाटे, विजय जोशी उर्फ विजो, प्रसाद नातू , अविनाश गडवे, विश्वनाथ जगदाळे, मृदुला दाढे जोशी, संध्या साठे जोशी, डॉ संदीप श्रोत्री, डॉ शंतनू अभ्यंकर, श्रेया राजवाडे, प्रवीण मानकर, प्रकाश पिटकर, केदार मारुलकर यासारखे प्रथितयश लेखक, व्याख्याते, फोटोग्राफर, भटकंती करणारेही आहेत. दर आठवड्याला एका सदस्याकडे सोमवार ते रविवार असे सलग सात दिवस पुस्तक परिचय करून द्यायची जबाबदारी असते. पुस्तक कोणत्या भाषेतील, कोणत्या विषयावरचे असावे यावर कोणतेही बंधन नसले तरी सर्वसाधारणपणे राजकीय, जातीय, धार्मिक व टोकाचे मतभेद असलेले विषय यावरील पुस्तके टाळावीत अशी अपेक्षा असते.त्यातूनही जर अशा विषयावरील पुस्तके परिचयासाठी आली तर परिचयाची मांडणी व त्यावरील प्रतिक्रिया संतुलित याव्यात हे अपेक्षित असते. मागील चार वर्षात समूहात मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, इंग्रजीसह देशविदेशातील अनेक भाषांतील पुस्तकांचे परिचय करून दिले जात आहेत.
समूहात दुपारी चारपर्यंत त्या दिवसाचा पुस्तक परिचय व त्यावरील चर्चा व दुपार चार नंतर साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, सर्व प्रकारच्या कला, संस्कृती, पर्यावरण व सामाजिक महत्वाचे विषय याविषयावरील चर्चेसाठी खुले व्यासपीठ हे सर्वसाधारणपणे वेळेचे नियोजन असते. फॉर्वर्डेड मेसेज, वाढदिवस किंवा अन्य शुभेच्छा व्यक्त करण्याला समूहावर पूर्णपणे मज्जाव आहे.

पुस्तक परिचय या मुख्य उपक्रमाच्या बरोबरीने समूह इतर अनेक उपक्रम राबवितो त्यातला लेखक आपल्या घरी हा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विश्वास पाटील, अच्युत गोडबोले, चंद्रशेखर टिळक, अरुण म्हात्रे, शुचिता नांदापूरकर फडके, दीपक करंजीकर, सचिन केळकर, प्रवीण मानकर, विजय जोशी (विजो) यासारख्या साहित्यिक किंवा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या ऑनलाईन मुलाखती व चर्चासत्रे घेतली जातात.

समूह स्थापनेपासून आजतागायत दर शनिवारची संध्याकाळ काव्यसंध्या म्हणून साजरी केली जात आहे. यामध्ये संचलन करणारा सदस्य आठवडाभर आधी एखादी थीम किंवा चित्रे देतो व त्यावर आधारित स्वरचित कविता सदस्य शनिवारी संध्याकाळी सादर करतात. कथाजागर हाही समुहावरचा एक लोकप्रिय उपक्रम आहे. या उपक्रमाचे संचलन करणारा सदस्य एखादी संकल्पना किंवा आधी अधुरी कथा देतो व त्यावर आधारित स्वरचित कथा अन्य सदस्य सादर करतात. समूहाचा मागील चार वर्षे ऑनलाईन दिवाळी अंक सादर होतो आहे ज्यामध्ये सदस्यांच्या दर्जेदार साहित्याची रेलचेल असते. हाच अंक प्रिंट ऑन डिमांड पद्धतीने छापील स्वरूपात उपलब्ध असतो. यावर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात व श्रीराम पवार यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात कोल्हापूर येथे पार पडले होते. समूहातील उपक्रमांमुळे पूर्वी क्वचितच व्यक्त होणारे सदस्य आता सातत्याने लिहू लागले आहेत. मागील दोन वर्षे पुस्तकप्रेमी समूहाचे लोणावळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन भरत असून दरवर्षी शंभरपेक्षा जास्त सदस्य संमेलनात उपस्थिती नोंदवून कार्यक्रमांचा आनंद लुटत आहेत. विशेष म्हणजे एरवी मानधन, परवा व तदनुषंगिक खर्च मिळाल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला न जाणारे अनेक लेखक व कवी स्वखर्चाने या संमेलनाला येतात व अन्य सदस्यांप्रमाणे सामान्य बनून वावरतात. एव्हढा लळा पुस्तकप्रेमीने सर्वाना लावला आहे.पुस्तकप्रेमीने कोल्हापूर व चिपळूण येथील पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात वस्तुरूपाने मदत करून सामाजिक भानही जपले आहे.समाजमाध्यमांवर सुरु केले जाणारे बहुतेक उपक्रम अल्पजीवी ठरत असताना पुस्तकप्रेमी समूह जे सातत्य दाखवीत आहे हे समाजमाध्यमांचा इतिहासात अपवादात्मक आश्च्यर्य आहे.

पुस्तकप्रेमी समूहाच्या स्थापनेपासून समन्वयक पदाची जबाबदारी कोल्हापूरचे कृष्णा दिवटे पार पाडत असून त्यांना याकामी सचिन केळकर, श्रेया राजवाडे, केदार मारुलकर, अजिंक्य लाटकर, अरविंद लाटकर, अविनाश गडवे आणि महेश सोनावणे यांची मदत होत असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा