You are currently viewing चुकलं माझं

चुकलं माझं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*चुकलं माझं*

 

आज १४ दिवस झाले मी इथे आहे. या वास्तूस बालसुधारगृह असे म्हणतात, तशी बरीच मुलं इथे आहेत. कुठून कुठून आलेली, अस्ताव्यस्त, विस्कळीत माझ्यासारखीच गुन्हेगार. या वेगळ्या वातावरणात घरापासून तुटलेला “मी”.

 

इथे शिक्षक आहेत. काही शिक्षक बाहेरूनही येतात. कधी एकत्रितपणे किंवा कधी वैयक्तिकपणे भाषणे देतात ज्याला समुपदेशन म्हणतात.

 

सकाळपासून कामेच कामे. स्वतःचे कपडे स्वतः धुवा, भांडी घासा, केर काढा, अंगण झाडा, झाडे लावा, गृहपाठ करा. एक प्रकारची कैदच म्हणाना! दोन दिवस तर मी जेवलोही नाही. ताटात वाढलेलं ते जेवण पाहून मला मळमळल्यासारखं झालं. तिसऱ्या दिवशी माझी मेंटॉर मला म्हणाली,

“ इथे तुला पिझ्झा, बर्गर मिळणारच नाही. मुकाट्याने डाळ— भात, भाजी— पोळी खा नाहीतर उपाशी राहशील.”

 

या इमारतीच्या भिंती माझ्या अंगावर येतात. जीव गुदमरतो, कोंडतो आहे, मला नाही रहायचं इथे. मी पळून जाणार.

“ मम्मी डॅडी! काहीतरी करा ना! तुमची सगळी कनेक्शन्स वापरा, काहीही करा पण मला इथून सोडवा.”

 

काठपदराची, गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या एका स्त्री समोर मी बसलोय. माझ्या मम्मीच्याच वयाची असेल पण तिचं बोलणं, वागणं, दिसणं खूप निराळं आहे. तिच्या डोळ्यातले भाव खूप प्रेमळ वाटले. एकदम मला “श्यामची आई”च वाटली ती! आमच्या घरी काम करणाऱ्या मंगलाबाईंनी मला एकदा श्यामच्या आईची गोष्ट सांगितली होती.

 

माझा हात हातात धरून ही “श्यामची आई” अगदी मृदूपणे बोलत होती.

“ बाळ तुझी वाट चुकली आहे. तू भरकटलास. ज्या समूहातून तू इथे आला आहेस त्या समूहाचे गुण, संस्कृती काहीही असेल पण तुझ्या हातून फार गंभीर गुन्हा घडलाय आणि गुन्ह्याला क्षमा नसते. शासन हे होणारच. मात्र तुझ्या अज्ञान, अजाण वयाला ग्राह्य धरून तुला पुढील जीवनासाठी संधी मिळू शकते पण वेळ लागेल. सामाजिक कायद्याच्या, न्यायालयीन तरतुदीच्या “सर्व निकषातून तुला जावे लागेल. ते तुझ्यासाठी बंधनकारक आहे आणि चुकूनही पळून जाण्याचा विचार अथवा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठी सारंच कठिण होऊन बसेल.”

 

“ काय गुन्हा केला मी आणि मी काही मुद्दाम केले का? कुणाचाही जीव घेण्याचा माझा विचारही नव्हता. तो अपघात होता. चूक फक्त माझीच होती का?”

“ ते सगळं ठरायचंय. या भिंतींच्या बाहेर काय चाललंय याची तुला कल्पना आहे का? संपूर्ण शहरातलं वातावरण या घटनेने तापलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात तू एकटाच गुन्हेगार नक्कीच नाहीस. तुझ्या भोवतालचा समाज, तुझी जडणघडण, अनेक प्रलोभनाच्या जाळ्यात, नकळत्या वयात तुला खेचणारी अनेक माध्यमे, दबाव तंत्रांचा प्रभाव आणि त्यामुळेच “माझ्या केसांनाही कोणी हात लावू शकणार नाही” अशी झालेली तुझी बेदरकार बेरड वृत्ती! आता हे सारं काही उलट सुलट पद्धतीने तपासले जाईल. सामाजिक सुरक्षा, कायदा, न्यायव्यवस्था,जनतेचा संताप या साऱ्यांची घुसळण होऊन मगच ठरेल तुझ्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यायचा ते.”

 

“श्यामची आई” खूपच कठिण बोलत होती. मला काहीही समजत नव्हतं. सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं पण माझ्या मनात याही क्षणी एक प्रचंड विश्वास होता की,” माझे डॅडी खूप भारी आहेत. ते मला काहीही करून सोडवतीलच. कसला समाज, कसले कायदे, कसला न्याय? या सगळ्यांवर माझे डॅडी नक्कीच ओव्हरपॉवर करतील. माझी खात्री आहे.”

 

पण मला कुणीच कसे भेटायला आले नाहीत? सगळे कुठे आहेत? माझं घर, माझी रूम, माझा टीव्ही, माझे गेम्स आणि माझे मित्र? सगळ्यांनाच मी खूप खूप मिस करतोय. हे काय झालं? काय चुकलं माझं?

 

मी बारावी पास झालो म्हणून डॅडीने मला कबूल केल्याप्रमाणे पोर्शे कार बक्षीस म्हणून दिली. संपूर्ण लोडेड, हायफाय, अलिशान, सिल्वर कलरची इतकी महागडी कार पाहताक्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. डॅडींना मिठी मारून त्यांना म्हटलं,”थँक्यू डॅडी! आय लव्ह यू!”

मम्मी— डॅडींच्या डोळ्यात माझ्यासाठी कौतुक ठसठसून भरलेलं होतं. माझा स्कोअर काही फार उत्तम नव्हता पण डॅडी म्हणाले होते,” बेटा तू फक्त पास हो. तुला हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याची जबाबदारी माझी.”

 

 

“डॅडी इज माय हिरो” ते काहीही करू शकतात.

 

डोक्यात नुसती धम्माल चालू होती. एचएसबीसीचं क्रेडिट कार्ड, नवी कोरी गाडी, माझे दोस्त आणि कृष्णा ब्लू पब. डोक्यात प्रचंड नशा. ड्रायव्हर काका डॅडींना म्हणाले,” साहेब! गाडीचं रजिस्ट्रेशन व्हायचंय. बबलू अजून लहान आहे. गाडी चालवता येते त्याला पण अजून रजिस्टर्ड लायसन्स त्याच्याकडे कुठे आहे? थोडं दमानं घ्यावं म्हणतो मी.”

 

पण तरीही डॅडींनी परवानगी दिलीच. दोन हात उंच करून मी जोरात म्हणालो,” हेssयss! थँक्यू डॅडी!”

 

एकमेकांनी चीअर्स केलं. “चीअर्स टु बारावी पास!”

हाss हा..

त्यानंतरचा सगळा वेळ कसा वाहत गेला. मल्टीक्युजीन्स, फ्रेंच ड्रिंक्स, डान्स, म्युझिक, बेधुंद नशा, फ्री वर्ल्ड, मुक्त, स्वतंत्र, टॉप ऑफ द वर्ल्ड, माझ्यासारखा भाग्यवान मीच !!

 

पहाट फुटू लागली. घरी जायचं होतच. मित्र माझ्याघरीच नाईट ओव्हर करणार होते. ड्रायव्हर काकांच्या हातून गाडीच्या किल्ल्या मी हिसकावून घेतल्या. कार असावी तर अशी! किती स्मूद, वेगवान!

चालवायला काय मजा वाटते!

रात्र चढलेली, अंधार साचलेला आणि इतक्यात मागच्या सीट वरून दोस्त किंचाळला, “बबलू! अरे समोर बघ..” पण क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. दोन पक्षी उडावेत तशा त्या दोन व्यक्ती हवेत उडून दाणकन् आपटल्या, पोर्शे कारचाही चक्काचूर झाला. गाडीतले आम्ही ठीक होतो पण रस्त्यावर रक्ताचं थारोळं साचलं. प्रचंड गर्दी जमली. माझे मित्र सटकले. ड्रायव्हरकाकाही कुठे दिसेना आणि मी लोकांच्या गराड्यात.

सहस्त्र सर्प अंगावरून फिरताहेत असे वाटले आणि त्या क्षणापासून सगळंच बदललं.

गर्दीतून कुणीतरी म्हणालं,” पकडा भडव्याला! श्रीमंतीचा माज पहा, जेलमध्ये टाका. अरे! हकनाक बळी गेले ना रे त्या पोरांचे! काय सांगणार त्यांच्या कुटुंबीयांना? काय अपराध होता त्यांचा?”

 

तेव्हापासून एकच ऐकतोय. “बडे बापकी औलाद! यालाच काय याच्या आईबापांना जन्मठेप व्हायला हवी. फाशी द्या साल्यांना.”

 

आता हळूहळू नशा उतरत आहे. कुणाकडून तरी कळलं,

मम्मी, डॅडी, ग्रँडपा सगळेच कोठडीत आहेत. पोलिसांनी त्यांना पकडून नेलेलं आहे. कृष्णा ब्लुला आणि संबंधित अनेक हॉटेल्स ना सील लागले. भरपूर लोकांची धरपकड झाली. वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल नुसती आग ओकत आहेत, सारेच पिसाळलेत, अनेक सामाजिक सेवा संस्थांचे मोर्चे निघत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी “मी” आहे. *सतरा वर्षे आठ महिने* म्हणून अज्ञान, अजाण गुन्हेगार, वाट चुकलेला, बेरड, बेधडक, बेताल, संस्कारशून्य, श्रीमंत बापाचा बेदरकार लाडावलेला एकुलता एक मुलगा. “कर दे दुनिया मुठ्ठी मे” असा माज असलेला.

काय असेल माझं भविष्य? कसा सुटेन मी? कदाचित सुटेनही. ही वादळं तात्पुरती असतात. दुसरी काही घटना घडली तर लोक विसरूनही जातील. पब्लिक मेमरी शॉर्ट असते. शिवाय डॅडी आत असले तरी त्यांची टीम सॉलिड आहे. ते सगळं सेटिंग करतील. मी सुटेन, बाहेर येईन आणि लंडनच्या कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन ही होईल पण असा कसा सुटेन? त्या दोन जीवांचे आत्मे आयुष्यभर मला पोखरतील का?माझ्यासाठी सुटका आणि बंदीवान याचा नक्की अर्थ काय असेल?

 

आता मात्र मला खूप मोठ्यानं रडावसं वाटतंय.

श्यामची आई मला जवळ घेते. मी तिला घट्ट मिठी मारून म्हणतो,

“ मी चुकलो पण मला माफ करा असे मी म्हणणार नाही कारण आता मी एका अक्षम्य गुन्ह्याचा प्रतिनिधी आहे मला शिक्षा झालीच पाहिजे. “फरगिव्ह द सिनर नॉट द सिन”

 

या चौदा दिवसात मी वयाची दहा वर्षे पार केली आहेत. आता मी तसा सज्ञान झालो आहे.

 

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा