You are currently viewing ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३६ धावांनी केला पराभव

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३६ धावांनी केला पराभव

हेड-वॉर्नरनंतर कमिन्स-झाम्पा चमकले

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

टी२० विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला २०२१ च्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ही स्पर्धा चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या या गट-ब सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला.

 

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकात ७ गडी गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला २० षटकांत ६ बाद १६५ धावाच करता आल्या. या विश्वचषकात २०० धावांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. टी२० विश्वचषक २०२४ च्या १७व्या सामन्यात हे शक्य झाले. आता ११ जूनला ऑस्ट्रेलियाचा सामना नामिबियाशी होणार असून इंग्लंडचा सामना १३ जूनला ओमानशी होणार आहे.

 

या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ दोन सामन्यांत दोन विजय आणि चार गुणांसह ब गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी स्कॉटलंड तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नामिबिया दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर तर इंग्लंड एका गुणासह चौथ्या स्थानावर आहे. ओमानने अजून खाते उघडले नाही. इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसाने वाहून गेला आणि त्यामुळे संघाने सुपर-एटसाठी पात्र ठरण्याची संधी गमावली.

 

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ गडी गमावून २०१ धावा केल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कोणताही फलंदाज ४०चा आकडा गाठू शकला नाही, तरीही संघाने २००+ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी ५ षटकांत ७० धावांची भागीदारी केली. हेड १८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला तर डेव्हिड वॉर्नर १६ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. हेडने २ चौकार आणि ३ षटकार मारले, तर वॉर्नरने २ चौकार आणि ४ षटकार मारले. हेडला आर्चरने तर वॉर्नरला मोईन अलीने त्रिफळाचीत बाद केले. यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात ६५ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी लियाम लिव्हिंगस्टोनने भेदली. त्याने मार्शला बाद केले. मार्शने २५ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली. तर आदिल रशीदने मॅक्सवेलला सॉल्टकरवी झेलबाद केले. तो २५ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २८ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाला १६८ धावांवर पाचवा धक्का बसला. ख्रिस जॉर्डनने टिम डेव्हिडला लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद केले. त्याला ११ धावा करता आल्या. स्टॉइनिसने १७ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केली. जॉर्डनने त्याला बाहेर काढले. जॉर्डनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही १००वी विकेट होती. पॅट कमिन्स खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी मॅथ्यू वेडने १० चेंडूंतील ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

 

प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांनी ४३ चेंडूत ७३ धावा जोडल्या. यानंतर ॲडम झाम्पाचा कहर पाहायला मिळाला. त्याने फिल सॉल्ट आणि बटलरला तंबूमध्ये पाठवले. सॉल्ट २३ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावा करून बाद झाला. त्याचवेळी बटलरने २८ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव मंदावला आणि एकाही फलंदाजाला आक्रमक फटकेबाजी करता आली नाही. विल जॅक १०, जॉनी बेअरस्टो ७, मोईन अली २५ आणि लियाम लिव्हिंगस्टोन १५ धावा करून बाद झाले. तर हॅरी ब्रूकने १६ चेंडूत २० धावा केल्या आणि ख्रिस जॉर्डनने एका धावेची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि झाम्पाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी जोश हेझलवूड आणि मार्कस स्टॉइनिस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

झाम्पाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आज सकाळी ६ वाजता वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा तर रात्री ८ वाजता स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना अर्थात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. रात्री १०:३० वाजता ओमान विरुद्ध स्कॉटलंड सामना रंगणार अाहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा