*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्ग सुपंथ रिती*
वसुंधरेच्या मृद्गंधाने
दरवळला आसमंत |
परिसरात पावसाने
जीवांस केले श्रीमंत ||१||
पंचतत्वे किमयागार
निसर्ग दैवत कुबेर |
निसर्ग संतुलन थोर
धन रक्षक तो कुबेर ||२||
पावसाच्या जलधारांनी
जीवनानंद बहरला |
सुप्तावस्थेतील जीवांचा
नव शृंगार सजवला ||३||
मेघांनी घेऊनि वाजंत्री
कडकडकडाडविले |
विद्युल्लता रोषणाईत
नवलाईने सजविले ||४||
कुणी छायाचित्रकार तो
छायाचित्र ते रेखीतसे |
दवंडी पिटुनी वार्ताही
मेघ मल्हारच देतसे ||५||
निसर्ग उत्सव महान
जीव ते करिती गायन
पक्षी गाती मधुर गान
मयूर करिती नर्तन ||६||
अगोचर गोचर होती
मुक्त होत स्वानंद घेती |
काजवेही लूकलूकती
सजीव सारे सुख घेती ||७||
पाहुनि सोहळ्याचा थाट
डोळे ते सुखा लाचावती |
एकमेकां साहाय्य करी
हिच ती सुपंथांची रिती ||८||
झाडे लावू झाडे वाढवू
महामंत्र उच्चारु मुखी
निसर्ग सुख चक्र राखू
निसर्ग सोयरे ते सुखी ||९||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.:- वेंगुर्ला,
जि. :- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.