पुणे :
लष्कराला सीमाभागात तसेच अन्य ठिकाणी छोटे अंतर त्वरित पार करता यावे, यासाठी ‘डीआरडीओ’ची पुण्यातील आर. ऍन्ड डी.ई. (ई) प्रयोगशाळा आणि तळेगाव येथील एल. ऍन्ड टी. कंपनीतर्फे स्वदेशी बनावटीच्या ‘सांकव’ (पूल)ची निर्मिती केली आहे. बुधवारी या पुलाची पहिली तुकडी लष्करात वापरासाठी दाखल झाली आहे.
संरक्षण सामग्री उत्पादनेत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. छोट्या आकाराच्या आणि सहजपणे वाहून नेता येईल, अशा छोट्या पुलाची रचना केली होती. यामध्ये 10 मीटर, 15 मीटर अशा विविध आकाराचे पूल तयार केले. वातावरण आणि भौगोलिक प्रदेश, सैन्याची गरज अशा विविध गोष्टी लक्षात घेत, या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या पुलाची निर्मिती केली.
पहिल्या टप्प्यात लष्कराला तीन पूल सोपवण्यात आले आहेत. असून, अजूनही काही पुलांची निर्मिती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ‘डीआरडीओ’ प्रशासनाने दिली आहे. पूर्णत: स्वदेशी रचना आणि निर्मिती असलेल्या या पुलांची निर्मिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. विदेशी साहित्यांपासून बनविलेल्या पुलाच्या तुलनेत तब्बल 40 टक्के कमी किमतीत या पुलाची निर्मिती केली आहे. या साहित्याची रचना आणि निर्मिती भारतातच झाल्याने त्याचे व्यवस्थापन, दुरुस्ती ही अधिक जलद गतीने आणि कमी खर्चात होईल.